Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 November 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१४ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी
आज होत आहे. २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात
आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी १८३, तर महागठबंधन ५६ जागांवर आघाडीवर
आहे.
दरम्यान सात राज्यांमधल्या आठ विधानसभा मतदरासंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी
देखील आज होत आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधल्या बडगा म आणि नगरोटा, राजस्थानमधल्या अंता, झारखंड मधल्या घाटशिला, तेलंगणा मधल्या जुबली हिल्स, पंजाब मधल्या तरनतारन, मिझोराम मधल्या डम्पा आणि ओडिशामधल्या
नुआपाडा या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल
नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बालदिनही
आज साजरा होत असून, विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून
नेहरुंचं स्मरण केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात बालदिनानिमित्त
विविध शाळा आणि संघटनांच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
****
दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी
डॉ. उमर नबी याचं जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथलं घर आज उद्ध्वस्त करण्यात आलं. जम्मू
काश्मीरच्या सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या स्फोटात वापरण्यात आलेल्या गाडीचा चालक
डॉ. उमर नबी होता, हे डीएनए चाचणीतून स्पष्ट
झाल्यानंतर ही कार्रवाई करण्यात आली.
****
भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने
आठ चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल गॅबोरोन
संरक्षित अरण्यात या प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला. बोत्सवानाचे अध्यक्ष ड्यूमा
बोको यावेळी उपस्थित होते. बोत्सवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात
पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात ठेवलं जाईल.
****
आय एन व्ही ए आर रणगाडारोधी क्षेपणास्त्राच्या
खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने भारत डायनामिक्स लिमिटेडबरोबर करार केला. दोन हजार ९५
कोटी रुपयांच्या या खरेदीमुळे T-90 रणगाड्याची क्षमता वाढणार
आहे. स्वदेशी संस्थांकडून तंत्रज्ञान घेण्याच्या निर्णयामुळे आत्मनिर्भरतेचा उद्देश
साधला जाणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.
****
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या
सचिव आणि वस्त्रोद्योग समितीच्या अध्यक्ष नीलम शमी राव यांनी मुंबईत वस्त्रोद्योग संस्था, निर्यात परिषदा आणि संशोधन संघटनांच्या
कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी वैज्ञानिक, तांत्रिक आणि आर्थिक संशोधनातल्या
उद्योगाच्या वाढत्या गरजांवर भर दिला तसंच उद्योग आणि सरकार या दोघांच्याही आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रमांची पुनर्रचना करण्याची सूचना केली.
****
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती
आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक
ठिकाणी छापेमारी केली असून, सुमारे साडेतीन हजारांहून
जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईत ४१८ जणांच्या विरोधात एफआयआर दाखल
करण्यात आले आहेत. तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार दुकानांचे परवाने रद्द करण्यात
आले. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब, ओदिशा या राज्यात छापेमारी करण्यात
आली. या कारवाईमुळे खतांचा कृत्रिम तुटवडा आणि किमतीत केलेले फेरफार रोखता येतील.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या
हल्ल्यांना रोखण्यासाठी अत्याधूनिक यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन
आणि विकास समितीतून आठ कोटी १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी ही माहिती दिली. या निधीतून ३०० पिंजरे, ३०० ट्रॅप केमेरे, विविध रेस्क्यु उपकरणं दिले जाणार असून, २२ रेस्क्यु वाहनं तातडीने खरेदी
करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
****
लातूर इथं भारतीय जनता पक्षाकडून
आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. माजी मंत्री
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
****
बीड जिल्ह्याच्या आष्टी इथले दिवंगत
सैनिक अविनाश वायभसे यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
आले. पोलिस विभागातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. वायभसे यांचं परवा पुण्यात अल्पशा
आजाराने निधन झालं.
****
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत
भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी आणि पी. हरिकृष्णा यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश
केला आहे. अर्जुनने हंगेरीचे पीटर लेको आणि हरिकृष्णाने स्विडनच्या निल्स ग्रँडेलियस
यांचा पराभव केला. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा रशियाच्या डेनियल डोबोव याच्याकडून पराभूत
झाल्यानं या स्पर्धेतून बाहेर पडला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दोन
कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलकाता इथं आजपासून सुरु झाला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
****
No comments:
Post a Comment