Friday, 5 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ डिसेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली असून, रेपो दर आता पाच पूर्णांक २५ टक्के इतका झाला आहे. बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली.

****

नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा आढावा घेणार असून, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही मतांची देवाणघेवाण करतील. या बैठकीनंतर व्यापार, अर्थ, आरोग्य, शिक्षण, संस्कृती यांसह अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती भवनात पुतीन यांचं औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. २३व्या भारत–रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन काल भारतात दाखल झाले.

****

संघटित अवैध शस्त्रास्त्र आणि स्फोटक वाहतूक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा – एनआयएने मोठी संयुक्त कारवाई करत देशभरात २२ ठिकाणी छापे घातले आणि चार जणांना अटक केली. ही कारवाई बिहार, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या तीन राज्यांमध्ये एकाचवेळी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रास्त्र आणि स्फोटकं, एक कोटीहून अधिक रोकड, डिजिटल उपकरणं, बनावट दस्तऐवज जप्त करण्यात आले.

****

इंडीगो विमान कंपनीच्या उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी इंडीगोच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. सुधारीत फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन निकषांच्या अंमलबजावणीत निर्माण झालेल्या अडचणींबाबत इंडीगोने यावेळी माहिती दिली. प्रवाशांचे भाडे वाढवू नये, सेवा तात्काळ सुरळीत करावी, फ्लाइट रद्द किंवा विलंब झाल्यास प्रवाशांना वेळेवर सूचना द्याव्या, तसंच गरज असल्यास हॉटेल सुविधा देण्याचे आदेश नायडू यांनी यावेळी दिले.

****

मेरा गाव - मेरी धरोहर कार्यक्रमात अधिकृत पोर्टलवर आतापर्यंत सहा लाख २३ हजार गावांची सांस्कृतिक नोंदणी झाली आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. या कार्यक्रमात देशभरातल्या सहा लाख ३८ हजारांहून अधिक गावांची सांस्कृतिक नोंदणी केली जाणार आहे, असंही ते म्हणाले. या गावांमधल्या मौखिक परंपरा, वारसा स्थळं, अन्न संस्कृती, ऐतिहासिक माहिती, परंपरा, चाली - रीती अशी विविध माहिती संकलित केली जात असून, यामुळे ग्रामीण ओळख बळकट होण्यास मदत मिळणार असल्याचं ते म्हणाले.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला, या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा औद्योगिक परिसरातल्या ऑरिक सिटी मैदानावर, आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा होणार आहे.

****

राज्य बार कौन्सिलच्या आगामी निवडणुकांमध्ये महिलांसाठी ३० टक्के आरक्षण राहील याची खातरजमा करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं बार कौन्सिल ऑफ इंडियाला दिल्या आहेत. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुर्यकांत, आणि न्यायामूर्ती जोयमाला बागची यांच्या पीठापुढं काल सुनावणी झाली. पदाधिकाऱ्यांमध्येही महिलांसाठी काही पदं राहतील अशा पद्धतीचे नियम बार कौन्सिल तयार करेल अशी अपेक्षा असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले.

****

देशात यंदा तीन कोटी १५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं वर्तवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्रेपन्न लाख टन जास्त उत्पादन होणार आहे. अतिरिक्त साखर गोदामात पडून राहू नये यासाठी १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी, साखर महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे.

****

प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी राज्यभरातल्या बाजार समित्या आज बंद राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. बाजार समिती कायदा कालबाह्य झाल्यामुळे बाजार समिती कायदाच रद्द करून सर्वांना व्यापाराची खुली परवानगी द्यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती आकारत असलेला सेंस रद्द करावा अशा व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मसाला आणि दाणा मार्केट आज बंद आहे. सोलापूरसह जिल्ह्यातल्या ११ बाजार समित्यांमधले सुमारे सहा हजार व्यापारी या बंदमध्ये सहभागी होत आहेत.

****

जालना एटीएस पथक आणि अंबड पोलिसंनी काल संयुक्त कारवाई करत अंबड तालुक्यातल्या कौचलवाडी शिवारातून सुमारे एक कोटी रुपयांचा चार क्विंटल गांजा जप्त केला. गोपनीय माहिती आधारे पथकाने ढवळीराम चरावंडे या शेतकऱ्याच्या शेतात छापा टाकून ही कारवाई केली तेव्हा गांजाची काढणी सुरू होती. तर काही गांजा विक्रीसाठी वाळून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेनं काल अंधेरी उपनगराच्या पश्चिम भागात एका दुकानावर छापा टाकून प्रमाणित नसलेले ६४ ॲडॉप्टर्स जप्त केले. मानक चिन्हांचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आला.

****

No comments:

Post a Comment