Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 December 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
वंदे मातरम गीताच्या
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत चर्चा-निवडणूक सुधारणेवरच्या
चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका
·
इंडिगो कंपनीला सरकारची
नोटीस-कठोर कारवाईचा इशारा
·
सर्व शासकीय
कार्यालयांमध्ये आजपासून युडीआयडी बंधनकारक
·
एमपीएससीच्या २१ डिसेंबर
रोजी नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
आणि
·
भारत-दक्षिण आफ्रिका टी
ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ
****
स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वंदे मातरम
गीताची २०४७ मध्ये विकसित भारतातही तेवढीच आवश्यकता असेल, असं
प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज राज्यसभेत वंदे
मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चेला प्रारंभ
करतांना बोलत होते. वंदे मातरम् च्या या चर्चेतून देशाच्या भावी पिढ्यांपर्यंत या
गीताचा गौरव पोहोचेल,
असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. हे गीत देशभक्ती, त्याग
आणि राष्ट्रचेतनेचं प्रतीक असल्याचं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी
पंतप्रधान एच डी देवेगौडा,
आम आदमी पक्षाचे संजय सिंह, द्रमुकचे तिरुची
शिवा, राजदचे मनोजकुमार झा,
यांच्यासह अनेकांनी या चर्चेत सहभाग घेत आपली मतं मांडली.
****
निवडणूक आयोगाच्या संरचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप
असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभेत आज
निवडणूक सुधारांवर चर्चा झाली, त्या चर्चेत गांधी यांनी हे आरोप करत, सरकारच्या
अनेक निर्णयांवर टीका केली. काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी या चर्चेला प्रारंभ
केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची कारणं सार्वजनिक करण्याची मागणी तिवारी
यांनी केली. ते म्हणाले -
बाईट – खासदार मनीष तिवारी
या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या
सुप्रिया सुळे,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई, द्रमुकचे
दयानिधी मारन,
तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, समाजवादी
पक्षाचे अखिलेश यादव,
यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत, आपली
मतं मांडली. सुळे यांनी महाराष्ट्रात नगर परिषदा निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी
नगराध्यक्षांच्या बिनविरोध निवडीकडे लक्ष वेधलं. सशक्त लोकशाहीसाठी कायदे
सर्वांसाठी समान असावेत,
असं मत सुळे यांनी व्यक्त केलं. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे
यांनी मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाबाबत सरकारचं अभिनंदन करतांना, बांगलादेशी
घुसखोरांच्या मुद्याकडे लक्ष वेधलं. एक राष्ट्र एक निवडणूक, रिमोट
मतदानाचा अधिकार तसंच सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असण्याच्या मुद्याकडे
त्यांनी लक्ष वेधलं.
****
सर्वसामान्य माणसाचं जीवन सुलभ आणि सुखकर करण्यासाठी सर्व
क्षेत्रात चौफेर सुधारणांची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी – एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी
दिल्लीच्या संसद भवन संकुलात झाली, त्यावेळी पंतप्रधान बोलत
होते. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी झालेल्या चर्चेबद्दल माहिती
दिली. देशाच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी सर्व
खासदारांना केल्याचं,
रिजीजू यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २०२३ आणि २०२४ या
वर्षांसाठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान केले.
भूतकाळातल्या आठवणी,
वर्तमानकाळातले अनुभव आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा
कलेच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद
केलं.
****
विमान वाहतुक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कार्यरत
असल्याचं, नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे. आज लोकसभेत
यासंदर्भात केलेल्या निवेदनात, नायडू यांनी, इंडिगो
कंपनीच्या सर्व प्रकरणावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं नमूद केलं. या सर्व
प्रकारांबाबत नागरी विमान वाहतुक महासंचालनायलाने
इंडिगो कंपनीला नोटीस बजावली असून, याबाबतचा अहवाल प्राप्त
होताच, कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असं नायडू यांनी सांगितलं.
विमान वाहतुक सेवा पूर्वपदावर येत असल्याची माहिती नायडू यांनी दिली.
****
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी सकाळी
विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन
खरेदी, कापूस आयात,
आदी मुद्यावरून विरोधकांनी सरकारचं धोरण शेतकरीविरोधी
असल्याची टीका करत घोषणाबाजी केली.
फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल
करण्यात येईल,
अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत
दिली. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. नोकरी -
व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून, केंद्र
सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल, असं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमधे आणि विभागांमधे
युनिक डिसॅबिलीटी आयडी कार्ड सादर करणं आजपासून सक्तीचं करण्यात आलं आहे.
मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज ही माहिती दिली. आरक्षण, पदोन्नती, विविध
शासकीय सवलती यासाठी यू डी आय डी कार्ड अनिवार्य असल्याचं सावे यांनी सांगितलं.
भविष्यात राज्यातला एकही व्यक्ती बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणार नाही, यासाठी
यंत्रणा सतर्क केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भातील लक्षवेधीवर उत्तर देताना ते
बोलत होते. यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असल्याचंही नाईक यांनी
सांगितलं.
****
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची
मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याने राज्य लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त
पूर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. २१ डिसेंबर रोजी नियोजित असलेली गट
ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आता ४ जानेवारी रोजी होणार आहे. तर गट ३
संयुक्त पूर्वपरीक्षा ११ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. आयोगाने जारी केलेल्या
पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दरम्यान पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.
सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगड इथं, तिसरा
सामना धर्मशाळा इथं,
चौथा सामना लखनऊमध्ये तर शेवटचा सामना अहमदाबाद इथं
खेळवण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या साई इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या
वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण शिबीराचा नुकताच समारोप झाला.
महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ महिलांना
प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
बीड शहरात एका दुकानातून चोरी करणाऱ्या एका टोळीला आज
पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे आरोपी छत्रपती संभाजीनगर इथले असल्याचं समोर आलं आहे.
बीड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरात पडेगाव इथून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल
जप्त केल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं १४ ते १६ डिसेंबर दरम्यान प्रल्हादजी
अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा युवक विकास
मंडळाचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल
भारतीय मराठी साहित्य संमलनाचे नियोजीत अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील, भारतीय
जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, आणि प्रसिद्ध अभिनेते मकरंद
अनासपुरे हे यंदा या व्याख्यानमालेतली तीन पुष्प गुंफणार आहेत. संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी साडे सहा वाजता होणारी ही व्याख्यानं सर्वांसाठी खुली
आहेत.
****
तिरुपती - साईनगर शिर्डी –
तिरूपती या नव्या साप्ताहिक रेल्वेला आजपासून प्रारंभ झाला.
तिरुपतीहून रवाना झालेल्या या गाडीला रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी नवी
दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, छत्रपती
संभाजीनगर मार्गे धावणार आहे. येत्या १४ डिसेंबरपासून ही गाडी तिरुपतीहून तर १५
डिसेंबरपासून शिर्डीहून नियमित धावणार आहे.
येत्या १३ डिसेंबरपासून पंढरपूर- तिरुपती या साप्ताहिक
रेल्वेसेवेला सुरुवात होणार आहे. ही गाडी लातूरमार्गे धावणार आहे. प्रायोगिक
स्वरुपावर असलेल्या या सेवेबाबत, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून निर्णय घेतला
जाणार असल्याचं,
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य
संजय निलेगांवकर यांनी सांगितलं.
दरम्यान, ख्रिसमस तसंच नवीन वर्षाच्या
पार्श्वभूमीवर नांदेड–काकिनाडा–नांदेड या विशेष
गाडीची २९ तसंच ३० डिसेंबरला एक फेरी होणार आहे.
****
राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस
तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल जळगाव इथं नऊ पूर्णांक चार तर
अहिल्यानगर इथं नऊ पूर्णांक पाच दशांश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती
संभाजीनगर इथं १० अंश,
बीड तसंच परभणी इथं साडे दहा अंश, तर
लातूर तसंच धाराशिव इथं अकरा पूर्णांक चार दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment