Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०९ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी – एनडीएच्या
संसदीय मंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. लोकसभा आणि राज्यसभेतले एनडीएचे सर्व सदस्य
या बैठकीला उपस्थित होते. सर्वपक्षीय सहकार्य, नेतृत्व आणि आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
****
लोकसभेत आज निवडणूक सुधारणांच्या
मुद्यावर चर्चा होणार आहे. तर राज्यसभेत वंदे मातरम् च्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त
चर्चा सुरु होणार आहे.
दरम्यान, आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा
अधिभार विधेयक काल संसदेनं मंजूर केलं. चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेत परत
पाठवलं. हा उपकर अनुचित वस्तूंवरच लागू होणार असून याचं स्वरुप, उत्पादन शुल्क प्रकारचं नसेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी राज्यसभेत विधेयक मांडताना स्पष्ट केलं. गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी
लादण्याची मागणी काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी केली. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी वाढत्या मद्यपानावर चिंता
व्यक्त केली. या विधेयकाच्या माध्यमातून केवळ आरोग्याला हानीकारक असलेल्या वस्तूंवर अधिभार लावला जाईल, जीवनावश्यक वस्तूंवर
नाही, असं या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर
देताना सीतारामन म्हणाल्या. आरोग्य हा राज्य सूचीतला विषय असून, या अधिभारातून जमा होणारा महसूल राज्यांनाही
दिला जाईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
****
अनधिकृत डिजिटल लोन ॲप्सच्या कर्ज
व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकार सातत्यानं रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असल्याचं
सीतारामन यांनी काल लोकसभेत सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं यंदा एक जुलैपासून त्यांच्या
वेबसाईटवर, लोकांच्या माहितीसाठी, डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सची डिरेक्टरी
उपलब्ध केली आहे. रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या डिजिटल कर्ज ॲप्सचा त्यात समावेश आहे. अनधिकृत डिजिटल कर्ज ॲप्स ब्लॉक करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत, असं अर्थमंत्र्यांनी
सांगितलं.
****
राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या
घटनेची अद्ययावत प्रत ३० दिवसांच्या आत सादर करावी, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. पक्षांची उद्दिष्टं
आणि लोकशाही पद्धतीनं चालण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहिती देणारा हा दस्तावेज महत्त्वाचा असून, तो जमा करणं सर्व राजकीय पक्षांना बंधनकारक आहे, असं आयोगानं पक्षप्रमुखांना लिहिलेल्या
पत्रात म्हटलं आहे. या घटना आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जातात.
****
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या
आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन केलं. महायुती
सरकारने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं मात्र अजूनही कर्जमाफी केलेली नाही, कापसाला हमीभाव मिळत नाही, असे आरोप करत त्यांनी सरकारविरोधारत
घोषणाबाजी केली.
****
राज्यात महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत
कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी आयोजित
केलेल्या 'सक्षमा' या कार्यक्रमाचं उद्घाटन
केल्यानंतर ते बोलत होते. राज्यात मुले तसंच महिलांच्या सुरक्षेसह
त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे
कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना
कायदे, हक्क आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती
करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेतील घरकुल आणि मनरेगा योजनांमधल्या
जबाबदारी निश्चितीच्या मागण्यांवर निर्णय न झाल्याने महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील
अधिकारी कालपासून अनिश्चित काळासाठी सामूहिक रजेवर गेले आहेत. याविषयी लातूर जिल्हा
परिषदेत आंदोलन सुरू केलं आहे. याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं
संघटनेनं स्पष्ट केलं.
****
भटक्या कुत्र्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने
दिलेल्या निर्णयासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी
कालबद्ध कार्यक्रम राबवण्याची सूचना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी केली आहे. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. भटक्या कुत्र्यांचे आश्रय, निवारे तसंच त्यांना खाद्य देण्याचं
ठिकाणही जाहीर करण्याची सूचना त्यांनी
यावेळी केली. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, हेल्पलाईन क्रमांक विकसित करुन तो नागरिकांसाठी जाहीर करावा, असे निर्देशही स्वामी यांनी दिले.
****
केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता
देशभरात लागू केल्या आहेत. या संहितांच्या तरतुदींची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे
निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. नागपूर इथं काल याबाबतच्या बैठकीत
ते बोलत होते. कामगार कायद्यांच्या तरतुदी आणि नवीन कामगार संहितांच्या तरतुदींचा
सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
****
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या
कृषीदर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक
हिंगोली जिल्ह्यात तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्रात काल पार पडली. अनेक विषयांवर
चर्चा झालेल्या या बैठकीला शेतकरी तसंच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित
होते.
****
No comments:
Post a Comment