Wednesday, 10 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथील करणारं विधेयक विधानसभेत मंजूर

·      शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पान, तंबाखू, तसंच अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी मकोका लावण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची विधीमंडळात माहिती

·      लोकसभेत निवडणूक सुधारांवर चर्चा, सरकारच्या अनेक निर्णयावर विरोधी पक्षांची टीका

·      एमपीएससीच्या २१ डिसेंबर रोजी नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

·      आणि

·      पहिल्या टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी विजय

****

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं. यामुळे सर्व जमीन धारकांची नावं सात बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.  ते म्हणाले…

 

बाईट – चंद्रशेखर बावनकुळे

 

या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या 'एन ए' परवानगीची गरज भासणार नाही. त्याऐवजी 'एक वेळचं अधिमूल्यभरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असं या विधेयकात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. विधीमंडळाच्या इतर कामकाजाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..

बाईट – विधीमंडळ कामकाज

****

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.

****

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात काल दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन खरेदी, कापूस आयात, आदी मुद्यावरून विरोधकांनी सरकारचं धोरण शेतकरीविरोधी असल्याची टीका करत घोषणाबाजी केली.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काल राज्यसभेत वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेला प्रारंभ करतांना, वंदे मातरम् गीताच्या या चर्चेतून देशाच्या भावी पिढ्यांपर्यंत या गीताचा गौरव पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. हे गीत देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रचेतनेचं प्रतीक असल्याचं शहा यांनी नमूद केलं.

****

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, द्रमुकचे तिरुची शिवा, राजदचे मनोजकुमार झा, यांच्यासह अनेकांनी या चर्चेत सहभाग घेत आपली मतं मांडली.

****

निवडणूक आयोगाच्या संरचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभेत काल निवडणूक सुधारांवर चर्चा झाली, त्या चर्चेत गांधी यांनी हे आरोप करत, सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका केली. काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी या चर्चेला प्रारंभ केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची कारणं सार्वजनिक करण्याची मागणी तिवारी यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई, द्रमुकचे दयानिधी मारन, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली मतं मांडली.

****

विमान वाहतुक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं, नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे. काल लोकसभेत यासंदर्भात केलेल्या निवेदनात, नायडू यांनी, इंडिगो कंपनीच्या सर्व प्रकरणावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं नमूद केलं. या सर्व प्रकारांबाबत नागरी विमान वाहतुक महासंचालनायलाने इंडिगो कंपनीला नोटीस बजावली असून, याबाबतचा अहवाल प्राप्त होताच, कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असं नायडू यांनी सांगितलं. विमान वाहतुक सेवा पूर्वपदावर येत असल्याची माहिती नायडू यांनी दिली.

दरम्यान, विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगो विमान कंपनीनं नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत पाच टक्के कपातीचे निर्देश दिले. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुधारित वेळापत्रक दाखल करण्याची सूचनाही महासंचालनालयाने कंपनीला केली आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्यान राज्य लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. २१ डिसेंबर रोजी नियोजित असलेली गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आता चार जानेवारीला. तर गट ३ संयुक्त पूर्वपरीक्षा ११ जानेवारीला घेण्यात येणार आहे. आयोगाने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करायची मुदत ५ दिवस, म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करायची मुदतही २७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभागाचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. भागवत कराड यांनी काल राज्यसभेत मांडली. मराठवाड्यात औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील वाढता विस्तार लक्षात घेता, रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास तसंच नवीन मार्गांची आवश्यकता याकडे लक्ष देण्याची मागणी कराड यांनी केली.

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी जिल्ह्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. विमा कंपन्यांनी यासंदर्भातल्या दाव्यांचा जलद निपटारा करावा, अशी मागणीही भुमरे यांनी केली.

****

वर्ध्याजवळ करंजा घाडगे इथं एका बेकायदा मेफेड्रॉन उत्पादन केंद्रावर छापा टाकून १९२ कोटी रुपये किंमतीचे १२८ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हा पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायनं आणि सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या या कारवाई प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्य टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं ६ बाद १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका संघाचा डाव अवघ्या ७४ धावांवर संपुष्टात आला. सामनावीर हार्दिक पंड्यानं अष्टपैलू कामगिरी करत भारताचा विजय सुकर केला.     अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगड इथं, तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा सामना लखनऊ तर शेवटचा सामना अहमदाबाद इथं खेळवण्यात येणार आहे. 

****

लातूर जिल्ह्यातल्या साई इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण शिबीराचा नुकताच समारोप झाला. महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

राज्यात काल सर्वात कमी आठ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. जळगाव इथं नऊ पूर्णांक चार, तर अहिल्यानगर इथं नऊ पूर्णांक पाच दशांश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं १०, बीड तसंच परभणी इथं साडे दहा, तर लातूर तसंच धाराशिव इथं अकरा पूर्णांक चार दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

**** 

No comments:

Post a Comment