Saturday, 15 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      मतदार याद्या दुरुस्तीच्या कामात सर्व राजकीय पक्षांनी योगदान देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन 

·      बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा २०२ जागांवर विजय; महाआघाडीला ३५ जागा

·      नगरपरिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज करता येणार

·      यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना प्रदान

·      ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वृद्धापकाळाने निधन

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दोन दिवस थंडीचा यलो अलर्ट

****

मतदार याद्या दुरुस्तीच्या कामात सर्व राजकीय पक्षांनी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल बिहार निवडणूक निकाल हाती आल्यानंतर, दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना पंतप्रधान संबोधित करत होते. आजचा तरुण मतदार याबाबत जागरुक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं, ते म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

आपलं सरकार युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छट पूजेचा समावेश करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. आपल्या देशासह संपूर्ण विश्वाने ही संस्कृती जाणून घेणं, हा यामागचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. बिहारच्या जनतेनं दिलेला हा जनादेश आपल्याला जनता जनार्दनाची सेवा करण्याची तसंच नव्या संकल्पांसह काम करण्याची शक्ती देणारा असल्याचं सांगत, पंतप्रधानांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएने विधानसभेच्या २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवलं. यामध्ये भारतीय जनता पक्षाने ८९ जागा जिंकल्या असून, संयुक्त जनता दलाने ८५ तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने १९ जागांवर विजय मिळवला.

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीला अवघ्या ३५ जागा मिळाल्या. यामध्ये राजदने २५ तर काँग्रेसने सहा जागांवर यश मिळवलं.

केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला पाच तर संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला चार जागा मिळाल्या.

इतर पक्षांमध्ये मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन-एमआयम पक्षानं पाच, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दोन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय समावेशी पक्ष तसंच बहुजन समाज पार्टीला एका जागेवर विजय मिळाला. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकही जागा मिळवता आलेली नाही.

****

देशभरातल्या आठ विधानसभांच्या पोटनिवडणुकांचे निकालही काल जाहीर झाले. यामध्ये भाजप तसंच काँग्रेस पक्षाने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला तर आम आदमी पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, मिझो नॅशनल फ्रंट तसंच पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला एका जागेवर विजय मिळाला.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विजयाबद्दल एनडीएच्या सर्व घटक पक्षांचं अभिनंदन केलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, तसंच लातूर इथं भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

****

नगरपरिषदा तसंच नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. आज शनिवारी तसंच उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशीही नामनिर्देशनपत्रं स्वीकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

****

अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेली शेतजमीन पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, आदी मोफत पुरवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. महसूल विभागाने याबाबतचं परिपत्रक काल जारी केलं. पाच ब्रास गौण खनिजासाठी स्वामित्वधनातून सूट मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उत्तर प्रदेशात नोएडा इथे सुतार यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला.

****

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. ‘बाल दिन’ ही काल साजरा झाला, मुंबईत राजभवनात पंडित नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं.

**

छत्रपती संभाजीनगर इथंही महापालिकेसह शैक्षणिक संस्थांमधून पंडित नेहरुंना अभिवादन करण्यात आलं. अनंत भालेराव विद्या मंदिर माध्यमिक शाळेत अनंतराव भालेराव यांची जयंतीही काल उत्साहात साजरी करण्यात आली.

****

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं मुंबईत राहत्या घरी वार्धक्याने निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत...

२४ फेब्रुवारी १९२७ रोजी लाहौर इथं जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी १९४६ साली प्रदर्शित झालेल्या नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. त्यानंतर १९४८ साली दिलीपकुमार यांच्यासोबतचा नदिया के पार, राज कपूर यांच्यासोबतचा आग तसंच देव आनंद यांच्यासोबतच्या शायर या चित्रपटापासून ते २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमीर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटापर्यंत कामिनी कौशल यांनी विविध भूमिका साकारल्या. नव्वदच्या दशकांत त्यांनी दूरदर्शनवरून लहान मुलांसाठी चांदसितारे या कळसुत्री बाहुल्यांच्या कथामालिकेसह खेलखिलौने, चंदामामा, हरी भरी फुलवारी आदी मालिकांचं सादरीकरण केलं. कामिनी कौशल यांनी मुलांसाठी लिहिलेल्या कथा अनेक बालमासिकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. कामिनी कौशल यांच्या निधनामुळे अभिनय क्षेत्रातल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

****

कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये कालपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावात गुंडाळला. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदासमोर त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहनं अवघ्या २७ धावा देत ५ बळी घेतले. मोहमंद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला.

कालचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३७ धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल १२ धावांवर तंबूत परतला, तर के एल राहुल १३ आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत आहेत.

****

साहित्य अकादमीचे बाल साहित्य पुरस्कार काल नवी दिल्लीत अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात मराठीसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. ताम्रपट आणि ५० हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

राज्यात आजपासून सोयाबीन, मूग उडीद खरेदी केंद्र सुरु होणार असून, बीड इथं २३ केंद्रांवर ही खरेदी होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत ११ हजार १४२ शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परवा १७ नोव्हेंबर पासून कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संपूर्ण तर शहरी लोकसंख्येतल्या जोखीमग्रस्त भागात हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात ९०० जनावरांना लंपी आजार झाला असून, ५८ जनावरं दगावली आहेत. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

****

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या रामसगाव आणि मानेपुरी जिल्हास्तरीय विजेत्या ग्रामपंचायतींची काल विभागीय तपासणी करण्यात आली. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी स्वच्छतेच्या उपक्रमात सातत्य ठेवण्याचं आवाहन विभागीय अप्पर आयुक्त सुषमा देसाई यांनी यावेळी केलं.

****

६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड इथं उद्यापासून येत्या २७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. नांदेडसह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होणार आहेत.

****

राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी ९ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल गोंदिया तसंच नाशिक इथं सुमारे साडे १० अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं ११ अंश, परभणी इथं साडे १२ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं १३ अंश, तर धाराशिव इथं १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या आणि परवा तर जालना तसंच बीडला परवा थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment