Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१० डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधीमंडळ
अधिवेशनात आज विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यात जायकवाडी धरणात नाशिकमधून पाणी सोडल्यानंतर
परिसरातील गावांना निर्माण होणारा पुराचा धोका,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा वार्षिक लेखा
अहवाल यांचा समावेश आहे.तसंच पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन मतदान होणार आहे. विधानपरिषदेत
तारांकित प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.
****
लोकसभेत आज निवडणूक सुधारणा विषयक
चर्चा पुन्हा सुरू होणार असून गृहमंत्री अमित शहा चर्चेला आज उत्तर देतील. तर, राज्यसभेत वंदे मातरम् गीताला १५०
वर्ष झाल्यानिमित्त सुरु असलेली चर्चा पुढे सुरु राहणार आहे.
****
आज मानवाधिकार दिवस. १९४८ मध्ये आजच्याच
दिवशी मानवाधिकारांची सार्वभौम घोषणा स्वीकृत करण्यात आली होती.या औचित्याने राष्ट्रीय
मानवाधिकार आयोगाच्या वतीने आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित कार्यक्रमाला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु संबोधित करणार आहेत. सर्वांसाठी आवश्यक असणऱ्या जनसेवांची
सन्मानपूर्ण उपलब्धता निश्चित करणं, ही यावर्षीच्या मानवाधिकार
दिनाची संकल्पना आहे.
***
संविधानानं समाजाला आणि राष्ट्राला
जोडण्याचं कार्य केलं असून, सहज आणि सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात
उपलब्ध होत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. ‘भारतीय संविधानाची
अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर गेल्या २६ मार्च रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचं पुस्तक काल राज्यपालांच्या हस्ते
मुंबईत प्रकाशित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे या पुस्तकाचं संकलन
आणि संपादन करण्यात आलं आहे.
***
परिवहन विभागाच्या वतीनं झेब्रु शुभंकराचं
अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. रस्ता सुरक्षेच्या
दृष्टीने शुभंकराचं अनावरण हे परिवहन विभागाचं महत्त्वाचं पाऊल असून शुभंकरामुळे रस्ता
सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांनी
वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा तसंच रस्ता- सुरक्षा जीवन
रक्षा हा मूलमंत्र अंगीकारावा आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं.
***
पुण्यात आजपासून एकाहत्तराव्या सवाई
गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव १४ तारखेपर्यंत ५ सत्रात
रंगणार असून या महोत्सवात निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच आपली कला सादर करणार आहेत.
आज दुपारी ३ वाजता लोकेश आनंद यांच्या सनई वादनाने सवाई गंधर्व महोत्सवाची सुरुवात
होणार आहे .
***
वरिष्ठ वेतन श्रेणीतील वेतन निश्चितीची
पडताळणी तसंच सेवापटावर सही करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जालना
जिल्हाधिकारी कार्यालयातला शिक्षण लेखा अधिकारी पांडुरंग बेलेकर याला छत्रपती संभाजीनगर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली. या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं १४ ते १६ डिसेंबर
दरम्यान प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय
मराठी साहित्य संमलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री
विनोद तावडे, आणि प्रसिद्ध अभिनेते
मकरंद अनासपुरे यंदा या व्याख्यानमालेतली तीन पुष्प गुंफणार आहेत. संत एकनाथ रंगमंदिरात
सायंकाळी साडे सहा वाजता होणारी ही व्याख्यानं सर्वांसाठी खुली आहेत.
****
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे
१६ आणि १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब यांची निवड करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाच्या माध्यमातून
अमर हबीब यांनी भरीव काम केले असून साहित्यिक चळवळीत सक्रीय त्यांचा सहभाग आहे
****
तिरुपती साईनगर शिर्डी या नव्या साप्ताहिक
रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला. तिरुपतीहून रवाना झालेल्या या गाडीला रेल्वे राज्यमंत्री
व्ही सोमण्णा यांनी नवी दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार
आहे. येत्या १४ डिसेंबरपासून ही गाडी तिरुपतीहून तर १५ डिसेंबरपासून शिर्डीहून नियमित
धावणार आहे.
येत्या १३ डिसेंबरपासून पंढरपूर-तिरुपती
या साप्ताहिक रेल्वेसेवेला सुरुवात होणार आहे. ही गाडी लातूरमार्गे धावणार आहे. प्रायोगिक
स्वरुपावर असलेल्या या सेवेबाबत, प्रवाशांचा प्रतिसाद
पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचं, मध्य रेल्वेच्या सोलापूर
विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment