Sunday, 9 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून, लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; मुंबईत एसएनडीटी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन

·      बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सपंला; ११ नोव्हेंबरला मतदान

·      भारतीय हवाई दलाच्या ९३ व्या वर्धापन दिनानिमित्त अभूतपूर्व कौशल्याचं सादरीकरण

·      क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक ‘क्यू- बीट्स’ विकसित करण्यात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांना यश

आणि

·      आयसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन संशयितांना गुजरातमध्ये अटक

****

नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून, लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवनवीन कल्पना आणि नवीन संशोधनाला उद्योजकतेमधे रुपांतरित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष स्टार्ट अप धोरण जाहीर केलं असून, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याकरता विशेष निधी उभारला आहे असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून त्यापैकी ४५ टक्के महिला उद्योजिकांच्या नेतृत्वाखालील आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वतःमधल्या सुप्त क्षमतेला ओळखून प्रत्येक क्षेत्रात आपली सर्वोत्तम कामगिरी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात अत्याधुनिक पॉलिमर केमिस्ट्री संशोधन प्रयोगशाळेची आज स्थापना करण्यात आली. विद्यापीठात प्रथमच उद्योगसमूहांच्या सामाजिक दायित्व अंतर्गत, बाह्य निधीतून प्रयोगशाळेचं नूतनीकरण करण्यात आलं असून, यामुळे उद्योग-शैक्षणिक सहकार्य मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होणार आहे. युरोफिन्सच्या सीएसआर सहाय्याने झालेली ही प्रयोगशाळा विद्यापीठासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. अशा उपक्रमांमुळे वैज्ञानिक क्षमतेत वृद्धी होऊन, संशोधकांना प्रेरणा मिळेल, तसंच शाश्वत विकासासाठी मोलाचं योगदान मिळू शकेल, अशी आशा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.

****

बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज सपंला. दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मंळवारी ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. एक हजार ३०२ उमेदवार रिंगणात उतरले असून, तीन कोटी सत्तर लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १४ नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या.

दरम्यान, मतदानाच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपॅट पावत्या उघड्यावर आढळल्याप्रकरणी सहायक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

****

उत्तराखंड राज्याचा २५ वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घघाटन केलं. तसंच प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६२ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. गेल्या २५ वर्षात उत्तराखंडचं चित्र पूर्णपणे पालटलं असून, विविध क्षेत्रातल्या उत्तराखंडच्या यशोगाथा इतरांना प्रेरित करतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. उत्तराखंडने पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यात भरीव कामगिरी केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवार पासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-२ या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. भूतानचे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात तसंच जागतिक शांती प्रार्थना महोत्सवातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

****

भारतीय हवाई दलाच्या ९३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज गुवाहाटीमध्ये अभूतपूर्व कौशल्याचं सादरीकरण झालं. ईस्टर्न एअर कमांड आयोजित या भव्य हवाई शोमध्ये ब्रह्मपुत्र नदीवरील लाहित घाट परिसरात २५ हून अधिक रचनांमध्ये ७५ पेक्षा जास्त विमानं आणि हेलिकॉप्टर सहभागी झाले होते. या प्रभावी संचलनात सहभागी विमानांमध्ये, राफेल, सुखोई-30, मिग-29, अपाचे, मिराज, जॅग्वार, एमआय-17, अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर एमके-1 आणि सूर्य किरण एरोबॅटिक टीम यांचा समावेश होता. देशाच्या सुरक्षेचं आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या भारतीय हवाई दलाच्या या शौर्यदर्शनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

****

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, अद्ययावत संगणकीकरणासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या, क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक ‘क्यू- बीट्स’ विकसित करण्यात पुणे इथल्या आयसर- भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. औषधनिर्माण, संरक्षण, हवामान, वित्तीय प्रणाली, अवकाश आदी क्षेत्रातील अत्यंत जटिल आणि प्रगत संशोधनासाठी सुरक्षित आणि सक्षम पर्याय म्हणून ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ कडे पाहिलं जातं. जगात सध्या अमेरिका, युरोप, रशिया आणि चीनमध्ये यावर संशोधन सुरु असताना भारतानं या क्षेत्रात ही महत्वपूर्ण कामगिरी केली ही विशेष बाब असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाचा आज समारोप होत आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्याने आर्ट सर्कल या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या दाम्पत्याच्या दातृत्वाला सलाम करण्यासाठी सुनीताबाई-पु. ल.सेवाव्रती पुरस्कार चिपळूणच्या सांजसोबतया संस्थेला प्रदान करण्यात आला. माधुरी पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, कौशल इनामदार, वैभव जोशी अशा नामवंत कलावंतांचे कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते.

****

आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, गुजरात मधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून आज तीन जणांना अटक केली, आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते, असा आरोप आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

****

लातूर शहराजवळ नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गावर आज सकाळच्या सुमारास सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये गळती झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली. टँकरमधली गळती थांबवण्यात अग्निशमन दलालाही अपयश आल्यानं टँकरमधला दाब कमी होईपर्यंत वाहतूक बंदच होती. त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यवतमाळ इथं आज सकाळी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेतला होता.

****

नशामुक्त भारताचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी गोंदिया इथं आज ‘रन फॉर हेल्थ’ मेरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. “नशा मुक्त भारत - स्वस्थ भारत” असा नारा देत आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.

****

राज्य परिवहन महामंडळातर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येत आहे. यात बीड विभागातल्या ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचं तिसरं सर्वेक्षण १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, नाशिक इथली मूल्यांकन समिती हे सर्वेक्षण करणार आहे. यासंदर्भात विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबेजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी येथील आगार प्रमुखांना स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

****

सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहरात सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश, राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले. त्यांनी आज शहरात रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, श्री काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन त्यांनी पाहणी केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या गोलवाडी फाटा इथं एलपीजी रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment