Friday, 21 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रपती तसंच राज्यपालांना विधेयकं मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नाही- सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      काळा पैसा वैध प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

·      बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचा दहाव्यांदा शपथविधी

·      लातूर जिल्ह्यात निलंगा, उदगीर आणि रेणापूरची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार

·      ५६व्या इफ्फी महोत्सवाला गोव्यात पणजी इथं शानदार सोहळ्याने प्रारंभ

आणि

·      ऐक्यम सांस्कृतिक महोत्सवासाठी ३० हून अधिक देशांचे राजदूत छत्रपती संभाजीनगरात दाखल

****

राष्ट्रपती तसंच राज्यपालांना विधेयकं मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य घटनेतल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता, त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटना पीठाने काल हा निर्णय दिला. विधीमंडळाने मंजूर केलेलं विधेयक, घटनेच्या अनुच्छेद २०० अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब न करता, राज्यपाल जर अडवून ठेवत असतील, तर ही बाब संघराज्य रचनेस हितावह नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. अशा विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर मर्यादित अधिकारांचा वापर करुन लवकर निर्णय देण्यासाठी न्यायालय राज्यपालांना निर्देश देईल, असंही पीठानं नमूद केलं.

****

सक्तवसुली संचालनालयाने ब्रिटनचा शस्त्र दलाल संजय भंडारी यांच्याशी संबंधित काळा पैसा वैध करणे प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. धनशोधन प्रतिबंधक कायद्यान्वये- पी एम एल ए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. वाड्रा यांच्या विरोधात हे दुसरं मनी लॉन्डरिंग आरोपपत्र असून, यावर्षी जुलै महिन्यात हरियाणातील एका जमीन व्यवहारातील कथित गैरव्यवहारांशी संबंधित प्रकरणात संचालनालयाने वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

****

संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी काल दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पटना इथल्या गांधी मैदानावर झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.   

****

लातूर जिल्ह्यात निलंगा, उदगीर आणि रेणापूर नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे. अहमदपूर आणि औसा इथली निवडणूक मात्र महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे. आमदार अमित देशमुख यांनी निलंगा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट – आमदार अमित देशमुख

****

नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणानं नाशिक जवळच्या ओझर विमानतळाच्या विस्ताराला प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. या विस्तारीकरणामुळे या विमानतळाची प्रवासी वाहतुक क्षमता ताशी ३०० प्रवाशांवरून ताशी एक हजार प्रवासी होणार आहे.

****

आगामी वर्षापासून शिक्षकांवरील अतिरिक्त कामे ५० टक्के कमी केली जाणार आहेत, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल नाशिक इथं ही माहिती दिली. महापालिका तसंच नाशिक जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात ते बोलत होते. येत्या काळात एआय प्रणालीवर आधारित ५०० डिजिटल शाळा निर्माण करण्याचं नियोजन सुरू असल्याचं भुसे यांनी सांगितलं.

****

भारतीय टपाल सेवेनं स्टुडंट मेल ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री, प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्रं टपालाने पाठवण्यासाठीच्या शुल्कावर १० टक्के सूट मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं ओळखपत्र आणि त्याची एक प्रत टपालासोबत टपाल कार्यालयात सादर करावी लागेल. तसंच, संबंधित पाकिटावर स्टुडंट मेल असं स्पष्टपणे लिहावं लागेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२८वा भाग असेल.

****

५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फी २०२५ला – काल गोव्यात पणजी इथं मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यापूर्वी झालेल्या शोभायात्रेत, विविध चित्ररथ तसंच लोकगीतं आणि ‘भारत एक सूर’ या कार्यक्रमातून देशातल्या चित्रपट जगतातलं वैविध्य उपस्थितांना पहायला मिळालं. येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ८१ देशातल्या २४० चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. जगभरातील चित्रपट निर्माते, अभिनेते आणि प्रेक्षक या महोत्सवासाठी गोव्यात एकत्र आले आहेत. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून,

 

आशियातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फीमध्ये यंदा क्लासिक आणि आधुनिक सिनेमा एकत्र येणार आहे. जगभरातील चित्रपटांचं प्रदर्शन, मास्टरक्लासेस आणि खास कार्यक्रम यांचा आकर्षक मेळ यावेळी पाहायला मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर, तसेच अभिनेते नंदकुमारी बालकृष्ण, अनुपम खेर, आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा उपस्थित होते. विविध राज्ये आणि चित्रपट उद्योगांचे देखणे चित्ररथही यावेळी सादर करण्यात आले.

डॉ. एल. मुरुगन यांनी भारताच्या “ऑरेंज इकॉनॉमी”चा उल्लेख करत, इफ्फी 2025 आणि WAVES या महोत्सवांमुळे क्रिएटिव्हिटी, कंटेंट आणि कल्चर—या तीन स्तंभांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले.

 

 

इफ्फीच्या पार्श्वभूमीवर पणजीत भरलेल्या वेव्हज् फिल्म बाजारचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते काल झालं. दक्षिण कोरियाच्या खासदार जेवोन किम यांनी सादर केलेलं वंदे मातरम् हे या उद्धाटन समारंभाचं मुख्य आकर्षण ठरलं.

या महोत्सवात यंदाच्या सुवर्णमयूर पारितोषिकासाठी १५ चित्रपटांना नामांकन मिळालेलं असून, यामध्ये "गोंधळ" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे.

****

संयुक्त राष्ट्रांच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून २३ नोव्हेंबर पर्यंत ऐक्यम २०२५ या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठा आणि वेरुळ लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, ३०हून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूत यात सहभागी होणार आहेत. युनेस्को, राज्य पर्यटन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

****

राष्ट्रीय छात्र सेना- एनसीसी च्या राज्यातल्या छात्रांची संख्या २० हजाराने वाढवून एक लाख २० हजार करण्यात येणार आहे. एनसीसी चे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी काल पुण्यात एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराच्या निवड चाचणीची पाहणी केल्यावर ते बोलत होते. एनसीसीत वायुसेना आणि नौसेनेच्या तुकड्यांची संख्या वाढवली जाणार आहे, तसंच या छात्रांना ड्रोन प्रशिक्षण, सायबर सुरक्षेसोबतच रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती त्यागी यांनी दिली.

****

बीड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू झाली आहे. सहा लाख ८५ हजार ५४९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ४४० कोटी ५१ लाख रुपये थेट वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू असून, शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

धाराशिव इथं जिल्हास्तर युवा महोत्सवाला काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. प्रत्येक कलाप्रकार हा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग असल्याचं सांगत पुजार यांनी, सर्व कलावंतांना आत्मविश्वासाने मंचावर उतरून उत्तम कौशल्य जगासमोर मांडण्याचं आवाहन केलं.

****

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव २० डिसेंबर ते चार जानेवारी या काळात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी काल याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला.

खंडोबाच्या षड् रात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर नजिक सातारा परिसरातल्या खंडोबाच्या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर ही पहिलीच यात्रा असून, दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

****

जालना जिल्ह्यात श्रीक्षेत्र जांबसमर्थ इथं श्रीराम मूर्तींचा पुनर्स्थापनेचा वर्धापन सोहळा उद्या शनिवारी तसंच परवा रविवारी साजरा होत आहे. रामदास स्वामी यांच्या जांबसमर्थ इथल्या देवघरातील चोरीस गेलेल्या १६ मूर्तींपैकी सापडलेल्या १३ मूर्तींची तीन वर्षांपूर्वी पुनर्स्थापना करण्यात आली. या पुनर्स्थापन वर्धापन सोहळ्यात भजन कीर्तन महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यात काल अहिल्यानगर इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. त्या खालोखाल नाशिक इथं नऊ पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी इथं सुमारे १२ अंश तर धाराशिव इथं १३ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment