Friday, 31 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकजूट होऊन देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन केलं आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं, असं ते म्हणाले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभाला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या एकतेला मजबूती देण्याचा संकल्प केल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सरकारनं २०१४ पासून नक्षलवाद आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी निर्णायक प्रयत्न केल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन आणि संवर्धन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, ते म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

तत्पूर्वी, एकता नगर इथं आज भव्य एकता दिवस संचलन करण्यात आलं. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विविध राज्यांतील पोलीस दलांच्या तुकड्यांचा समावेश होता. हवाई दलाच्या 'सूर्य किरण' पथकानं तिरंग्याची आकर्षक शौर्यगाथा प्रदर्शित केली.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती देशभरात आज राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि देशवासीयांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सरदार पटेल यांचा दृढ निर्धार आणि दूरदृष्टीमुळे विविधतेने नटलेला आपला देश लोकशाही प्रजासत्ताकात एकत्र बांधला गेला, असं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

गृहमंत्री अमित शहा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. सरदार पटेल यांनी संस्थानांचं एकत्रीकरण करून देशाची एकता आणि सुरक्षा अधिक बळकट केली, असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज एकता पदयात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यलढा आणि अखंड भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान अमूल्य असून, त्यांचा दृढनिश्चय आणि समर्पणाचं स्मरण करून आपण सर्वांनी देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटिबद्ध राहावं, असं आवाहन इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं. शहागंज इथल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळ पदयात्रेचा समारोप झाला.

****

हिंगोली पोलीस दलातर्फे आज एकता दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

परभणी इथं सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्त पोलीस दलाच्या वतीनं एकता दौड आयोजित केली होती. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. कृषी विद्यापीठ गेट ते पोलीस अधीक्षक कार्यालय अशी ही दौड पूर्ण करण्यात आली.

परभणी भाजपच्या वतीने सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त एकता दौड काढण्यात आली. अरोग्य राज्य मंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी गोमातेची पूजन करून या एकता दौडला प्रारंभ केला.

नांदेड इथंही आज सकाळी नवा मोंढा ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याची माहिती, कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी दिली आहे. या अंतर्गत विविध वार्डात सिमेंटचे रस्ते आणि विविध विकासकामं केली जाणार आहेत.

****

No comments:

Post a Comment