Saturday, 1 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      सात राज्य, दोन केंद्र शासित प्रदेशांच्या स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रम, छत्तीसगडच्या रौप्य महोत्सवात पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती

·      केंद्राच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात

·      व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत घट, साडेचार ते साडेसहा रुपयांनी स्वस्त

·      मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीचा मुंबईत सत्याचा मोर्चा

·      बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाला विजेतेपद तर पुण्याच्या चंद्रिकाला मुष्टियुद्धात सुवर्णपदक

आणि

·      आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत - दक्षिण आफ्रिकेत विजेतेपदासाठी सामना

****

आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आणि पंजाब ही देशातील सात राज्य तसंच लक्षद्वीप, आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश यांचा आज स्थापना दिवस. या राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व ठिकाणी राज्य स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगढच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये १४ हजार २६० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज झाली. नवा रायपूर अटलनगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. ही वास्तू हरित इमारत संकल्पनेवर बांधलेली असून येथे संपूर्णपणे सौरउर्जेचा वापर होणार आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरणही मोदी यांनी आज केलं.

****

छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आज रायपूरमधील प्रजापिता ब्रह्मकुमारी शांतीशिखर केंद्राचं उद्घाटन केलं. याशिवाय त्यांच्या हस्ते वीर नारायण सिंग स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिक वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटनही करण्यात आलं.

****

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीला सुरुवात झाली आहे असून नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. खरेदीचा कालावधी १५ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवसांसाठी असेल. शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा आणि नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत आजपासून घट झाली आहे. व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत साडे चार ते साडे सहा रुपयांपर्यंत घट झाली आहे. घरगुती वापराच्या १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या एल पी जी सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.

****

 प्रसार भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या ६७ व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या मुंबईत उद्घाटन होणार आहे. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर उपस्थित राहणार आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आपली कला सादर करणार आहेत. आकाशवाणी संगीत संमेलन प्रसिद्ध आणि उदयोन्मुख संगीतकार आणि गायकांसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं. दिल्ली आणि चेन्नई इथंही उद्घाटनाचे कार्यक्रम होणार आहेत.

****

महाविकास आघाडीनं आज मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मुंबईत सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे सहभागी झाले. याशिवाय डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले. सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.

****

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ भाविकांचा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.

****

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. यात एका महिन्यात आरोग्य सुविधा मंचावर सर्वाधिक तीन कोटी २१ लाखांपेक्षा अधिक जणांनी केलेली नोंदणी, एका आठवड्यात स्तनाच्या कर्करोगाच्या चाचणीसाठी ९ कोटी ९४ लाख जणांचा ऑनलाईन पद्धतीने सहभाग आणि राज्य पातळीवर एका आठवड्यात जीवनावश्यक मोजमापांच्या चाचणीसाठी सव्वा लाखांहून अधिक लोकांचा ऑनलाईन सहभाग या उपक्रमांचा समावेश आहे. जवळपास २० लाख आरोग्य शिबिरांच्या माध्यमांतून ११ कोटी नागरिक या अभियानात सहभागी झाले आहेत.

****

भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ‘खुला बाजार विक्री योजने’ अंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे. खरेदीदारांनी अन्न महामंडळाच्या ई-लिलावात बोली लावावी, असं आवाहन महामंडळाने केलं आहे. येत्या ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी तांदळाचा ई-लिलाव होणार असून, यासाठी एकूण १० हजार मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध केला जाईल असं यात म्हटलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना उद्या खेळविला जाणार आहे. या मालिकेत भारत १-० असा पिछाडीवर आहे.

आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या उद्यात अंतिम सामना होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर सुरू होईल.

गुवाहाटी इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर गुरुवारी नवी मुंबई येथे झालेल्या रोमांचक उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले नाही. त्यामुळे या स्पर्धेला उद्या होणाऱ्या सामन्यातून नवा विजेता मिळणार हे निश्चित आहे.

****

बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४८ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, १८ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताच्या २२२ खेळाडूंनी भाग घेतला होता. भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावलं, पुण्याची चंद्रिका पुजारी हिने मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, तर भारोत्तोलन आणि बीच रेसलिंग प्रकारात खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली.

****

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज महानगरातील पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात उद्या कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे पाच वाजता आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक आणि महापूजा करण्यात येणार आहे. दरवर्षी या एकादशीला इथं यात्रा भरते. यात्रेमुळे पंढरपूर गजबजले असून मंदिराजवळ अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत.

****

शासकीय योजनांच्या माध्यमातून इतर मागास संवर्गातील सर्व समुहांच्या आर्थिक विकासासाठी इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्रालय कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महाज्योतीच्या वतीनं घेण्यात आलेल्या कर्ज वाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात विविध मंडळांतर्फे १८० जणांना थेट कर्ज, तर ५८५ जणांना कर्ज परताव्याचा लाभ देण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरीत करण्यात आले.

****

विविध क्षेत्रात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना छत्रपती संभाजीनगर इथं मराठा समाज प्रतिष्ठानच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा १५ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आयआयटी महाविद्यालयाच्या परिसरात दुपारी चार वाजता होणार आहे.

****

लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडीतून वन विभागाच्या पथकाने ८ फूट लांब, १०० किलो वजनाची मगर पकडली आहे. अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव, केंद्रेवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून मगर दिसत असल्याची चर्चा होती. वन विभागाच्या पथकाने दोन दिवसांपासून ढाळेगाव, अंधोर आणि केंद्रेवाडी शिवारात शोधमोहीम राबवित या मगरीला पकडलं. मगर पकडल्याच्या वृत्ताने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

****

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे येत्या चार तारखेला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यात विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment