Friday, 5 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      कृषीक्षेत्रातल्या आमुलाग्र बदलांचे परिणाम काही वर्षांत दिसून येतील-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त-सौर कृषीपंप योजनेच्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान

·      राज्य सरकारच्या वर्षभरातल्या कामाची हिवाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका काढावी-काँग्रेसची मागणी

·      रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात-जीडीपी वृद्धी तसंच महागाई दरातही सुधारणा

आणि

·      चालू रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी महिनाभर सुरू राहणार

****

राज्य सरकार कृषीक्षेत्रात आमुलाग्र बदल करत असून, येत्या काही वर्षांत त्याचे परिणाम दिसून येतील, असा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. या विश्वविक्रमात मराठवाड्याचा विशेषत: छत्रपती संभाजीनगरचं लक्षणीय योगदान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले….

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप स्थापन करण्याचा विश्वविक्रम केला, यासाठीचं प्रमाणपत्र तसंच गौरवपदकं गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदान केलं, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

शासकीय सेवेत अनाथांसाठी एक टक्का आरक्षण ठेवल्यानं ८०० हून अधिक अनाथ युवक-युवती आजपर्यंत राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. विद्यमान सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी मुंबईत अनाथ मुलांशी संवाद साधला. देशाच्या, राज्याच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याचं आवाहन त्यांनी या मुलांना केलं.

****

राज्यात शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवल्याचं प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज मुंबई इथं भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याने प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारनं येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्या एक वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. विधान सभा आणि विधान परिषदेत अद्याप विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

****

गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २०१८ साली दिलेल्या आदेशांचं पालन न केल्याबद्दल उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने यासंबंधी सर्व शासकीय यंत्रणांना आपले उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. एका पर्यावरण कार्यकर्त्याने दाखल केलेल्या या याचिकेवर पुढची सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.

****

 

 

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ६८ हजार ३९३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यात मजुरीसाठी ५७ हजार कोटी रुपये, तर सामग्री आणि प्रशासनासाठी १० हजार कोटींहून अधिक निधी दिल्याची माहिती, ग्रामीण विकास राज्य मंत्री कमलेश पासवान यांनी आज राज्यसभेत दिली. या योजनेअंतर्गत मजुरी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे जमा केली जाते, असही त्यांनी स्पष्ट केले.

****

हिंसाचारग्रस्त आणि संकटात सापडलेल्या महिलांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत दिली जात असून, देशभरात  ८६४ वन-स्टॉप केंद्र कार्यरत आहेत, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी ही माहीती दिली. या केंद्रांमध्ये महिलांना वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा, पोलिसांची मदत आणि समुपदेशन अशा सेवा मिळतात. २०१५ पासून आतापर्यंत १२ लाख ६७ हजारांहून जास्त महिलांनी या केंद्रांचा लाभ घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमीद या पोर्टलवर एक लाख ५१ हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असून अद्यापही लाखो मालमत्तांची नोंदणी झालेली नाही. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत नोंदणी करणाऱ्यांवर मंत्रालयाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा कठोर कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन रिजिजू यांनी यावेळी दिलं.

****

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

रिजर्व्ह बँकेने सकल देशांतर्गत उत्पन्न – जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून वाढवून सात पूर्णाक तीन टक्के केला आहे, ही वाढ आरबीआयच्या आधीच्या अंदाजापेक्षा सुमारे अर्धा टक्का अधिक असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. दरम्यान, महागाईच्या अंदाजातही सुधारणा करण्यात आली आहे, हा अंदाज दोन पूर्णांक सहा टक्क्यांवरून कमी करून दोन टक्के करण्यात आला आहे. गेल्या तिमाहीत आर्थिक वृद्धीदरात झालेली वाढ, जीएसटीतली कपात, सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेली खरेदी या आधारवर हे बदल करण्यात आले आहेत.

****

सक्तवसुली संचालनालयाने रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या १८ हून जास्त मालमत्ता, निश्चच ठेवी, बँक खात्यातील रक्कम आणि नोंदणी नसलेल्या गुंतवणुकीतील भाग ऱोखे मिळून एकूण आकराशे २० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सात, रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या दोन, आणि रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नऊ मालमत्तांचा समावेश आहे, असं याबाबच्या वत्तात म्हटलं आहे. बँक फसवणूक प्रकरणांमधील कारवाईच्या चौकटीत, काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंधक कायद्यानुसार या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही, इडीनं अनिल अंबानी समूहाशी संबंधित विविध कंपन्यांवर कारवाई करताना सुमारे ९ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आयोगाचे अपर सचिव आर पी ओतारी यांनी ही माहिती दिली. संबंधित स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी याची नोंद घेण्याचं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे.

****

चालू रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत जागरूकता वाढावी आणि योजनेत सहभाग वाढावा यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत दहावा "पीक विमा सप्ताह" राबवण्यात येत आहे. यानंतरही संपूर्ण डिसेंबर महिनाभर विमा नोंदणी मोहीम सुरू राहणार आहे, शेतकऱ्यांनी या योजनेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी केलं आहे.

****

जालना एटीएस पथक आणि अंबड पोलिसंनी काल संयुक्त कारवाई करत अंबड तालुक्यातल्या कौचलवाडी शिवारातून सुमारे एक कोटी रुपयांचा चार क्विंटल गांजा जप्त केला आहे. गोपनीय माहिती आधारे पथकाने ढवळीराम चरावंडे या शेतकऱ्याच्या शेतात छापा टाकून ही कारवाई केली तेव्हा गांजाची काढणी सुरू होती. तर काही गांजा विक्रीसाठी वाळवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

सर्वांना समान कायदा करा, १९६३ च्या जुन्या कायद्यात आमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायदा रद्द करावा, यांसारख्या व्यापाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे  शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समित्यांनी आज एक दिवसीय बंद पुकारला आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र या बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही.

****

कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा लागू करू नये यासह जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, शिक्षक सेवक योजना रद्द करून तात्काळ नियमित वेतन देण्यात यावं, आदी मागण्यासाठी राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं महात्मा फुले पुतळा ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नांदेड जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन येत्या सोमवारी आठ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या लोकशाही दिन आयोजनात संबंधितांनी हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार १३ डिसेंबर रोजी बीड जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment