Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
– एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. लोकसभा आणि राज्यसभेतले एनडीएचे
सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते. सर्वपक्षीय सहकार्य, नेतृत्व आणि आगामी संसदीय
अधिवेशनाची रणनीती यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. बैठकीदरम्यान बिहार विधानसभेच्या
निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल एनडीए खासदारांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन
केलं. पंतप्रधानांनी एनडीएच्या नेत्यांना देशाच्या विकासासाठी आणखी वेगानं काम करण्याचं
आवाहन केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना
ही माहिती दिली. खासदारांनी मतदार संघासाठी कार्य करण्यावर, नागरिकांचं
जीवनमान सुधारण्यावर आणि युवा पिढीला देशाच्या कारभारात सामावून घेण्यावर भर द्यावा, तसंच सर्वसामान्यांसाठी
आमुलाग्र सुधारणा कराव्या, असंही मोदी यांनी सांगितलं.
****
इंडिगो विमान कंपनीच्या कामकाजात
व्यत्यय आल्यामुळे देशभरातल्या सर्व विमानतळांवरील परिस्थितीवर नागरी विमान वाहतूक
मंत्रालय आणि नागरी विमानवाहतूक महासंचालनालय सातत्यानं लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीचा
व्यापक आढावा घेण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
विमान वाहतूक आणि प्रवासी-केंद्रीत सेवांची पडताळणी करण्यासाठी विमानतळांना भेट द्यावी, प्रवाशांशी
संवाद साधून कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दूर कराव्या, असे निर्देश
मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
****
नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या
महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून, केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात
यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या महिला डॉक्टर
आत्महत्येप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. याप्रकरणी विशेष तपास पथकासोबतच
न्यायिक आयोगही गठीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या शाळा, महाविद्यालयांच्या
परिसरात पान, तंबाखू, तसंच अंमली पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, कायद्यात बदल
करून अशा प्रकरणांमध्ये मकोका लावण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात
सांगितलं. पान टपऱ्या उध्वस्त करण्याच्या सूचना सर्व महापालिका, नगरपालिकांना
देण्यात आल्या असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
**
राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रं
देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं मंत्री अतुल सावे यांनी
विधानसभेत सांगितलं. नागपूर जिल्ह्यातल्या अहेरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शहाणे
यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी मिळवल्याचा मुद्दा काँग्रेस नेते
विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर सावे बोलत होते. याप्रकरणी
तीन महिन्यात तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली
६२ वसतिगृहं इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भाडे तत्वावर सुरू करण्यात आल्याची
माहिती अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिली.
राज्यातली सर्व शासकीय कार्यालयं
आणि विभागांमध्ये युनिक डिसॅबिलिटी आयडी सादर करणं सक्तीचं करण्यास आल्याचं सावे यांनी
सांगितलं. आरक्षण, पदोन्नती, विविध शासकीय सवलती यांसाठी
यू डी आय डी कार्ड अनिवार्य असून, जानेवारी २०२६ अखेरपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांना कागदपत्रांची
पडताळणी सादर करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
**
विधानसभेत आज भोकरच्या आमदार
श्रीजया चव्हाण यांनी शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदीच्या नियमासंबंधी प्रश्न
उपस्थित केला. हे नियम जटिल असून, शेतकर्यांना नोंदणीसाठी अडचणी येत आहेत, परिणामी शेतकर्यांना
बाजारात कमी किमतीत सोयाबिनची विक्री करावी लागत असल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं.
सोयाबिन खरेदीचे नियम शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली.
कन्नड – सोयगावच्या आमदार
संजना जाधव यांनी जलस्त्रोतांच्या खोलीकरणाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कन्नड
आणि सोयगाव तालुक्यातल्या सर्व जलस्त्रोतांचं वैज्ञानिक सर्वेक्षण करावं, पूरग्रस्त
शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, खरडलेल्या जमिनींचं सर्वेक्षण करुन पुनर्बांधणीसाठी निधी
द्यावा, आदी मागण्या त्यांनी केल्या.
**
दरम्यान, विरोधकांनी
आज विधीमंडळाबाहेर शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन केलं. महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचं
आश्वासन दिलं मात्र अजूनही कर्जमाफी केलेली नाही, कापसाला हमीभाव मिळत नाही, असे आरोप करत
त्यांनी सरकारविरोधारत घोषणाबाजी केली.
****
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीनं, राज्यातल्या विद्यापीठाच्या
राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी
५१ वा संसदीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते आज या अभ्यास वर्गाचं उद्घाटन झालं. प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था चालते, हे समजून घेण्यासाठी
हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी प्रकरणं जास्तीत जास्त मध्यस्थीत, सामोपचाराने
सोडवण्याकरता ‘महा मेडीएशन’ ही मध्यस्थी विषयक विशेष मोहिम घेण्यात येत आहे. पक्षकारांनी
उच्च न्यायालयात प्रलंबित वैवाहिक वाद, मोटार अपघात वाद, घरगुती हिंसाचार, धनादेश अनादर
आदी प्रकरणं सोडवण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्याचं अवाहन मध्यस्थी कक्षाच्या वतीने
करण्यात आलं. २४ डिसेंबर पर्यंत ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment