Monday, 10 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

'सहकारिता कुंभ २०२५' या शहरी सहकारी कर्ज क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय शहरी सहकारी बँक आणि कर्ज संस्था महासंघ तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयानं पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या परिषदेत सहकारी क्षेत्रातील भारतीय संकल्पना, संस्कृती, जागतिक अपेक्षा आणि आत्मनिर्भर भारतचा संदेश जागतिक पटलावर मांडला जाईल. देशातल्या युवा पिढीला सहकार क्षेत्राशी जोडायचं आहे, सहकारी बँकांनाही पूर्णपणे आधुनिक बनवायचं असल्याचा मानस शहा यांनी यावेळी व्यक्त केला. स्वप्नांचं डिजिटलीकरण - समुदायांचं सशक्तीकरण हा या संमेलनाचा विषय आहे. नवोन्मेष आणि सामायिक दृष्टिकोनाद्वारे समुदायांना सक्षम बनवणं आणि देशातल्या आर्थिक समावेशनाचा सहकारी पाया मजबूत करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

****

३० वी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद आजपासून ब्राझीलमध्ये बेलेम इथं सुरू होत आहे. पॅरिस कराराची अंमलबजावणी, हवामान बदलाशी लढण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं आणि अनुकूलन योजना विकसित करणं यावर या परिषदेतली चर्चा केंद्रित असेल. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव या परिषदेत भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत.

****

देशात दहशतवादी कारवाया आणि कटकारस्थानांवर अंकुश ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणा, फरिदाबाद इथून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी साहित्य जप्त केलं आहे. या कारवाईत ३०० किलो RDX, AK-47 आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली. पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून ही सामग्री ताब्यात घेतली. आरोपी डॉ. मुजम्मिल याला अटक करण्यात आली आल्याचं, फरिदाबादचे पोलिस आयुक्त सतेंद्र कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

याच कारवाईच्या मालिकेत गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अहमदाबादमधून आयसिसशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे तिन्ही आरोपी देशभरात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा संशय आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-२ या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. भूतानचे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधान सहभागी होतील आणि भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांचीही भेट घेतील. यावेळी जागतिक शांती प्रार्थना महोत्सवातही ते सहभागी होणार आहेत.

****

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली. १७ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला, तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे.

****

बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका हा नेहमी दुष्काळी भाग. पण याच तालुक्यातल्या पाटसरा गावातल्या सनी सुभाष फुलमाळी या युवकाने बहरीनमधल्या वहहुँनमध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीला चितपट करून अल्पवयातच त्याने देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं. झोपडीत वाढलेला सनी आपल्या पाटसरा ते सुवर्णपदकाच्या प्रवासाबाबत आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला,

बाईट - सनी सुभाष फुलमाळी

****

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या रत्नागिरी तालुक्यातल्या गणेशगुळे या मूळ गावी त्यांच्यावरील शिलालेखाचं काल मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. राष्ट्रसेविका समिती आणि रत्नागिरीतल्या रेणुका प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या अलौकिक इतिहासाचं स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणं म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणं हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे. राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचं हे मोठं काम असल्याचं नीतेश राणे यावेळी म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोवर आणि रूबेला निर्मूलनासाठी सुरू असलेली लसीकरण मोहीम आता ३० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या मोहिमेला मुदत वाढ देण्यात आल्याचं आरोग्य विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment