Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 November 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
महापालिका निवडणुका
महायुतीत लढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
·
छत्रपती संभाजीनगरमधे
वसंतराव नाईक,
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यांचं
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
·
शालेय सहलीसाठी राज्य
परिवहन महामंडळ नवीन बस उपलब्ध करून देणार
आणि
·
कोलकाता कसोटी क्रिकेट
सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव
****
राज्यात महापालिकांच्या निवडणुकीत शक्य तिथं भारतीय जनता
पक्षाची महायुती होईल,
अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती
संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असंही
त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. या निवडणुकांच्या जागावाटपाचे
निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी
महायुती झाली आहे,
काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र आले आहेत, तर
काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती झालेली नाही. यावर चर्चा सुरू आहे, असं
त्यांनी सांगितलं.
क्रांतीचौक इथं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्ध
पुतळ्याचं लोकार्पण आणि कमल तलाव पुनरुज्जीवनाच्या कामाचं लोकार्पणही फडणवीस यांनी
केलं. मुख्यमंत्र्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचं महत्त्व यावेळी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा सिडको बसस्थानक
चौकातला पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण
मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या जडणघडणीतील वसंतराव नाईक यांच्या योगदानाचा
मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरव केला. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथं
आगमनानंतर चिकलठाणा इथल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन
केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातारा परिसरातल्या श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय
आणि रुग्णालय तसंच संशोधन केंद्राच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.
****
राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य
परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा
हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या
दोशने एक्कावन्न आगारांमधून दररोज आठशे ते हजार बस उपलब्ध करून दिल्या जाणार
असल्याचं मंत्री म्हणाले. सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलीत बस उपलब्ध करून
दिल्यानं, महामंडळाला मागच्या वर्षी ९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
त्याअनुषंगानंच यावर्षी देखील या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा
यासाठी आगारप्रमुख,
स्थानकप्रमुख शाळा - महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि
प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक, ऐतिहासिक
पर्यटन स्थळांच्या सहलीचं आयोजन करण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहितीही परिवहन
मंत्री सरनाईक यांनी दिली.
****
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबर रोजी
झालेल्या स्फोटाचे धागेदोरे मिळवण्याचं काम तपास यंत्रणा करत आहेत. देशभरातल्या
विविध ठिकाणी अद्याप शोधमोहिमा, तपासण्या सुरू आहेत. दिल्ली गुन्हे
शाखेनं आज अल फलाह
विद्यापीठाविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रं तयार
केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल केले आहेत. दरम्यान, लाल किल्ला मेट्रो
स्टेशन प्रवाशांसाठी पुन्हा खुलं झालं आहे.
****
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या
चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या
तिघांवर १५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्तापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत, तसंच
एक
रायफल, इतर शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं जप्त
केली आहेत. तुमालपाड भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची खबर
मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दलाच्या एका पथकानं या भागात शोधमोहीम सुरू केली.
सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरु होती. सध्या या भागात
शोधमोहीम सुरू आहे.
****
राष्ट्रीय पत्रकारिता दिन आज साजरा होत आहे. प्रेस कौन्सिल
ऑफ इंडियाची स्थापना या दिवशी १९६६ मधे झाली होती. वर्तमानपत्रं आणि
प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते.
पत्रकारितेची स्वतंत्रता आणि जबाबदारी यांचं ते प्रतीक मानलं जातं.
पत्रकारितेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार या दिवशी प्रदान
करण्यात येतात. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित समारंभाला
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, उपस्थित
राहिले. पीसीआय च्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित
होत्या. लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं अश्विनी वैष्णव
यावेळी म्हणाले.
आजच्याच दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं पत्रकारितेमध्ये
जागल्याची भूमिका घेतली,
आणि पत्रकारितेचं स्वातंत्र्य जपणं, आणि
भारतीय पत्रकारितेचा दर्जा उंचावणं अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारली, असं
रंजना प्रकाश देसाई यांनी सांगितलं. पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी
आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच
सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं त्या म्हणाल्या.
****
राज्यपाल देवव्रत तसंच पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया
यांच्या प्रमुख उपस्थितीत आचार्य जवाहरलाल महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त
त्यांच्यावरील मुद्रा व टपाल तिकिटाचं प्रकाशन आज मुंबई इथं करण्यात आलं. आचार्य
जवाहरलाल यांनी देश पारतंत्र्यात असताना दहा हजारांहून
अधिक सत्संगाच्या माध्यमातून जनजागरणाचें कार्य केलं. त्यांनी
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांना प्रेरित केलं तसचं, बालविवाह, हुंडा
प्रथा, व्यसनाधीनता यांना तीव्र विरोध केला याचं स्मरण देताना त्यांच्यावरील नाणे व
टपाल तिकीट लोकांना त्यांच्या कार्याचे चिरंतन स्मरण देतील असं राज्यपाल कटारिया
यांनी सांगितलं.
****
कोलकाता इथं झालेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण
आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर ३० धावांनी विजय मिळवला, आणि
दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा
डाव कालच्या ७ बाद ९३ धावांवरून पुढे सुरू केला. आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा
बवुमा आणि कॉर्बिन यांनी ४४ धावांची भागीदारी केली.
मात्र बुमरानं कॉर्बिनला त्रिफळाचित करून ही जोडी फोडली. त्यानंतर दक्षिण
आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा, ५५
धावांची झुंजार खेळी करुन नाबाद राहिला. भारताचा रविंद्र जडेजा यानं सर्वाधिक चार, सिराज
आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर बुमराह आणि अक्षर
पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारतानं पहिल्या डावात ३० धावांची आघाडी
घेतली होती. त्यामुळं भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी १२४ धावांचं आव्हान मिळालं.
मात्र विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव गडगडला. दक्षिण आफ्रिकेचा
फिरकी गोलंदाज सायमन हारमर सामनावीर ठरला.
****
मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि
छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील, असा
हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिकमधील निफाडमध्ये आज आठ अशं तापमान नोंदवलं गेलं.
नाशिकमध्येही पारा आणखी घसरला असून,आज १०.१ अंश सेल्सीअस इतकं
तापमान नोंदवलं गेलं आहे. काल इथं १०.३ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली होती.
****
नाशिक वनवृत्तामधील नाशिक शहरासह, जिल्ह्यात
आणि अहिल्यानगर तसंच,
पुणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून
मानव-बिबट्या संघर्ष अधिकाधिक तीव्र झालेला पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर
उद्या पुणे इथं या तीनही जिल्ह्यांतील मुख्य वरिष्ठ वनाधिकाऱ्यांसोबत बैठक
बोलविण्यात आली आहे,
अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नाशिकमध्ये दिली.
तसेच बिबट्यांचा चिघळत जाणाऱ्या प्रश्नावर केंद्र सरकारसोबतदेखील चर्चा सुरू असून, त्यांच्याकडून
या तीन जिल्ह्यांपुरता तरी ठोस निर्णय लवकरचं घेतला जाईल, अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment