Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
वंदे मातरम हा मंत्र येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत
राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. लोकसभेत आज राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त
विशेष चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते. वंदे मातरमच्या जयघोषात स्वातंत्र्य लढ्याचं
भावात्मक नेतृत्व होतं, या गीताने त्याग आणि तपस्येचा मंत्र दिला, असं पंतप्रधान म्हणाले. वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापनदिनाच्या
ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी
नमूद केलं.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं
सुरु झालं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानं कामकाजाला प्रारंभ झाला. अर्थमंत्री अजित
पवार यांनी वर्ष २०२५-२६ च्या ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात
सादर केल्या.
विधानसभा तसंच विधानपरिषदेत आजी – माजी दिवंगत सदस्यांना
श्रद्धांजली अर्पण करुन कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
दरम्यान, विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी विदर्भाच्या या अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याची
मागणी अध्यक्षांकडे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेमुळे हे
अल्पकालीन अधिवेशन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी
ग्वाही दिली.
****
सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ
आज नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. सैनिकांच्या शौर्याचं
मोल करता येऊ शकत नाही, पण त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक नागरिकाचं
कर्तव्य आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत त्यांनी, भारतीय सेनेने जगासमोर दाखवलेली शक्ती आणि शौर्य अधोरेखित केलं.
सैनिक देशाचं रक्षण करतात, म्हणूनच देश प्रगती करू शकतो. त्यांच्या योगदानामुळे आपण सर्वजण
शांततेत आणि सुरक्षिततेत जीवन जगू शकतो. ध्वजदिनाच्या माध्यमातून सैनिक आणि त्यांच्या
कुटुंबियांसाठी योगदान देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचं नाव
नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते आज संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी हा नामांतर सोहळा होणार
आहे. राज्यातल्या सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांचं नाव देण्याचा निर्णय कौशल्य विभागाने
घेतला असून, या निर्णयाचं हे पुढचं पाऊल असल्याचं
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत मंजुरी देण्यात आली. काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
ही बैठक झाली. याअंतर्गत आता शेत रस्ते तयार करण्यासाठी १०० टक्के यंत्रसामुग्रीचा
वापर करता येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यासंदर्भातल्या समितीचे अध्यक्ष
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयात येत्या
१५ आणि १६ डिसेंबरला व्यसनमुक्तीचा जागर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी दिले आहेत. अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यात अंमली पदार्थ मिळण्याची ठिकाणे शोधणं, प्रतिबंधित औषधांची विक्री थांबवणं, युवकांना व्यसनांच्या जाळ्यात अडकवण्याच्या उद्देशाने
कार्यरत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणे अशा विविध उपायांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा वर्धापन दिन आज साजरा
होत आहे. यानिमित्त पुढचे तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याची
सुरुवात आज महानगरपालिकेच्या वतीने विविध राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करुन करण्यात
आली. महानगरपालिकेच्या वाहनांचं पथसंचलन, प्रधानमंत्री जनआरोग्य कार्ड शिबिर, गृह प्रकल्पांची ऑनलाईन सोडत, आरोग्य शिबिर, आंनद नगरी आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
****
भंडारा जिल्ह्यात पवनी – भंडारा मार्गावर असलेल्या वालेश्वर
इथल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला काल रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. याची माहिती
मिळताच काही वेळात अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी पोहचली, मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झालं, या आगीचं कारण अद्यापही समजून शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment