Monday, 1 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ-विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाजात व्यत्यय

·      राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान- निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर विविध पक्षांची टीका

·      वक्फ कायद्याबाबतच्या याचिकांवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

·      जागतिक एड्स दिवस विविध उपक्रमांनी साजरा

आणि

·      मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी १२, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं. त्यापूर्वी सदनाचं कामकाज सुरू होताच, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनातील दिवंगत माजी सदस्य अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक, तसंच आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक सभागृहात सादर केलं. मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, विरोधकांच्या गदारोळातच आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

 

राज्यसभेत आज सभापती सी.पी. राधाकृष्णन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यांनी नमूद केलं. लोकशाहीच्या सक्षमतेबाबत पंतप्रधान म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्यसभेत नवीन सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सदनाचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी ७२ लाखांहून अधिक कारागीरांनी नोंदणी केली आहे. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. आतापर्यंत २३ लाख कारागीरांना अपेक्षित प्रशिक्षण तर सात लाख लाभार्थींना २३ कोटी रुपयांहून अधिक प्रोत्साहन निधी देण्यात आल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी उद्या सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह सर्वच ठिकाणी निवडणूक केंद्रांवर पथकं दाखल होत आहेत. निवडणूकीच्या मतदानासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. ज्या कामगारांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास त्यांना दोन तासांची सवलत देण्याचा आदेशही शासनानं दिला आहे.

****

या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रात्री १० वाजता हा प्रचार संपेल. 

 

मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, तसंच सोलापूर जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही पैठण तालुक्यात सभा घेतल्या.

****

राज्यात काही मतदारसंघांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचं मत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. २० नगरपालिका आणि काही प्रभागांमधल्या निवडणुका पुढं ढकलायचा निर्णय आयोगानं घेतला आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे, मात्र हा निर्णय इतर उमेदवारांवर अन्याय करणारा असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं मत नोंदवलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयावर टीका केली. मतदान एका दिवसावर आलेलं असताना असा निर्णय घेणं हे आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असून आयोगाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

****

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून, या निवडणुका स्थगित न करता सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. आयोगाने आपल्या निर्णयाचा सहानभूतीपूर्वक पुर्नविचार करावा अशी मागणी चव्हाण यांनी या निवेदनातून केली आहे.

****

देशातल्या मनोरंजन आणि माध्यम जगताच्या क्षमतेचा सुयोग्य वापर होण्याची गरज केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटमध्ये ते आज बोलत होते. AI आधारित तंत्रज्ञानाच्या काळात आपणही नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

वक्फ दुरुस्ती कायदा, २०२५ अंतर्गत वक्फ मालमत्ता नोंदणीसाठी सहा महिन्यांची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. वक्फ मालमत्ता धारकाला नोंदणीत येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर, वक्फ न्यायाधिकरणासमोर सहा डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करता येईल, असा पर्याय न्यायालयानं सुचवला आहे.

****

एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जगभरात एड्स दिवस पाळला जात आहे. या निमित्तानं देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम झाला.

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाच्या वतीनं सायकल फेरी काढण्यात आली. चिकलठाणा इथल्या जिल्हा रुग्णालयातून सुरूवात झालेली ही फेरी शहरातल्या विविध भागातून मार्गक्रमण करत आयएमए हॉल इथं विसर्जित झाली.

**

लातूर इथं सिध्देश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीपर सादरीकरण केलं. यावेळी त्यांनी समाजात एड्सबाबत जागरूकता वाढवून 'सुरक्षेचा घेऊन पुढाकार एड्समुक्त भारताचा निर्धार' करण्याचं आवाहन केलं.

****

राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२ रोजी घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आठ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

****

कापूस, सोयाबीन मका ही पिके हमी भावाने विकता यावी यासाठी शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ आणि ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणी करावी, असं वाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. जिल्ह्यात सहा तालुक्यात आठ कापूस खरेदी केंद्रे आहेत. तर सोयाबीन तसंच मका खरेदीसाठी नऊ ठिकाणी ११ केंद्रं उभारली आहेत.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे तीन ते पाच डिसेंबर दरम्यान मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत चैत्यभूमीला भेट देणाऱ्या पर्यटक आणि अनुयायांसाठी ही सफर पूर्णपणे नि:शुल्क आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या आठ डिसेंबरपर्यंत मोफत रक्तगट तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर नियुक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञांमार्फत सर्व नागरिकांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात येणार आहे.

****

दित्वा चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं आहे. परिणामी तमिळनाडू तसंच कर्नाटकमधे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वार वाहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यात सर्वात कमी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद अहिल्यानगर इथं झाली. त्याखालोखाल पुणे तसंच नाशिक इथं दहा अंश, बीड इथं दहा पूर्णांक तीन, तर जळगाव इथं १० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सहा, धाराशिव १३ पूर्णांक सहा तर परभणी इथं १६ पूर्णांक सात दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment