Monday, 3 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५ चं उद्घाटन करण्यात आलं. सरकारनं एक लाख कोटी रुपयांची संशोधन विकास नवोन्मेष योजना सुरू केली आहे, त्याचा पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. सरकारनं गेल्या दशकात व्यवसाय सुलभेला प्राधान्य दिलं आहे. त्यातून स्टार्ट अप, सेमी कंडक्टर, हरित ऊर्जा या क्षेत्रांचा विकास होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

खासगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये परिवर्तनाची शक्ती आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फायदेशीर ठरावी, यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानांतर्गत १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली असल्याचं त्यांनी सांगितलं, ते म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची याप्रसंगी उपस्थिती होती. शिक्षण तज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार मधल्या तीन हजारापेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे.

****

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महिला क्रिकेट संघाचं विश्वविजेतेपदाबद्दल अभिनंदन केलं. हे यश प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज संबोधित केलं. राज्यानं मानवी विकास निर्देशांकांच्या अनेक निकषांवर सुधारणा केली असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात महिला शिक्षणाची व्याप्ती वाढली असून, माता आणि बालमृत्यू दर कमी झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात मिर्झागुडा-खानपूर रोडवर आज सकाळी झालेल्या ट्रक आणि बस अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद रस्त्यावर हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपये, तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

****

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी सहा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळं राजकीय प्रचारसभांना वेग आला आहे. काल भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही काल खगरिया इथं प्रचारसभा झाली.

****

वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरात काल पोलिसांनी केलेल्या कारवाईत २० लाख रूपयांचा अंमली पदार्थ आणि बनावट नोटांचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन किलो अंमली पदार्थ, ३७८ पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, एक चार चाकी गाडी, दोन मोबाईल, असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

****

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फलटण इथल्या आत्महत्याग्रस्त डॉक्टरच्या कुटुंबीयांची बीड इथं भेट घेतली. या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

जालना शहरात नंदनवन कॉलनी इथं सार्वजनिक सभामंडपाच्या बांधकामाचं भूमिपूजन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसारच जलद गतीनं काम करत असल्याचं खोतकर यावेळी म्हणाले.

****

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत काल धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं तीन मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झालं. यामुळं सहा गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार असल्याचं रावल यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment