Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
दिल्ली कार स्फोटात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. भूतानची राजधानी थिंफू इथं भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये
वांगचुक यांच्या ७०व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते.
दिल्लीत झालेल्या या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत पंतप्रधानांनी, आमच्या यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना शोधून काढतील, असं सांगितलं.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी
पंतप्रधान मोदी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे
यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या दौऱ्यामुळे भारत-भूतान संबंधांना नवी
ऊर्जा मिळेल,
असं पंतप्रधानांनी रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात
म्हटलं आहे. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान भूतानचे राजे जीग्मे खेसर नामग्याल वांगचूक
आणि पंतप्रधान तोबगे यांची भेट घेतील. या दौऱ्यात भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे
विकसित केलेल्या एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-दोन जलविद्युत
प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
दिल्ली कार स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेत आहेत.
या बैठकीमध्ये गृह सचीव, गुप्तचर विभागाचे संचालक, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक उपस्थित आहेत.
जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालकही या बैठकीत दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित
आहेत.
****
या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा होणारच, अशी
ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका बैठकीत बोलत
होते. तपास यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून, त्या
तपासाचे निष्कर्ष लवकरच सार्वजनिक केले जातील, असं
त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या स्फोटानंतर भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण विभागाने लाल किल्ला १३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं
जाहीर केलं आहे.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या
टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ३१ पूर्णांक ३८ टक्के
मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मतदान होत असून, एक हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही टप्प्याची मतमोजणी
येत्या १४ तारखेला होणार आहे.
****
देशाला हरित हायड्रोजनच्या उत्पादन, वापर
आणि निर्यातीचं जागतिक केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं,
केंद्रीय नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत हरित हायड्रोजन संदर्भातल्या तिस-या आंतरराष्ट्रीय
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हरित हायड्रोजनला केवळ एक पर्याय म्हणून
नाही,
तर गरज म्हणून पाहिलं पाहिजे, असं
मत जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत
आज होत आहे. महापालिकेतल्या ११५ सदस्यांमध्ये ५८ जागा महिलांसाठी राखीव तर इतर
मागास प्रवर्गासाठी ३१, अनुसूचित जातीसाठी २२ आणि
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित आहेत. राज्यातल्या इतरही
महानगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत आज काढण्यात येत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, नागरिकांना
दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सेवांसंबंधित माहिती आता व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे उपलब्ध
होणार आहे. सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाचं हे महत्त्वाचं
पाऊल आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं ९९ ६७ २० ०९ २५ हा
क्रमांक जारी केला असून, नागरिकांनी या सेवांचा लाभ
घ्यावा,
असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं तयार केलेलं हे चॅटबॉट पूर्णत: कृत्रिम
बुद्धिमत्ता आधारित आहे.
****
राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल
नक्षलवादी आणि दलम सदस्य वर्गेश उर्फ कोसा मंगलू उईका याने काल गोंदिया
पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्याच्यावर साडे तीन लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
No comments:
Post a Comment