Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 November 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
वंदे मातरम् हा एक मंत्र, एक
ऊर्जा, एक स्वप्न आणि एक संकल्प-पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
देशभरात शैक्षणिक संस्थांसह
ठिकठिकाणी वंदे मातरम् गीताचं सामुहिक गायन
·
दुष्काळी भागात मनरेगाचा ६५
टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी-केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा
आणि
·
भटक्या कुत्र्यांच्या
नियमनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून अनेक मार्गदर्शक सूचना जारी
****
वंदे मातरम् हा एक मंत्र, एक ऊर्जा, एक
स्वप्न आणि एक संकल्प असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून देशभरात
सुरु झालेल्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, दिल्लीच्या
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी उपस्थित होते.
वंदे मातरम हे गीत म्हणजे भारतमातेची भक्ती आणि आराधना असून, हे
गीत आपल्याला इतिहासात परत घेऊन जातं, वर्तमानात आत्मविश्वास
जागवतं आणि भविष्यासाठी नवीन धैर्य निर्माण करतं, असं पंतप्रधानांनी
नमूद केलं. या गीताचा भावार्थ विषद करताना पंतप्रधान म्हणाले –
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
वंदे मातरम् या गीताला दीडशे
वर्षं पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या गीताचं स्मरण केलं
आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिभेतून साकारलेलं हे गीत भारतीयांना एका
सूत्रात बांधून ठेवत आलं आहे आणि यापुढेही ठेवेल, असं
त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
देशभरात ठिकठिकाणी वंदे मातरम् गीताचं सामुहिक गायन करण्यात
आलं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातल्या
त्रिमूर्ती प्रांगणात ‘वंदे मातरम्’चं सामूहिक गायन करण्यात आलं. सांस्कृतिक कार्य
मंत्री आशिष शेलार,
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.
वंग-भंग चळवळीच्यावेळी वंदे मातरम हे प्रेरणा गीत झाल्याचं सांगत, स्वातंत्र्य
मिळताना जी भावना तयार झाली, तीच भावना या गायनाद्वारे संपूर्ण
भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. वंदे मातरम् हे
केवळ गीत नाही,
तर देशाला जोडणारी, एकसंध ठेवणारी भावना
असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौकात वंदे मातरम गीताचं
सामूहिक गायन करण्यात आलं. यावेळी दोन हजारांहून जास्त
विद्यार्थ्यांनी या गायनात भाग घेतला. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत
कराड,
मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय केणेकर यावेळी उपस्थित
होते.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथल्या स्वातंत्र्य सेनानी
पुंडलिक हरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वंदे मातरम गीतगायन उत्साहात
पार पडलं. बदनापूर इथल्या पाथ्रीकर कॅम्पस मध्ये झालेल्या वंदे मातरम गायन
उपक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातही वंदे मातरम् या
गीताचं सामुहिक गायन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार
पडलं.
परभणी शहरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात
सामूहिक वंदे मातरम् गीत गायन करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम् लघु नाटिकाही सादर
करण्यात आली. हिंगोली इथल्या जिल्हा परिषद मैदानावरही या गीताचं गायन करण्यात आलं.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता,
क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यासह शालेय विद्यार्थी
यावेळी उपस्थित होते.
नांदेड शहरात श्री गुरूग्रंथ साहिबजी भवनात हजारो
विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरम् गीत गायन करण्यात आलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासह
जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा, महाविद्यालयं, शासकीय
कार्यालयं आणि सार्वजनिक स्थळी सकाळी १० वाजता एकाच वेळी “वंदे मातरम्” गीताचे
सामुहिक गायन करण्यात आलं.
बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलात वंदेमातरम गीताचा सामुहिक
गान कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत झालेल्या
कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागी झाले.
****
दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा
योजनांसाठी खर्च केला जाईल,
अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी
केली आहे. ते आज बीड जिल्ह्यात शिरसाळा इथं शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.
शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की, एकाही शेतकऱ्याला आत्महत्या
करावी लागू नये,
हे आपलं उद्दीष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते
म्हणाले –
बाईट - केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह
चौहान
ग्लोबल विकास ट्रस्टनं केलेलं काम पाहिल्यानंतर
शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच आर्थिक क्रांती घडू शकते हा विश्वास वाटत असल्याचं
कृषीमंत्री चौहान यांनी नमूद केलं. केंद्र सरकार ग्लोबल विकास ट्रस्टसोबत मिळून
काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी
यांनी यावेळी बोलताना,
केंद्र सरकारनं संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर
द्यावा अशी विनंती केंद्रीय कृषिमंत्र्यांना केली.
****
भटक्या कुत्र्यांच्या नियमनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं
आज अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप
मेहता आणि एन.व्ही.अंजारिया यांच्या पीठानं या मुद्द्याची स्वत:हून दखल घेत, सार्वजनिक
स्थळांमध्ये अशा कुत्र्यांचा प्रवेश होऊ नये, यासाठी, शैक्षणिक
संस्था, रुग्णालयं,
क्रीडांगणं, बस आणि रेल्वे स्थानकं
यांना कुंपणं घालण्याचे निर्देश दिले. स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी अशा
प्राण्यांचं लसीकरण आणि निर्बीजीकरण करून त्यांच्या ठरलेल्या आश्रयस्थानांमध्ये
सोडणं सुनिश्चित करण्याचे निर्देश न्यायालयानं सगळ्या राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांच्या सचिवांना दिले असून, ही कामं न झाल्यास त्याला हे अधिकारी
जबाबदार राहतील,
असं बजावलं आहे.
****
छप्पन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी, येत्या
वीस ते अठ्ठावीस तारखांदरम्यान गोव्यात पणजी इथे होणार आहे. माहिती आणि प्रसारण
राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे
यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा इथल्या अतिवृष्टीबाधित
शेतकऱ्यांशी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात पिंगळी इथंही ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी
संवाद साधल्याचं वृत्त आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या
हत्येचा कट रचल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला
आहे. ते आज अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. गाडीचा अपघात घडवून
आपल्याला जीवे मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली, असा
दावाही जरांगे यांनी केला आहे.
दरम्यान, जरांगे यांच्या या प्रकरणाची सीबीआय
चौकशी करावी,
अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज परळीत
घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी, आपली तसंच जरांगे यांची
ब्रेन टेस्ट करावी अशी मागणीही केली आहे.
****
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या
पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं.
त्या ७१ वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी हिंदी, मराठी, बंगाली, उडिया
आणि गुजराती भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सत्तरच्या दशकात उलझन, संकोच, हेराफेरी, अपनापन, खानदान, धरमकांटा
अशा विविध हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या.
****
ज्येष्ठ सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि पुण्याच्या आयुका
संस्थेचे माजी संचालक नरेश दधिच यांचं काल चीनमध्ये बीजिंग इथे निधन झालं. ते
एक्क्याऐंशी वर्षांचे होते. एका परिषदेसाठी बीजिंगला गेले असताना त्यांची प्रकृती
खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
****
भारतीय महिला संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती
मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयांचा
धनादेश, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment