Friday, 7 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रीय गीत वंदे मातरम ला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून देशभरात उत्सव साजरा करण्यात येत आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिभेतून साकारलेलं “वंदे मातरम” हे अजरामर गीत आहे. संन्यासी बंडाच्या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत असलेल्या या गीतानं भारताला स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी घोषणा दिली. १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच हे गीत गायलं, आणि १९५० मध्ये ते भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करण्यात आलं.

यानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं.

**

वंदे मातरम हा केवळ शब्दसंग्रह नसून भारताच्या आत्म्याचा स्वर आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम देशवासीयांच्या हृदयात राष्ट्रवादाची ज्योत प्रज्ज्वलित करत आजही युवांमध्ये एकता, राष्ट्रभक्ती, आणि नवउर्जेचा स्रोत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

**

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात ‘वंदे मातरम’चं सामूहिक गायन करण्यात आलं.

हिंगोली इथल्या जिल्हा परिषद मैदानावरही या गीताचं गायन करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम् गीता संदर्भात सखोल माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यासह शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

****

भारतीय हॉकीच्या गौरवशाली शतकपूर्तीनिमित्त आजपासून देशभरात समारंभ होत आहेत. या महोत्सवात देशभरातल्या साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये हॉकीचे चौदाशेहून अधिक सामने खेळवले जाणार आहेत. आज सकाळी नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडासंकुलात झालेल्या मुख्य समारंभात केंद्रीय मंत्री संघ आणि भारताच्या राष्ट्रीय हॉकी संघातल्या पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मिश्र संघात एक प्रदर्शनीय सामना झाला. आठ ऑलिंपिक सुवर्ण पदकं जिंकलेल्या भारताला जगातल्या सर्वात यशस्वी हॉकी राष्ट्राचा दर्जा मिळालेला आहे.

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान ते अरणपूर गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून, आसपासच्या पायाभूत सुविधांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते घरकुल गृहनिर्माण प्रकल्पाला भेट देऊन लाभार्थी कुटुंबं आणि स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधतील. याशिवाय खानगाव-तपोवन मार्गावरील पूल आणि जवळच्या बोअरवेलच्या नुकसानीचा आढावाही चौहान घेणार असल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

निवडणूक आयोगाच्या आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाअंतर्गत सहा देशातल्या प्रतिनिधींनी काल बिहारमध्ये मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेचं निरीक्षण केलं. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक आयोग करत असलेल्या उपाययोजनांची या प्रतिनिधींनी प्रशंसा केली.

****

पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याप्रकरणात तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं निलंबन करण्यात आलं असून, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या व्यवहाराची महसूल आणि भूमिअभिलेख विभागाकडून संपूर्ण माहिती मागवली असून, अनियमितता असेल तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही मात्र या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन माध्यमांसमोर वस्तुस्थिती ठेवू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली.

****

किनारपट्टी, बंदरं आणि महासागर अभियांत्रिकी या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेला काल पुण्यात खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेत सुरुवात झाली. दीनदयाळ बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. भारताच्या विकासासाठी समुद्राचा प्रभावी वापर आवश्यक आहे. यासाठी बंदरांचं आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आसल्याचं मत सुशील कुमार सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि त्यांच्या हत्येचा कट रचल्याबाबत पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. यासंदर्भात जरांगे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची सहकाऱ्यांसह भेट घेऊन तक्रार दिली. हत्येच्या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.

****

No comments:

Post a Comment