Friday, 21 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      बीएसएफला पुढच्या पाच वर्षांत जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दीष्ट-केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

·      पंतप्रधान पीक विमा योजनेत आणखी दोन प्रकारच्या नुकसानाचा समावेश- केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

·      दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षांसह सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड

·      संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी प्राण गमावलेल्या १०७ वीर हुतात्म्यांना सर्वत्र अभिवादन

आणि

·      बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपान्त्य फेरीत दाखल

****

सीमा सुरक्षा दल-बीएसएफला पुढच्या पाच वर्षांत जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दीष्ट असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या ६१व्या स्थापनादिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथे झालेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. पुढचं एक वर्षं सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि सैनिकांच्या कल्याणासाठी समर्पित असेल, असं शहा यांनी सांगितलं. सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्यनिष्ठेबाबत बोलतांना शहा म्हणाले -

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

या कार्यक्रमात सीमा सुरक्षा दलाने संचलनातून दिलेली मानवंदना शहा यांनी स्वीकारली. सीमा सुरक्षा दलाच्या हुतात्मा सैनिकांना अभिवादन करून हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकीटाचं शहा यांनी अनावरण केलं. यावेळी शहा यांच्या हस्ते बीएसएफ सैनिकांना शौर्य पदकं प्रदान करण्यात आली.

****

नवीन कामगार कायदे आजपासून लागू झाले. जुन्या कामगार कायद्यांना एकत्रित करून, तयार केलेले हे कायदे सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी कामाचे सुरक्षित वातावरण, कामाची जागा आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करतात. देशातल्या कामगारांसाठी एका नवीन युगाची सुरुवात यामुळे झाली आहे.

****

ॲग्रो व्हिजन हा ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. नागपूरमध्ये सोळाव्या ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानाचा समावेश करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री चौहान यांनी यावेळी दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

 

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

रस्त्यावरच्या खड्यांमुळे अपघाती मृत्यू अथवा इजा झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सबंधित विभागाची आहे. भंडारा इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलींदकुमार बुराडे यांनी ही माहिती दिली. अशा प्रकरणात जखमी किंवा मृतांच्या वारसांनी संबंधीत विभागाकडे अर्ज करावेत, असं आवाहन बुराडे यांनी केलं आहे. चौकशीअंती मृत व्यक्तींच्या वारसांना सहा लाख रुपये तर जखमींना ५० हजार ते अडीच लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. इतर कायद्यांअतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेपेक्षा ही नुकसान भरपाई वेगळी तसंच जादा असेल, अशी माहितीही देण्यात आली.

****

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यात नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक बिनविरोध निवड झालेली दोंडाईचा ही पहिली नगरपालिका ठरली आहे. या निवडीबद्दल धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुका आणि दोंडाईचा शहरात भाजपा पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेतून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२८वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत 1800 11 7800 या टोल फ्री क्रमांकावर कळवाव्यात. नमोअॅप आणि माय गव्ह ओपन फोरमवर देखील नागरिकांना सूचना करता येतील.

****

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या १०७ वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आणि  इतर मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशात, वीरांना अभिवादन केलं.

****

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ईफ्फीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. त्यापूर्वी, इफ्फीतल्या मास्टरक्लासचं उद्घाटन डॉक्टर मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांच्या हस्ते झालं.

****

त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने गठीत केलेली डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती येत्या बुधवारी २६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून एमआयटी महाविद्यालयात ही समिती विविध घटकांना भेटणार असून त्यात भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, बालमानस तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यम प्रतिनिधी आदींचे म्हणणे जाणून घेणार आहे.

****

महावितरणने राबवलेल्या विविध योजनांची दखल घेत १२ व्या नॅशनल अवार्डस् फॉर एक्सलन्स २०२५ इन पॉवर अॅण्ड एनर्जीच्या कार्यक्रमात महावितरण कंपनीला ‘पॉवर डिस्ट्रीब्यूशन युटिलीटी ऑफ द इयर’ आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी इनोव्हेटर ऑफ द इयर’ या राष्ट्रीय पुरस्कारांने काल गौरवण्यात आलं. महावितरणने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देत आतापर्यंत केलेल्या एकूण वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारांमध्ये तब्बल ६५ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश केला आहे.

****

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्यविकास आणि शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक आणि आग्रहाची भूमिका घेत आहे, असं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी म्हटलं आहे. संलग्नित महाविद्यालयांचे संस्थाचालक आणि प्राचार्य यांच्यासमवेत नांदेड इथं झालेल्या सहविचार सभेत ते बोलत होते.

****

लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त धाराशिव इथं आज एकता पदयात्रा काढण्यात आली. जवळपास सातशे विद्यार्थ्यासह अनेक अधिकारी कर्मचारी या पदयात्रेत सहभागी झाले होते.

****

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा आज काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं निषेध करण्यात आला. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली. क्रांती चौकात झालेल्या या आंदोलनात शहरातील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

****

नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गंजमाळ इथं आज सकाळी आग लागून झोपडपट्टीत एकाच रांगेतील सात घरांसह एक किराणा दुकान आणि एक भंगार गोदाम खाक झालं. या दुर्घटनेत सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.

****

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात  उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईच्या चाऊ-तिएन-चेन याच्यासोबत होणार आहे. भारताच्या इतर खेळाडूंचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला उद्यापासून गुवाहाटी इथं सुरुवात होणार आहे. दरम्यान, जखमी झाल्यामुळे शुभमन गिल ऐवजी ऋषभ पंत हा या सामन्यासाठी कर्णधार असणार आहेत. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने एक सामना जिंकत आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Post a Comment