Saturday, 8 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथे चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. या नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रादेशिक गतीशीलता वाढेल आणि अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळणार आहे. वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट आणि खजुराहो या ऐतिहासिक स्थळांना या रेल्वे जोडतील. या रेल्वेंमुळे प्रवाशांच्या प्रवासातील वेळेची बचत होतानाच पर्यटन आणि रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत.

****

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर इथे आज वार्ताहरांशी ते बोलत होते. या प्रकरणातील कराराची नोंदणी पूर्ण झाली आहे, मात्र फक्त पैशांचा व्यवहार प्रलंबित आहे. आता दोन्ही पक्षांनी नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. नोंदणी रद्द करण्यासाठी विहित शुल्क भरावं लागणार असून, त्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक ती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं.

या प्रक्रियेने दाखल केलेला फौजदारी खटला बंद होणार नाही. या प्रकरणात अनियमितता झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, समांतर चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल एका महिन्याच्या आत प्राप्त होईल. प्रकरणाची व्याप्ती आणि  संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या संपूर्ण व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील पदवीधर मतदार संघ, तसंच पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी पात्रता-अपात्रतेचा निर्णय घेतील. त्यानुसार २५ नोव्हेंबर  रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. यानंतर २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे आणि हरकती सादर करता येतील. ६ नोव्हेंबरनंतरही पदवीधर आणि शिक्षकांना  मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल.

१० डिसेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध असून mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत, असं  आवाहन  निवडणुक आयोगाने केलं आहे.

****

ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात विशेष कॅम्पचं आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात १ हजार ३५५ गावांमध्ये ६ लाख ३१ हजार ७८ शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ३१३ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. तर ४८ हजार ३५५ ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीस मान्यता मिळालेली नाही.

जिल्ह्यात अद्याप १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही. त्यामुळे त्यांच्या अनुदानाबाबत प्रक्रिया होत नसल्याची बाब लक्षात घेऊन या विशेष कॅम्पचं नियोजन करण्यात आलं असून उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्रही सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

****

दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट ७८२१९२२७७५ क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’ उपलब्ध करून देणं, हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून ‘भाषिणी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, टाईप करणे शक्य नसलेल्या व्यक्ती आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजी भाषेत फक्त आवाज रेकॉर्ड करून पाठवू शकतात. आणि संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासात तक्रारीची दखल घेणं बंधनकारक असणार आहे, असं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.

****

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता ब्रिस्बेनमधे हा सामना सुरू होईल. भारत या मालिकेत २-१ अशा गुणफरकाने आघाडीवर आहे.

****

No comments:

Post a Comment