Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 November
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०२ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आजच्या कार्तिकी एकादशी निमित्ताने आज पहाटे पंढरपुर
इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी
मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला
विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषद शाळेतल्या
दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला. शालेय विद्यार्थीनी मानसी आनंद
माळी आणि विद्यार्थी आर्य समाधान थोरात यांची विद्यार्थी मानकरी म्हणून निवड करण्यात
आली. विशेष म्हणजे मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन-एसटीचा मोफत पास आता एक वर्षा ऐवजी कायमस्वरूपी देण्याची उपमुख्यमंत्री शिंदे
यांनी घोषणा केली. एकादशीमुळे पंढरपूरात पहाटेच
लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांतून सुमारे
आठ लाख भाविक पंढरपूरात दखल झाले असून ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने परिसर
दुमदुमला आहे.राज्यातल्या विविध विठ्ठ्ल-रुख्मिणी मंदीरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी
केली आहे.
****
भारतीय आंतराळ संशोधन संस्था - इस्रोतर्फे आज आंध्र
प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन केंद्रातून सीएमएस - थ्री हा उपग्रह दुपारी
चार वाजून ५६ मिनिटांनी प्रक्षेपित होणार आहे. दुरसंचार क्षेत्रात
या उपग्राहाद्वारे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा असून,देशाच्या सभोवताली लाभलेल्या समुद्रात अगदी दुरच्या क्षेत्रातही
याद्वारे संपर्क विनाबाधित सुरळीत होईल यामुळे भारतीय नौदलासाठी विशेष बाब ठरणार आहे.
****
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार' विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड
करून ते पाठविण्यात येतात. यंदा 'फिल्म बाजार - २०२५'साठी संकेत माने दिग्दर्शित 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' आणि मिलिंद कवडे दिग्दर्शित 'श्री गणेशा' या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या
व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली आहे.
****
सातारा जिल्ह्यातील, फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथकाची
नेमणूक करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची
नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज गुप्ता यांनी केली. तेजस्वी सातपुते यांनी काल
फलटण इथं जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
****
६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन
होत आहे. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या २४ आकाशवाणी केंद्रांवर हिंदुस्तानी, कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत
तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. हिंदुस्थानी
शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद
अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आज आपली कला सादर करतील. २९ नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम
सुरू राहील.
****
बहारीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये
भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४८ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये मुष्टीयुद्ध
स्पर्धेत पुण्याच्या चंद्रिका पुजारीने ५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं.
****
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम फेरीत
भारत-दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर दुपारी
तीन वाजता सामना सुरु होईल.याद्वारे महिला क्रिकेट विश्वाला नवा विश्वविजेता मिळणार
आहे. दरम्यान आज भारताच्या पुरुष संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट इथं टी-ट्वेंटी
मालिकेतला तिसरा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी पावणेदोन वाजता
सुरु होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना पावसानं रद्द झाल्यानं ऑस्ट्रेलिया
एक -शुन्यनं आघाडीवर आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील
खांडबारा आणि आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांमध्ये आदिवासी कोकणी समाजाचा पारंपरिक डोंगरयादेव
उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. सकाळपासूनच गावागावांतून ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक पोशाखातील महिला-पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने
वातावरण मंगलमय होत आहे.
****
येत्या दोन दिवस संपूर्ण कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं
व्यक्त केला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा-कंधार विधानसभा मतदार संघातील दोन्ही शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या
प्रयत्नातून जवळपास दहा कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामं केली जाणार आहेत. कंधार शहरातील छत्रपती शिवाजी
महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर स्मारक, लोकशाहीर आण्णाभाऊ
साठे स्मारक परिसर सुशोभीकरण केलं जाईल. शांतीदूत दिवंगत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानाचा विकास करणं, दर्गापुरा इथं सिमेंट रस्ते बांधकाम,तसंच लोहा शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात उद्दान
विकासित केलं जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment