Monday, 3 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      विज्ञान आणि नवोन्मेषाचं लोकाभिमुख रूप हे भारताच्या प्रगतीचं बळ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन; संशोधन तसंच विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या योजनेचा प्रारंभ

·      सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

·      परभणी जिल्ह्यातल्या २६५ अंगणवाड्यांचं रूपांतर स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार

आणि

·      नांदेड शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम; मराठवाड्यात लातूर, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी

****

विज्ञान आणि नवोन्मेषाचं लोकाभिमुख रूप हे भारताच्या प्रगतीचं बळ असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून, जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भारतात असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्टार्टअप, सेमीकंडक्टर आणि हरित उर्जा क्षेत्रात देशानं गेल्या दशकात मोठी प्रगती केल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये परिवर्तनाची शक्ती आहे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फायदेशीर ठरावी, यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानांतर्गत १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजनेचाही प्रारंभ केला. खासगी क्षेत्राकडून संचलित केल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती, राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या जानोरी, कोरटे परिसरातल्या भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी आज पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकसानीबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन त्यांनी दिलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक येणार असल्याचंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.

****

महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीचं मूळ असून, एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. एकल महिला स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगल्या पाहिजेत, ही राज्य शासनाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत द्यावी, तसंच त्यांना घरकुल योजनेअंतर्गत प्राधान्यानं लाभ मिळावा यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर फ्री अभियानाचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला.

****

दरम्यान, पुणे इथं आज पवार यांच्या उपस्थितीत इंडियन डेंटल असोसिएशन, जिल्हा परिषद आणि औंध जिल्हा शासकीय रुग्णालय, यांच्यात बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

****

विरोधकांची शुद्ध मतदार याद्यांबाबत प्रामाणिक भावना असेल, तर त्यांनी मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षणाला आपला पाठिंबा जाहीर करावा, असं आवाहन भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

बाईट – आशिष शेलार

 

महाविकास आघाडीच्या मोर्चात ठाकरे बंधूंनी मतदार यादीतल्या दुबार अल्पसंख्याक समुदायातल्या मतदारांचा उल्लेख केला नसल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला. मतदार याद्या शुद्घ असल्या पाहिजेत असा भाजपाचा आग्रह असल्याचं ते म्हणाले.

****

राज्य शासनाच्या स्मार्ट अंगणवाडी साहित्य खरेदी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या २६५ अंगणवाड्यांचं रूपांतर स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. या योजनेद्वारे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी आवश्यक असणारं आधुनिक साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण - दिशा समितीची बैठक पार पडली. खासदार संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. सध्या शहरात सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजना, घरकुल योजना, जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्याचे निर्देश भुमरे यांनी दिले.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या वर्षीच्या हिवाळी परीक्षा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले नसतील, अशा विद्यार्थ्यांसाठी एका दिवसासाठी ऑनलाइन लिंक सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. उद्या मंगळवारी महाविद्यालयीन स्तरावर अतिरिक्त शुल्कासह कार्यालयीन वेळेत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरून घ्यावेत, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनानं केली आहे.

****

फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या आत्महत्याग्रस्त डॉ. संपदा मुंढे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी, छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकी रुग्णालयात आज मार्ड संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत विलेपार्ले इथल्या कूपर रुग्णालयातही आज निवासी डॉक्टरांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी, डॉक्टरांची सुरक्षितता आणि प्रशासकीय जबाबदारीबाबत ठोस उपाययोजना कराव्या आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात डॉक्टरांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

****

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज पार पडला. सहा तक्रार अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जावर सुनावणी घेऊन संबधित विभागास १५ दिवसात संबधित प्रकरणं निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाकधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातही आज झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांकडून २५ तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती, सामान्य शाखेच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी दिली.

****

नांदेड शहरात आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. दुपारच्या सुमारास जवळपास अर्धा जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरु असल्यानं धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे आज अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, चार हजार २२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं आणि विद्युत निर्मिती केंद्रासाठी २७०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, मराठवाड्यात लातूर, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

****

No comments:

Post a Comment