Saturday, 6 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवरांनी आज नवी दिल्लीतील संसद संकुलात डॉक्टर बाबाबसाहेब आंबेडकरांना पुष्पांजली वाहिली. डॉक्टर आंबेडकरांनी पिढ्यांना मानवी प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रेरित केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

मुंबईत चैत्यभूमी इथं आज सकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.

इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढच्या सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. हे स्मारक आपणा सर्वांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाचं संविधान हे सर्वश्रेष्ठ असून या संविधानामुळेच सर्वांना समान संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मंत्री संजय शिरसाट, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार तसंच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अभिवादन केलं.

****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज पहाटेपासूनच चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठी रांग लावली आहे. या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने चैत्यभूमी आणि चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरवल्या असून या परिसरात समता सैनिक दलाचे जवान आणि पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. देशभरातून आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत असून अनुयायांच्या सुविधेसाठी राज्यभरातून अनेक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत यासह, अतिरिक्त लोकल्सही सोडण्यात आल्या आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांती चौक इथं तर अकोला इथं शहरातील अशोक वाटिकेसह विविध ठिकाणी सामाजिक संघटनांनी आणि संस्थांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. वाशिम इथं सकाळी साडे पाच वाजता कॅन्डलमार्च काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोर एकत्र येवून महामानवाला अभिवादन केलं.

****

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या किमान समान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणलातूर  जिल्हा न्यायालय आणि जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले.

****

राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘मावशी तेजोमयी विचारांची ज्योत‘ हे नाटक आज छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आलं आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता होणारं हे नाटक सर्वांसाठी खुलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचं येत्या सोमवारी आठ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात संबंधितांनी हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी काल राज्यभर आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथंही महात्मा फुले पुतळा ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नांदेड जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

****

राज्यात काल सर्वात कमी १० पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नागपूर इथं १० पूर्णांक आठ तर मालेगाव इथं अकरा पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव इथं १२ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं १४ पूर्णांक पाच, तर बीड इथं १३ आणि परभणी इथं १२ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज विशाखापट्टणम् इथं होणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार असून, दोन्ही संघांनी मालिकेत १-१ सामना जिंकून बरोबरी साधली आहे, त्यामुळं मालिका विजयासाठी आजचा सामना चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.

****

सॅंटियागो इथं झालेल्या ज्युनियर महिला विश्वचषकातील शेवटच्या साखळी सामन्यात भारतानं आयर्लंडचा ४-० असा पराभव केला. संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व राहिलं, भारताकडून कनिका सिवाच, पूर्णिमा यादव आणि साक्षी राणा यांनी गोल केले.

****

No comments:

Post a Comment