Saturday, 22 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं आजपासून सुरू होणाऱ्या जी- ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. तीन दिवसांच्या या परिषदेत, पंतप्रधान मोदी सर्व सत्रांमध्ये उपस्थित राहतील. या वेळी ते जागतिक दक्षिण चिंता, शाश्वत विकास, हवामान कृती, ऊर्जा संक्रमण आणि जागतिक प्रशासनातील सुधारणा यांसारख्या भारताच्या प्रमुख प्राधान्यक्रमांवर आपली भूमिका मांडणार आहेत. या वर्षीच्या जी-ट्वेंटी परिषदेची संकल्पना ऐक्य, समानता आणि शाश्वतता ही आहे. आफ्रिकन खंडात पहिल्यांदाच या शिखर परिषदेचे आयोजन होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

२०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही १२ वी G20 शिखर परिषदेतील उपस्थिती आहे. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.

****

संपुर्ण जगानं सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारताच्या संस्कृतीविषयक दृष्टिकोनातून बरचं काही शिकण्याची आवश्यकता असून भारतानं नेहमीच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान केला असल्याचं प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

लखनऊ इथं आयोजित जगभरातील मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात ते काल बोलत होते.

जगात जिथं संकट आलं तिथं भारत मदतीसाठी सदैव तत्पर राहीला असून देशासाठी न्याय म्हणजे नियम, शांतता निती, परंपरा आणि वैश्विक सद्भावासोबतच ती एक संस्कृती असल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. तसंच, संयुक्त राष्ट्र संघटन हे, सध्याच्या इस्राइल-हमास, युक्रेन-रशिया यांसारख्या वैश्विक संघर्षांत तसंच सुदानमध्ये भेडसावणाऱ्या मानवीय संकटांत बऱ्यापैकी अधिक मजबूत भूमिका निभावू शकलं असतं, असं सिंह यांनी नमूद केलं, म्हणजे संयुक्त राष्ट्रात काही कमतरता आहे असं नसून जागतिक राजकारणातील गुंतागुंत-शक्तीशाली राष्ट्रांचा असलेला प्रभाव तसंच संस्थास्तरावरील प्रक्रीयेतील संथ गती ही यामागे कारणं आहे, यामुळे या संघटनावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचं ते म्हणाले. त्यामुळेच या संघटनामध्ये संतुलित प्रतिनिधीत्व देत त्याला त्याचे मुळ उद्देश शांति, न्याय आणि समान प्रतिनिधित्व याकडे पुन्हा वळवता येईल असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

****

भारतात परदेशातून सोप्या रितीनं आणि स्वस्त, पारदर्शकतेसह कुशलतेनं पैसे हस्तांतरणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भारताच्या एकात्मिक पैसे भरणा पध्दती- यू.पी.आय. व्यवहारांना अन्य देशांतील जलद प्रतीपुर्ती प्रणालीसोबत जोडण्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँक-आर.बी.आयनं केली आहे. जी-ट्वेंटी परिषदेतील देशांच्या सीमापार व्यवहारांना प्रोत्साहनाच्या कार्यनीतीशी सुसंगत आहे. या पार्श्वभूमीवर, सततच्या पाठपुराव्यानंतर यूरोपियन सेंट्रल बैंकेसोबत भारताच्या यू.पी.आय. प्रणालीला टारगेट इंस्टेंट पेमेंट सेटलमेंट अर्थात टिप्ससोबत जोडण्याच्या कामावर परस्पर सहमती झालेली आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा इथं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा होणार आहे. दरम्यान, ही प्रचार सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने दिला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते सुरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीनंतरही चव्हाण यांना पक्ष प्रवक्ते पद देण्यात आल्याचं या विरोधामागे कारण आहे, असं सांगण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पुरुष संघांच्या गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद १४२ धावा झाल्या आहेत. नाणेफेक जिंकून दक्षिण अफ्रिकेनं फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत एक शुन्य असा पिछाडीवर आहे. मानेच्या दुखापतीमुळे भारतीय कर्णधार शुभमन गिल ऐवजी साई सुदर्शनला या सामन्यासाठी संघात स्थान मिळालं असून यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत भारताचं नेतृत्व करत आहे.

****

भारताचा आघाडीचा बॅटमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनच्या एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या उपांत्य फेरीत लक्ष्यने चिनी तैपेईच्या चाऊ टिएन चेनचा १७-२१, २४-२२, २१-१६ असा पराभव केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या प्रस्तावित नगरपालिका-नगरपरिषद मतदान प्रक्रियेसाठी नगरपालिका, पोलिस आणि महसूल यंत्रणांनी समन्वयासह तत्पर प्रतिसादासह सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी यांच्या उपस्थितीत आज याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. दूरदृष्टीष्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध ठिकाणच्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आदर्श आचारसंहितेबाबत पालन करण्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या निवडणूकीविषयी प्रसार माध्यमांना वेळेत-अचूक माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment