Sunday, 23 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं –राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

·      छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

·      धाराशिव जिल्ह्यात रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी

आणि

·      ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लक्ष्य सेनची जपानच्या खेळाडुसोबत लढत; तर दृष्टिहीन महिलांच्या टी –ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत – नेपाळ अंतिम सामना

****

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंध्रप्रदेशात पुट्टपार्थी इथं श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. आध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. त्या म्हणाल्या…

बाईट- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

व्यक्तिगत पातळीवर तसंच समाज म्हणून वैश्विक शांतीला बळ मिळावं, आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण व्हावं, यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी राज्यसभेच्या तालिका अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये खासदार रजनी पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

****

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्यांक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी केल्या आहेत. ते काल मुंबईत हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परतल्यानंतरच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाऊंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत. महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबवण्यात येणार आहे.

****

नव्याने लागू झालेल्या कामगार कायद्यांचा सर्वसामान्य कामगारांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास, छत्रपती संभाजीनगर इथले युवा उद्योजक नीरज बोरसे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलतांना ते म्हणाले,

बाईट- युवा उद्योजक नीरज बोरसे

****

मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार, तसंच नोबेलप्राप्त साहित्य लगोलग मराठीत अनुवादित होण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं गेलं पाहिजे, असं मत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केलं. काल रत्नागिरी इथं एकदिवसीय जिल्हा साहित्य संमेलनात ते बोलत होते. सरकारनं मराठी शाळा सशक्त कराव्यात, अशी अपेक्षाही गवस यांनी यावेळी व्यक्त केली.

****

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्य ती मदत मिळावी, या उद्देशाने ही हेल्पलाईन सुरु केली जाईल. तसंच ३१ विभागातल्या सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येतील, असं त्यांनी सागितलं. बस उशिरा सुटणं, रद्द होणं अशा कारणांमुळे मुलांचं शालेय नुकसान झाल्यास आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरलं जाईल, असंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

****

गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल ‘मॉस्किटोज’, ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’, सूर्या बालकृष्णन यांचा ‘दीपा दीदी’ आणि देबांकर बोर्गोहाईन यांचा ‘सिकार’ आदी चित्रपट दाखवण्यात आले. नारी शक्तीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच ५० महिला दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित होत असून, यामध्ये सिंपल दुगार यांच्या ‘लोकमाता देवी अहिल्याबाई’ या चित्रपटाचा समावेश आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐक्यम् परिषदेत विविध देशांच्या सांस्कृतिक राजदुतांनी काल बिबी का मकबरा, देवगिरी किल्ला तसंच वेरूळ लेण्यांना भेट दिली. पैठणीसह हिमरू कारखान्यांना भेट देऊन त्यांनी या विणकामाची पाहणी केली.

****

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वेमार्गाजवळ असलेल्या तीसपेक्षा अधिक गावांमधल्या नागरिकांना नोटीस बजावण्यात येत आहे. अंकाई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे परभणीपर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग आला आहे.

दरम्यान, या कामात अडथळा येणार नाही आणि नागरिकांचं नुकसानही होणार नाही, असा मार्ग काढण्यात येईल, असं माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. रेल्वे विस्तारीकरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना त्यांनी हे आश्वासन दिलं.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. आपण आरोपाला प्रत्यारोपाने उत्तर देत नसून, विकास कामाला महत्त्व देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं शक्य तेवढी सामंजस्याची भूमिका महायुतीच्या तीनही पक्षांनी घेतली, जिथे एकमत होऊ शकलं नाही, तिथेच आम्ही स्वबळावर लढत असल्याचं, पवार यांनी स्पष्ट केलं.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात अणदूर नजीक चिवरी पाटी इथं काल सकाळच्या सुमारास क्रूझर गाडीचं टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.  हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव-उळे इथले रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने चिनी तैपेईच्या चाऊ टिएन चेनचा १७-२१, २४-२२, २१-१६ असा पराभव केला. आज सकाळी होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्यची लढत जपानच्या युशी तनाका याच्यासोबत होणार आहे.

****

दृष्टिहीन महिलांच्या टी –ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे. काल कोलंबो इथं उपांत्य फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर नऊ खेळाडू राखून विजय मिळवला तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळनं पाकिस्तानचा सात खेळाडू राखून पराभव केला.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका पुरुष क्रिकेट संघात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काल दुपारनंतर पुरेशा प्रकाशाअभावी खेळ थांबला तेंव्हा पाहुण्या संघाच्या ८२व्या षटकात सहा बाद २४७ धावा झाल्या होत्या.

****

नांदेड जिल्ह्यात हदगाव तहसील कार्यालयातल्या पुरवठा विभागातला निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल पकडलं. स्वस्त धान्य दुकानदाराला मिळालेल्या चार महिन्याच्या धान्य पुरवठा कमिशनची १० टक्के रक्कम म्हणजेच ५ हजार ७०० रुपये डेटा एन्ट्री ऑपरेटरकडून स्वीकारण्यास सहमती दर्शवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 

****

अमरावती इथं नुकत्याच झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड परिमंडलाच्या संघानं विविध क्रीडा प्रकारांत नऊ सुवर्ण तसंच नऊ रौप्यपदकं पटकावली. पदकविजेत्या सर्वांचा गौरव करण्यात आला.

****

लातूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने काल शहरातल्या गंजगोलाई परिसरातल्या एका गोदामावर छापा टाकून अंदाजे ३०० किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा साठा जप्त केला. सबंधित व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

****

तिरुपती – श्रीसाईनगर शिर्डी – तिरुपती या विशेष रेल्वे गाडीला येत्या ३० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या काळात मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी ११ अंश तर गोंदियात साडे बारा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. अहिल्यानगर इथं १३ पूर्णांक चार, नाशिक इथं १३ पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तसंच परभणी इथं १४ ते साडे १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment