Wednesday, 3 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक २०२५ वर चर्चा होणार आहे. गुटखा, पानमसाला, सिगारेट यांसारख्या आरोग्याला हानीकारक पदार्थांवर ४० टक्के उपकर लावण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. तर राज्यसभेत आज जलप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ‘जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण सुधारणा अधिनियम २०२४’ मणिपूरमध्ये स्वीकारण्यासंबंधी ठराव केंद्रीय पर्यावरण आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव ठराव सादर करतील.

****

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचे पूर्ण निराकरण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाने काल लोकसभेत दिली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यांना २६ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरीत करण्यात आली असल्याची माहिती, कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिली. महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची व्याप्ती ६६ हजार ७५६ हेक्टरपर्यंत वाढली असून, ८७ हजार शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळाला असल्याचइही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने वर्ष २०२५–२६ साठी महाराष्ट्राला चार हजार १७६ कोटी निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी वितरीत केला, राज्य सरकारने हा निधी विविध नैसर्गिक आपत्तींच्या काळात वापरल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं.

****

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि नेतृत्वगुणांनी राष्ट्राच्या लोकशाही प्रवासाला आकार दिला, त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना कर्तव्य आणि राष्ट्र उभारणीच्या मूल्यांचं पालन करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद या अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यलढ्यातलं राजेंद्र प्रसाद यांचं योगदान, संविधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं नेतृत्व आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेल्या सेवाकार्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून स्मरण केलं.

****

कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि कर्करोग उपचाराचं गांभीर्य विचारात घेता राज्यातल्या जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार 'आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या' धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा, एल 1, एल 2, एल 3 उपलब्ध होणार आहेत. एल 1 या स्तरामध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2, एल 3 या स्तरावर असणाऱ्या या रूग्णालयात कर्करोगासंबधित प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करणं, तसंच या आजाराविषयी संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने याबाबत धोरण निश्चीत केलं आहे. जिल्हास्तरावर सुरू होणाऱ्या उपचारामुळे अनेक कर्करोगग्रस्त रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचणार आहे आणि स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने या रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

****

देशातल्या महामार्गांवर दूरसंचार आधारित सुरक्षा प्रणाली बसवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने रिलायन्स जियोसोबत करार केला आहे. चालकांना वेग आणि वाहन चालवण्याच्या पद्धतीबद्दल माहिती देऊन रस्ते सुरक्षा पुरवणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रणालीमुळे चालकांना मोबाईल फोनवर एसएमएस किंवा व्हॉट्स अप अथवा कॉलद्वारे सूचना मिळतील. जिओचं सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी ही व्यवस्था उपलब्ध असेल.

****

चैत्यभूमीवर उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्रयांनी यावेळी दिल्या.

****

ज्येष्ठ समाजवादी नेते, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाला सुराणा यांचं काल नळदुर्ग इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात आज त्यांचं देहदान करण्यात आलं. पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडा चे माजी संपादक, कुर्डुवाडी इथल्या ग्रामोदय समिती चे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, साहित्यिक आणि वक्ते होते. १९९३ साली किल्लारी इथल्या भूकंपानंतर पन्नालाल सुराणा यांनी नळदुर्ग जवळ आपलं घर नावाचा मोठा प्रकल्प उभारून भूकंपग्रस्तांच्या मुलांचं पुनर्वसन आणि शिक्षणाची व्यवस्था देखील केली होती.

पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

****

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या विद्यापीठस्तरीय खेलो इंडिया स्पर्धेत काल ॲथलेटिक्‍स मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकावर महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी नाव कोरलं.

****

No comments:

Post a Comment