Wednesday, 10 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातील प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनं आज प्रसिद्ध केलेल्या यादीत ही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. आपल्यासाठी दीपावली ही केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि जीवनमूल्यांशी घट्ट जोडलेली भावना आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

भारतानं मानवाधिकाराबाबत महत्तवपूर्ण भूमिका निभावल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्ली इथं भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी मानवी प्रतिष्ठा, समता आणि न्याय या मुल्यांवर आधारित जगाची कल्पना केली होती आणि आजही त्या मूल्यांची जपणूक करणे अत्यंत आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. या समारंभात विविध मानवी हक्कांच्या उपक्रमांवरही प्रकाश टाकण्यात आला आणि भारताच्या प्रगतीशील भूमिकेचा गौरव करण्यात आला.

****

गडचिरोली इथं ११ नक्षलवाद्यांनी आज पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर  आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर एकूण ८२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे २०१५ पासून आतापर्यंत एकूण ११२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

****

राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनानं जाहीर केलेली टोल प्रणालीत आवश्यक सुधारणा करून टोल माफी येत्या आठ दिवसात लागू करण्याची कारवाई करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले, प्रशोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नावर ते बोलत होते. शंकर जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले. सरकारनं या वाहनांना टोल माफी जाहीर केली मग आता शब्द फिरवता येणार नाही, सर्व संबंधित टोल नाक्यांवर ई-वाहनांकडून टोल वसूल न करण्याच्या सूचना आठ दिवसात देण्यात याव्यात. अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या.

****

राज्यातील सर्व वाईन शॉप्स स्थलांतरित करण्यासाठी संबंधित इमारतीच्या सोसायटीचा ना हरकत दाखला घेणं अत्यावश्यक करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात केली. मूळ प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातील एका दुकानाबाबत शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता.

****

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि हस्तशिल्प विकास आयुक्त कार्यालय यांनी छत्रपती संभाजीनगर इथं हस्तशिल्प कारागिरांसाठी दोन दिवसीय प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठ परिसरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. नागरिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे.

****

छत्तीसगड राज्यातील पोलिसांच्या वाहनाला ट्रकनं धडक दिल्याची घटना भंडारा जिल्ह्यात लाखनी जवळ घडली. या अपघातात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी  आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल करत ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे.

****

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार इथं येत्या १६ आणि १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. किसानपुत्र आंदोलनाच्या माध्यमातून अमर हबीब यांनी भरीव काम केलं असून साहित्यिक चळवळीत सक्रीय त्यांचा सहभाग आहे. शिरूर कासार मधल्या एकलव्य विद्यालयात होणाऱ्या या साहित्य संमेलनात अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, कवी, कथाकार, कलावंत सहभागी होणार आहेत. संमेलन स्थळाला ग्रामीण कथाकार भास्कर चंदनशीव साहित्य नगरी असं नाव  देण्यात आलं आहे.

****

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर संघाची कर्णधार आणि स्मृती मानधना उपकर्णधार आहे. फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा आणि विकेटकीपर जी. कमलिनी या मालिकेतून क्रिकेट पदार्पण करणार आहेत. २१ ते ३० डिसेंबर दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने विशाखापट्टणममध्ये आणि उर्वरित तीन सामने तिरुवनंतपुरममध्ये खेळवले जातील.

****

No comments:

Post a Comment