Saturday, 8 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान-केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती

·      शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांची संख्या दुप्पट

·      सायबर फसवणूक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक

·      ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने दोन एक ने जिंकली

आणि

·      राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विधायक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

****

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज सिरोंचा इथं एका रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेचा अधिकार असून गडचिरोलीतही शेवटच्या नागरकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचल्याने, जिल्ह्याचं चित्र बदलत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली हा जिल्हा देशाचं स्टील हब आहे. इथं पाच कोटी झाडं लावून वृक्ष आच्छादन वाढवायचं आहे, जल, जमीन आणि संवर्धन करुन विकास साधण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा राज्य निवडणूक आयोगाने दुप्पट केली आहे. पूर्वीच्या २० ऐवजी आता ४० प्रमुख प्रचारकांना निवडणूक प्रचारात उतरता येणार आहे. गेल्या महिन्यात आयोगाच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली होती. सर्व राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सायबर फसवणूक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक केली आहे. प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीने आतापर्यंत सुमारे ८४ कोटी रुपयांची फसवणूक केली असून, यासाठी देशभरात विविध बँकांची तब्बल ८८६ खाती वापरल्याचं तपासात निष्पत्र झालं आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टलवर दाखात झालेल्या सुमारे ४०० तक्रारींचा छडाही यामुळे लागला आहे. या कारवाईत ५२ मोबाईल फोन, सात लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड, ६४ पासबुक आणि टाटा सफारी स्टॉर्म कार असा एकूण १८ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील बहुतांश आरोपी छत्तीसगड, बिहार तसंच दिल्ली इथले असून, महाराष्ट्रात तळ ठोकून ते देशभरात फसवणूक करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

****

ऑस्ट्रेलियात झालेली पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने दोन एक अशी जिंकली आहे. मालिकेतल्या पहिल्या सामन्याप्रमाणेच आजचा अखेरचा पाचवा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या नाबाद ५२ धावा झाल्या असतांना, पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अभिषेक शर्मा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

बुद्धिबळपटू राहुल व्ही एस याला भारताचा ९१ वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आहे. सहावी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानं फिडे अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघानं राहुलला ग्रँडमास्टर हा किताब दिला आहे. आठवड्यापूर्वीच चेन्नई मधला इलमपथी ए आर भारताचा ९० वा ग्रँडमास्टर बनला तर त्याआधी एस रोहित कृष्णाला देखील हा किताब मिळाला. बुद्धिबळ क्रमवारीत ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे.

****

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसंच पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २५ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. १० डिसेंबरपर्यंत नागरिकांना या यादीविषयी दावे आणि हरकती सादर करता येतील. ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

****

आचारसंहिता अंमलबजावणी आणि पारदर्शकतेला प्राधान्य देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. ते आज नगर परिषद तसंच नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या आढावा बैठकीत बोलत होते. या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

****

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड रक्कम जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षी साखर इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

****

राज्य शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार आज जाहीर झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगीता अरविंद मालकर तसंच सवित्रा प्रशांत गायकवाड तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील नीता पंत, जागृती फाटक आणि विधीज्ञ क्षमा बासरकर-धर्मपुरीवार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गेल्या चार वर्षांसाठीचे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

****

राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढत आहे. आज राज्यात जळगाव इथं सर्वात कमी १० पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल महाबळेश्वर इथं १३ अंश तर नाशिक तसंच अमरावती इथं साडे तेरा अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथंही साडे १३ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं १४ पूर्णांक दोन अंश, तर परभणी इथं १४ पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या इतर भागातही तापमानात मोठी घट झाल्याचं हवामान विभागाच्या आजच्या अहवालातून दिसून येत आहे.

****

ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात विशेष कॅम्पचं आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात एक हजार ३५५ गावांमध्ये ६ लाख ३१ हजार ७८ शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ३१३ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. तर ४८ हजार ३५५ ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीस मान्यता मिळालेली नाही.

जिल्ह्यात अद्याप १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही. त्यामुळे त्यांच्या अनुदानाबाबत प्रक्रिया होत नसल्याची बाब लक्षात घेऊन या विशेष कॅम्पचं नियोजन करण्यात आलं असून उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्रही सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील काही प्रवासी गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जनरल कोचेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नांदेड - मनमाड, पूर्णा - आदिलाबाद, परळी-आदिलाबाद, परळी-अकोला तसंच पूर्णा परळी या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना आता १२ ऐवजी १६ डबे असतील. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

हिंगोली ते नांदेड या महामार्गाने जात असलेल्या एका भल्या मोठ्या कंटेनरने आज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ट्रकने पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.

****

No comments:

Post a Comment