Monday, 10 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

·      नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून, लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; मुंबईत एसएनडीटी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन

·      बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सपंला; उद्या मतदान

·      अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे अनंतराव भालेराव पुरस्कार प्रदान

आणि

·      नंदुरबार जिल्ह्यात देवगुई घाटात बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार

****

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घ्यायची शेवटची मुदत २१ नोव्हेंबर ही असून उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवडणुकीत एकंदर एक कोटी सात लाख तीन हजार ५७६ मतदार, सहा हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड करतील. निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला, तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे.

****

नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून, लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत काल श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवनवीन कल्पना आणि नवीन संशोधनाला उद्योजकतेमधे रुपांतरित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष स्टार्ट अप धोरण जाहीर केलं असून, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याकरता विशेष निधी उभारला असल्याचं ते म्हणाले. देशात सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून त्यापैकी ४५टक्के महिला उद्योजिकांच्या नेतृत्वाखालील आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वतःमधल्या सुप्त क्षमतेला ओळखून प्रत्येक क्षेत्रात आपली सर्वोत्तम कामगिरी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार काल संपला. दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. एक हजार ३०२ उमेदवार रिंगणात उतरले असून, तीन कोटी सत्तर लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १४ नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

प्रचाराच्या कालच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या.

दरम्यान, मतदानाच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपॅट पावत्या उघड्यावर आढळल्याप्रकरणी सहायक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

****

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४० स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेते, मराठा चेहरे आणि आक्रमक नेते यांचा समावेश आहे. नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला कमीतकमी १५० हुन अधिक जागा मिळवून देण्याचं   लक्ष्य ठरवण्यात आलं आहे.

****

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, अद्ययावत संगणकीकरणासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या, क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक ‘क्यू- बीट्स’ विकसित करण्यात पुणे इथल्या आयसर- भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. औषधनिर्माण, संरक्षण, हवामान, वित्तीय प्रणाली, अवकाश आदी क्षेत्रातील अत्यंत जटिल आणि प्रगत संशोधनासाठी सुरक्षित आणि सक्षम पर्याय म्हणून ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ कडे पाहिलं जातं. जगात सध्या अमेरिका, युरोप, रशिया आणि चीनमध्ये यावर संशोधन सुरु असताना भारतानं या क्षेत्रात ही महत्वपूर्ण कामगिरी केली ही विशेष बाब असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, गुजरात मधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून काल तीन जणांना अटक केली, आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते, असा आरोप आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

****

अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे अनंतराव भालेराव पुरस्कार काल छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्त न्यायमूर्ती सुनिल देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मराठवाडा वृत्तपत्रातले ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रिकर, निळू दामले आणि अरविंद वैद्य यांचा यावेळी गौरव करण्यात आला. गेल्या जून महिन्यात आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाली, त्या काळात वृत्तपत्रांच्या विचार आणि लेखन स्वातंत्र्याची गळचेपी झालेली असतानाही या कालखंडात निर्भीड पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून दिलेल्या या ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत असल्याचं निशिकांत भालेराव यांनी प्रास्ताविकात सांगितलं. पुरस्काराला उत्तर देताना या तिघांनीही आणीबाणीचा काळ संघर्षाचा असला तरी बहराचाही असल्याचं नमूद केलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाठ यांचं ‘आणीबाणी काल, आज आणि उद्याची’ या विषयावर व्याख्यान झालं.

****

नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातल्या देवगुई घाटात, शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार झाले, तर ५० पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेले आदिवासी समुदायाचे विद्यार्थी या बसमधून आश्रमशाळेत परतत होते. मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस खोल दरीत कोसळली. स्थानिकांनी दरीत उतरून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. जखमी असलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यापैकी २ ते ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाचा काल समारोप झाला. राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्याने आर्ट सर्कल या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या दाम्पत्याच्या दातृत्वाला सलाम करण्यासाठी 'सुनीताबाई-पु. ल.' सेवाव्रती पुरस्कार चिपळूणच्या 'सांजसोबत' या संस्थेला प्रदान करण्यात आला. माधुरी पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, कौशल इनामदार, वैभव जोशी अशा नामवंत कलावंतांचे कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते.

****

बीड जिल्ह्यातल्या गजानन सहकारी साखर कारखान्याच्या, सन २०२५-२६ चा मोळीपूजन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ काल आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासह परिसरातले ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

परभणी इथं काल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

****

लातूर शहराजवळ नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गावर काल सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये गळती झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली. टँकरमधली गळती थांबवण्यात अग्निशमन दलालाही अपयश आल्यानं टँकरमधला दाब कमी होईपर्यंत वाहतूक बंदच होती. त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळातर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येत आहे. यात बीड विभागातल्या ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचं तिसरं सर्वेक्षण आजपासून सुरु होत आहे. नाशिक इथली मूल्यांकन समिती २१ नोव्हेंबरपर्यंत हे सर्वेक्षण करणार आहे. यासंदर्भात विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबेजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी येथील आगार प्रमुखांना स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

****

सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहरात सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश, राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले. त्यांनी काल शहरात रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, श्री काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन त्यांनी पाहणी केली.

****

इजिप्तमध्ये सुरु असलेल्या आयएसएसफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात भारताच्या अनिश भानवाला याने रौप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक पिस्टल प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

****

राज्यातल्या हवामानात लक्षणीय घट दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. विदर्भात तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे थंडीची चाहूल जाणवू लागली असून, धुळ्यात काल आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. नाशिकमध्ये १२ पूर्णांक पाच, तर छत्रपती संभाजीनगर इथं काल १२ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment