Sunday, 7 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

गोव्यामधील अरपोरा इथं एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा, सिलेंडर स्फोटात लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा आता पंचवीस झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत. हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करणारे कर्मचारी आणि चार पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे. या दुर्घटनेत काही जळून तर अधिकांश जण गुदमरुन दगावले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहाटे घटनास्थळी पोहचून पाहणी केली. आग विझवून परिस्थिती नियंत्रणाचं काम त्याचवेळी पूर्ण झालं होतं. घटनेचा पुढील तपास पोलिस करत असून आवश्यक अग्नि प्रतिरोधक यंत्रणेचं पालन क्लबमध्ये झालेलं नव्हतं असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा, अर्पोरा येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीसाठी त्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, त्यांनी या दुर्घटनेबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकार या दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना लाख रुपये आणि जखमींना हजार रुपये इतके अनुदान जाहीर केले असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने एका संदेशाद्वारे दिली आहे.

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून नागपुर इथं प्रारंभ होत आहे. या पार्श्वभुमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रामगिरी निवासस्थानी विरोधी पक्षनेते, गटनेते आणि विधीमंडळ सदस्यांना चहापानासाठी आमंत्रित केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदही होणार आहे.

****

राज्य घटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे साकारलेल्या चित्ररथाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत उद्घाटन झालं. राज्यभर फिरणार असलेल्या या चित्ररथाद्वारे राज्य घटनेसह त्याच्या मूलतत्वावरील माहिती, लोकशाही मूल्यांचं कलात्मक सादरीकरण तसंच प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

****

विमान प्रवाशाची झालेली गैरसोय –मन:स्तापाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगो कंपनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्सबर्स तसंच  व्यवस्थापक इसीड्रो पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना, चोवीस तासात स्पष्टीकरण देण्याचं सांगण्यात आलं आहे. इंडिगो कंपनीला सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत देण्याचे निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया आज रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. उड्डाण रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांचा प्रवास प्रभावित झाला, त्यांच्यासाठी कोणतंही पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये, असे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसंच परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब केल्यास किंवा अनुपालन न केल्यास त्वरित नियामक कारवाई केली जाईल असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे. उड्डाण रद्द झाल्यामुळे किंवा विलंबामुळे दूर गेलेलं प्रवाशांचं सामान शोधून प्रवाशांच्या निवासस्थानी किंवा त्यांनी दिलेल्या पत्त्यावर येत्या ४८ तासांच्या आत पोहोचवलं जाईल, याची खातरजमा करण्याचे निर्देशही देण्यात आले. 

****

विद्यार्थ्यांमध्ये असलेला परीक्षेचा ताण दूर करत जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून हा काळ कसा साजरा करता येऊ शकतो हा दृष्टीकोन देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ या संवादात्मक कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीचे आयोजन येत्या नववर्षाच्या जानेवारीत २०२६ होणार आहे. याद्वारे देशसह परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. २०१८ मध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली होती. आताच्या नव्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी अकरा जानेवारी २०२६ पर्यंत माय जीओव्ही संकेतस्थळावर ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक सहभागी होऊ शकतील.

चालु वर्ष २०२५मधील आठव्या आवृत्तीत साडेतीन कोटी जणांनी यात नोंदणी केली होती. २४५ हून अधिक देशांमधील विद्यार्थी, १५३ देशांतील शिक्षक आणि १४९ देशांतील पालकांच्या सहभागानं उपक्रमानं गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केलं.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं तिरुपती-साईनगर शिर्डी दरम्यान नवी साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी तिरुपतीहून दर रविवारी पहाटे चार वाजता तर शिर्डीहून दर सोमवारी साडे सात वाजता सुटणार आहे.

****

राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली असून सर्वत्र थंडी वाढली आहे.

आज सर्वत्र सूर्यप्रकाशयुक्त कोरडं हवामान राहील असं हवामानशास्त्र विभागानं जाहिर केलं आहे. गोंदियामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. पारा ९.५ अंशांपर्यंत नोंदला गेला आहे. गोंदियात गेल्या पंधरवड्यापासून विदर्भात सर्वात कमी तापमान नोंदवलं जात आहे.

****

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताने तीन सामन्यांची मालिकाही दोन – एक अशी जिंकली. काल विशाखापट्टणम इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव केला.

****

No comments:

Post a Comment