Monday, 24 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ नोव्हेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्य कांत त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते.

सरन्यायाधीश सूर्य कांत पुढील १५ महिने देशाच्या न्यायव्यवस्थेचं नेतृत्व करणार असून, वयोमानानुसार ते नऊ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कलम ३७० रद्द करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकत्व हक्क, आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासारख्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

****

भारतीय नौदलाची सामर्थ्यवृद्धी करणारी ‘माहे’ ही नवी पाणबुडीरोधी, उथळ पाण्यात कार्य करणारी युद्धनौका आज मुंबईत ताफ्यात दाखल होत आहे. कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झालेल्या या युद्धनौकेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. मलबार किनारपट्टीवरील ऐतिहासिक ‘माहे’ गावावरून हिचं नामकरण करण्यात आलं असून, तिचं प्रतीक असलेली उरुमी तलवार केरळच्या प्राचीन कलरीपयट्टू युद्धकलेची परंपरा जपते. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि पश्चिम नौदल ताफ्याचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा सोहळा पार पडणार आहे. देशाच्या समुद्री सुरक्षेसाठी समर्पित ‘माहे’ पश्चिम किनाऱ्यावर तैनात राहून भारताची सागरी क्षमता अधिक भक्कम करणार आहे.

****

शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर यांचा ३५०वा हौतात्म्य दिन आज पाळण्यात येत आहे. १६७५ साली मुघल शासक औरंगजेब याच्या आदेशावरुन तेगबहादूर यांना ठार करण्यात आलं होतं. या दिवसाला हुतात्मा दिन म्हणलं जातं. गुरु तेगबहादूर यांनी देशभरात गुरुनानक देव यांच्या संदेशाचा प्रसार केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु तेग बहादुर जी यांना अभिवादन केलं आहे. गुरु तेग बहादुर जी यांनी धर्म, मानवता आणि सत्य यांचं रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचं शौर्य, बलिदान आणि निःस्वार्थ सेवा या गोष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आपण त्यांच्या मूल्यांना आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या देशातलं ऐक्य आणि सौहार्द अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करु, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

नांदेड इथं श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

भारतीय हवाई दल आपली तेजस ही लढाऊ विमानं बंद करणार असल्याचा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तेजस विषयी समाज माध्यमावर प्रसारित होत असलेलं पत्र बनावट असल्याचं, पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने म्हटलं आहे. समाजमाध्यमावरच्या काही पाकिस्तानी प्रचार खात्यांकडून हे पत्र पसरवलं जात असल्याचं पीआयबीने नमूद केलं आहे.

****

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत ५० लाख, ४७ हजारापेक्षा जास्त नोंदणी अर्ज मतदारांना वितरित केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. या टप्प्यात जवळपास ५१ कोटी मतदार असून, यापैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त मतदारांनी नोंदणी अर्ज घेतल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. विशेष पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा चार नोव्हेंबरपासून नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू झाला असून, पुढच्या वर्षी सात फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार याद्यांचं प्रकाशन होऊन तो संपेल.

****

नागपुरात सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन -२०२५’ या कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट दिली. प्रदर्शनातली कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली. प्रदर्शनाचे प्रणेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर यावेळी उपस्थित होते. फाऊंडेशनला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचं फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं.

विदर्भातल्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन सुलभ करून देण्यासाठी एक सामंजस्य करार काल करण्यात आला. ऍग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूरचे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग आणि बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात हा करार झाला. सुरवातीला तूर, उस आणि संत्री या पिकांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.

****

स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाअंतर्गत सोलापूर शहर परिसरात मृत जनावरांच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी भोगाव इथं अत्याधुनिक जनवारांची स्माशानभूमी उभारण्यात आली आहे. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली ही सुविधा सोलापूर शहराच्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छतेच्या ध्येयाला बळकटी देणारी ठरत आहे. याठिकाणी दाहिनीमध्ये उपलब्ध यांत्रिक सुविधांद्वारे मृत जनावरांचे वैज्ञानिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार असल्यानं सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि स्वच्छता मानदंड अधिक मजबूत होणार आहेत.

****

No comments:

Post a Comment