Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 03 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान
संपन्न, २१ डिसेंबर रोजी निकाल
·
संसदेत पुढील आठवड्यात वंदे मातरम ची दीडशे वर्ष आणि निवडणूक
सुधारणांवर होणार चर्चा
·
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी
५६ हजार ३१४ कोटी रुपये मंजूर, केंद्रीय कृषी मंत्रालयाची संसदेत माहिती
·
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रायपूरमध्ये आज दुसरा
एकदिवसीय क्रिकेट सामना
आणि
·
खान्देश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना
पुढचे तीन दिवस थंडीचा यलो अलर्ट
****
राज्यातल्या
२६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीची मतदान प्रक्रिया काल शांततेत पार पडली. या सर्व
ठिकाणचे नगराध्यक्ष तसंच सदस्य पदांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या सदस्यांचं राजकीय
भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं.
**
मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नगर परिषदा तसंच नगर पंचायतींसाठी काल ७४ पूर्णांक
७० टक्के मतदान झालं. यामध्ये कन्नड नगरपरिषदेत ७६ पूर्णांक ८३, पैठणमध्ये
७३ पूर्णांक ७४, खुलताबादमध्ये ८२ पूर्णांक २६, वैजापूरमध्ये ७३ पूर्णांक ३०, गंगापूरमध्ये ७१ पूर्णांक
७६, तर सिल्लोडमध्ये ७४ पूर्णांक ५१ टक्के मतदान झालं.
लातूर जिल्ह्यातल्या
उदगीर नगरपरिषदेत ६८ पूर्णांक १२, अहमदपूरमध्ये ७३ पूर्णांक शून्य सहा,
तर औसामध्ये ७५ पूर्णांक ७३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
हिंगोली
जिल्ह्यात हिंगोली नगर परिषदेसाठी ६६ पूर्णांक २५, तर कळमनुरीसाठी
७२ पूर्णांक ८१ टक्के सरासरी मतदान झालं.
जालना जिल्ह्यात
एकूण ७३ पूर्णांक ७६ टक्के मतदान झालं. त्यात भोकरदनमध्ये सुमारे ७६, परतूरमध्ये
७० पूर्णांक ३१, तर अंबडमध्ये ७३ पूर्णांक ७६ टक्के मतदान झालं.
परतूर आणि अंबड इथल्या काही मतदान केंद्रावर मतदानाची साडेपाच वाजेची वेळ संपल्यानंतरही
संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होतं.
धाराशिव
जिल्ह्यात ६८ पूर्णांक ९७ टक्के मतदान झालं. सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद तुळजापूर
नगरपरिषदेत झाली.
बीड जिल्ह्यात
५२ पूर्णांक ६३, नांदेड ७४ पूर्णांक ७५, तर परभणी जिल्ह्यातल्या
नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी ५३ टक्के मतदान नोंदवलं गेलं.
****
जालना जिल्ह्यात
भोकरदन आणि परतूर इथल्या काही केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला. मात्र, संबंधित विभागानं
तातडीने तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झालं.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं तीन केंद्रांवर मतदान यंत्रं बंद पडली होती, मात्र ती
तत्काळ दुरुस्त करण्यात आल्यानं, मतदान प्रक्रिया सुरळीत पार
पडली.
**
धाराशिव
जिल्ह्यात तुळजापूर इथं काल मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या एका वयस्कर महिलेचा
अकस्मात मृत्यू झाला. मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडलेल्या या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात
दाखल केलं असता, तिचा मृत्यू झाल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दरम्यान, न्यायालयाच्या
निर्णयानुसार राज्यातले २४ नगराध्यक्ष आणि २०४ सदस्यांच्या जागांसाठी २० डिसेंबरला
मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबरला सर्व २८५ नगरपालिकांच्या मतदानाची
एकत्रित मतमोजणी करून, निकाल एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी
जाहीर व्हावेत, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू
शकतो, अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यावर
काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले आहे.
न्यायालयाच्या
निर्णयावर मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशा निर्णयांमुळे
सर्वच पक्षांचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास होत असल्याचं
मत फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री
तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस
काँग्रेस
नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात बोलतांना, न्यायालयाच्या या
आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून, याला राज्य सरकार
जबाबदार असल्याचा आरोप केला. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
निवडणूक
आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला
आहे. या कार्यक्रमानुसार एक नोव्हेंबर आधारीत पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार याद्या तयार
करण्यात येत आहेत. या प्रारूप यादीबाबतचे आक्षेप किंवा हरकती १८ डिसेंबरपर्यंत दाखल
करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं
आहे.
****
मुंबईत
राजभवनाचं नाव आता ‘महाराष्ट्र लोकभवन’ असं करण्यात आलं आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत
यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले. राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक
आणि लोक कल्याणासाठी समर्पित करणं, हाच यामागचा उद्देश असल्याचं
राज्यपालांनी म्हटलं आहे.
****
भारतीय
रिझर्व बँकेच्या वित्त आणि पत धोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू होणार आहे.
परवा शुक्रवारी गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील. या
आधीच्या दोन आढाव्यांमध्ये व्याजदर जैसे थे ठेवले होते, मात्र यावेळी
त्यात पाव टक्के कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
****
लोकसभेत
दोन दिवसांच्या गोंधळानंतर सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या तणावावर तोडगा निघाला
आहे. ‘वंदे मातरम्’ गीताची दीडशे वर्षे आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर चर्चा करण्यास
सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये सहमती झाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.
नऊ आणि दहा डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणा विषयक चर्चा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
तर, आठ डिसेंबर रोजी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त विशेष
चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काल सलग दुसऱ्या
दिवशी संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून केंद्र सरकारकडून
एकूण ५६ हजार ३१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, केंद्रीय
कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल लोकसभेत दिली. याशिवाय रब्बी हंगामासाठी तीन
हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी, प्रति हेक्टर दहा हजार रुपये अर्थसहाय्य
देण्यात येणार असल्याचं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. २०२५–२६ या वर्षात
अतिवृष्टी आणि पुरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सहा लाख आठ हजार ९५६ हेक्टर
क्षेत्राचं नुकसान झालं आहे. अंदाजे एक हजार ६९५ कोटी रुपये नुकसान झालं असून,
राज्य सरकारनेही पूरग्रस्त क्षेत्राचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
संचारसाथी
हे मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य
शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या
मोबाईलधारकाला हे ॲप नको असेल, तर तो ते मोबाईलमधून काढून टाकू
शकतो, असं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट – केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
****
भारत आणि
दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा
सामना आज रायपूर इथं खेळवला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत
पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.
****
मराठवाडा
लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत
अध्यक्षपदी विधीज्ञ सागरदास मोरे तर सचिवपदी विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्यासह संपूर्ण
कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
****
राज्यात
खान्देश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस थंडीचा यलो
अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, धुळे, आणि नंदूरबारसह
अहिल्यानगर, नाशिक, पालघर तसंच पुणे जिल्ह्यात
थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात काल
सर्वात कमी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर इथं नोंदवलं गेलं. बीड इथं
नऊ पूर्णांक आठ, नाशिक दहा पूर्णांक तीन, छत्रपती संभाजीनगर १२ पूर्णांक पाच, परभणी १३ पूर्णांक
पाच, तर नांदेड आणि धाराशिव इथं सरासरी १४ अंस सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment