Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 November 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
विद्यार्थ्यांच्या
दिशाभूलप्रकरणी फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाला नॅककडून नोटीस
·
दिल्लीत स्फोट घडवणारी
व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट
·
कुंभमेळ्याच्या
पार्श्वभूमीवर नाशिक इथं २० हजार कोटी रुपयांची कामं-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
मध्यप्रदेशातून मेफेड्रॉनची
तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसाकडून अटक
आणि
·
आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद
स्पर्धेत भारताची दोन सुवर्ण तसंच एका रौप्य पदकाची कमाई
****
चुकीच्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची दिशाभूल
केल्याप्रकरणी,
फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि
अधिस्वीकृती परिषद-नॅकने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या विद्यापीठाला नॅकची
कोणतीही मान्यता नसल्याचं,
तसंच याबाबतच्या कोणत्याही प्रक्रियेत हे विद्यापीठ सहभागी
नसल्याचं, नॅकनं म्हटलं आहे. या विद्यापीठांतर्गत परिसरात तीन महाविद्यालयंही सुरू
असल्याचं समोर आलं आहे. या विद्यापीठाच्या आवारातून आणखी एक कार पोलिसांनी ताब्यात
घेतली. हे वाहन,
संशयित शाहीन शाहीदच्या नावावर असल्याचं समजतं.
दरम्यान, दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी
व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे. स्फोटानंतर
त्याचा पाय स्टीअरिंग व्हील आणि अॅक्सिलरेटरमध्ये अडकला होता. त्याचा डीएनए नमुना
त्याच्या आईच्या नमुन्याशी जुळला असल्याची माहिती, दिल्ली पोलिसांनी
दिली.
****
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे.
विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्यात मतदान झालं. मतमोजणी प्रक्रियेत निष्पक्षता
आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण
नऊ कोटी ८४ लाख ९६ हजार ६२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्य निवडणूक
आयोगाने अद्ययावत यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यापूर्वीच्या म्हणजे राज्य
विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संख्येत सुमारे १४ लाख ७० हजार मतदारांची भर पडली
आहे. सर्वात जास्त नवीन मतदार ठाणे जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ६६६ इतके नोंदले गेले.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज
प्रत्यक्षात स्वीकारावेत,
अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. काँग्रेस पक्षाने
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचं पक्षाचे नेते
विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. उमेदवारांचा ऑनलाईन अर्ज हा २० पानी असून त्यात
गेल्या निवडणुकीत किती मते मिळाली, किती खर्च केला, अशी
माहिती मागितली आहे. हा अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असून, हे
अर्ज ऑनलाइन भरतांना अडचणी उभ्या राहत असल्याचं, वडेट्टीवार यांनी
सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक
चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रंपेट हे चिन्ह निवडणूक आयोगाने यादीतून बाद केलं
आहे. या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलेलं होतं. या चिन्हामुळे मतदारांचा
गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाने केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.
****
नाशिक-त्र्यंबकेश्वर इथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसंच राज्यसरकारकडून २० हजार कोटी
रुपयांपेक्षा अधिक विकासकामं केली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. आज नाशिक इथं सहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
केल्यानंतर बोलत होते. कुंभमेळा पूर्ण होईपर्यंत या कामांमध्ये आणखी पाच हजार कोटी
रुपयांची कामं वाढणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले
–
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ९९ कोटी
१४ लाख रुपये खर्चातून रामकुंड परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथाचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री
दादा भुसे तसंच अन्य मान्यवरही यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी
यावेळी बोलतांना यंदाचा कुंभमेळा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्याचं सांगत, विकास
कामांची तसंच सुविधांची गुणवत्ता उत्तम असण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. ते
म्हणाले –
बाईट
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने जगभरात क्रांती घडत असून
प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, असं
कौशल्य, रोजगार,
उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी
म्हटलं आहे. आज मुंबईत एआय वापर प्रशिक्षण वर्गाला भेट दिल्यानंतर लोढा बोलत होते.
‘एआय’ तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून
यामुळे पत्रकारांचा वेळ वाचणार आहे, हे लक्षात घेवून राज्यात
नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबवल्याचं लोढा म्हणाले.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा इथं नजरकैदेत ठेवण्यात
आलं होतं, ती वास्तू अधिग्रहित करून तिथे स्मारक उभारलं जाणार आहे. यासाठी आग्रा इथल्या
या जागेचं अधिग्रहण आणि संबंधित प्रक्रिया राबवण्याकरता उत्तर प्रदेश शासनाशी
समन्वय साधण्यासाठी ‘समन्वयक’ म्हणून
पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि
पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम
प्रतिनिधींशी बोलत होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून
शहरातल्या मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असून, हे काम अधिकाऱ्यांनी
राजकीय दबावाखाली केल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं, असे
निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत
होते. या परिसरात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यावेळी चर्चा
झाली.
****
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण
विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी
छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द करण्यात
आले. यामध्ये राज्यातल्या सुमारे एक हजार परवान्यांचा समावेश आहे. या कारवाईत ४१८
जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
मध्यप्रदेशातून मेफेड्रॉन या अमली पदार्थाची तस्करी
करणाऱ्या इम्रान उर्फ बब्बू खान याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने
अटक केली आहे. पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी आज माध्यम प्रतिनिधींना याबाबत
माहिती दिली. या चौघांकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह सुमारे
सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ४५० किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त
करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिकेचं नागरी मित्र पथक तसंच
पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत, एका रिक्षातून अवैधरित्या वाहतुक होत
असलेलं हे प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केलं.
****
डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय शेड्युल्ड ड्रग्ज अर्थात
प्रवर्गीय औषधांची विक्री करू नये, असे निर्देश लातूरच्या
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात औषध
विक्रेत्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. तरुण पिढी व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी
सहकार्य करण्याचं आवाहन घुगे यांनी केलं.
****
नगर परिषद तसंच नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र
दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
कन्नड इथं सहा,
पैठण इथं ११ तर वैजापूर नगर परिषदेसाठी १७ उमेदवारी अर्ज
प्राप्त झाले. या तिन्ही ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल
झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत
भारताने आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या कंपाऊंड सांघिक
प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, प्रितिका प्रदीप आणि दीपशिखा यांच्या
संघानं कोरिया संघाचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. तर मिश्र सांघिक प्रकारात
अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी बांग्लादेशचा पराभव करत सुवर्णपदक मिळवलं.
पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा, साहिल जाधव आणि
प्रथमेश फुगे यांच्या संघाला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
****
No comments:
Post a Comment