Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 03
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
फेक न्यूज अर्थात खोटी बातमी किंवा माहिती
लोकशाहीला धोकादायक
असून, यासंदर्भात कडक धोरण अंवलंबण्याची गरज, केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली. ते आज लोकसभेत खासदार पप्पू यादव यांनी विचारलेल्या
प्रश्नाला उत्तर देत होते. यासंदर्भात काही नवीन नियम बनवण्यात आल्याचं वैष्णव यांनी
सांगितलं. ते म्हणाले,
बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशात एक नवीन क्रांती घडवून आणली असून, देश त्याचे
सकारात्मक परिणाम पाहत असल्याचं वैष्णव यावेळी म्हणाले. सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगचं
नियमन करण्यासाठी अतिशय कठोर कायदे केले आहेत, ज्याचा देशभरातल्या लाखो कुटुंबांना
फायदा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
**
देशभरातले जवळजवळ शंभर टक्के
रेशनकार्ड आता डिजिटल झाले असल्याची माहिती, केंद्रीय अन्न, सार्वजनिक
वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत दिली. सरकार प्रधानमंत्री
गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेशन देत असून, ही योजना २०२९
पर्यंत सुरू राहील. या योजनेअंतर्गत, पात्र कुटुंबांना दरमहा प्रति
व्यक्ती पाच किलो मोफत अन्नधान्य मिळत असल्याचंही जोशी यांनी सांगितलं.
**
दरम्यान, लोकसभेत आज
केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक २०२५ वर चर्चा होणार आहे. गुटखा, पानमसाला, सिगारेट यांसारख्या
आरोग्याला हानीकारक पदार्थांवर ४० टक्के उपकर लावण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे.
****
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त
आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं
वितरण करण्यात आलं.
धुळ्यात यानिमित्त जनजागृती
रॅलीनं दिव्यांग सक्षमीकरण सप्ताहाची सुरुवात झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण
सहभागानं काढलेल्या या रॅलीचं उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे
यांनी केलं.
नागपूर इथंही जिल्हा दिव्यांग
सक्षमीकरण विभाग आणि विविध शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शाळा-कर्मशाळांच्या संयुक्त
विद्यमानं गांधीबाग इथून जनजागृती रॅली काढण्यात आली. भाजप शहराध्यक्ष आणि माजी महापौर
दयाशंकर तिवारी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
****
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.
राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्या
प्रामाणिकपणाने आणि नेतृत्वगुणांनी राष्ट्राच्या लोकशाही प्रवासाला आकार दिला, त्यांचा वारसा
पुढील पिढ्यांना कर्तव्य आणि राष्ट्र उभारणीच्या मूल्यांचं पालन करण्यासाठी प्रेरणा
देत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी राष्ट्रपती भवनात राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली
वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
डॉ. राजेंद्र प्रसाद या अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यलढ्यातलं राजेंद्र प्रसाद यांचं
योगदान, संविधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं नेतृत्व आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती
म्हणून त्यांनी केलेल्या सेवाकार्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून स्मरण
केलं.
****
ज्येष्ठ समाजवादी नेते, राष्ट्र सेवा
दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाला सुराणा यांचं काल नळदुर्ग इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे
होते. सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात आज त्यांचं देहदान करण्यात आलं. पन्नालाल सुराणा
हे दैनिक मराठवाडा चे माजी संपादक, कुर्डुवाडी इथल्या ग्रामोदय समिती चे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी
विचारवंत, साहित्यिक आणि वक्ते होते. १९९३ साली किल्लारी इथल्या भूकंपानंतर पन्नालाल सुराणा
यांनी नळदुर्ग जवळ आपलं घर नावाचा मोठा प्रकल्प उभारून भूकंपग्रस्तांच्या मुलांचं पुनर्वसन
आणि शिक्षणाची व्यवस्था देखील केली होती.
पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने
भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडहून मुंबईला जाण्याकरता दक्षिण मध्य रेल्वे
आदिलाबाद ते दादर ही विशेष गाडी चालवणार आहे. ही गाडी पाच डिसेंबरला सकाळी सात वाजता
आदिलाबाद इथून सुटेल आणि नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक मार्गे
दादरला सहा तारखेला पहाटे साडे तीन वाजता पोहोचेल.
****
No comments:
Post a Comment