Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11 December
2025
Time 01.00 to 01.05
PM
Language Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ डिसेंबर
२०२५ दुपारी
१.०० वा.
****
विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या
तासात नाफेड आणि सीसीआय मार्फत शेतमाल खरेदी संदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.
या खरेदी केंद्रांद्वारे सोयाबिन आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्याकडे सदस्य संतोष
दानवे, विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी
दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सरकारला निर्देश देण्याचं आश्वासन दिलं. मात्र
तरीही विरोधकांचं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान, महाराष्ट्र
लोक आयुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत आज संमत झालं. या विधेयकात तीन छोटे बदल
करण्यात आले असून, यामध्ये नवीन भारतीय दंड संहितेचं नाव बदलून, भारतीय न्याय
सुरक्षा संहिता असं करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
****
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलच्या
मिश्रणामुळे भारताच्या कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात ७३६ लाख मेट्रिक टनची घट झाल्याची
माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज लोकसभेत
प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. इथेनॉल हे एक हरित इंधन आहे आणि ते प्रदूषण कमी
करतं, तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यातही मदत करतं, असं त्यांनी सांगितलं. सध्या
भारत दरवर्षी सुमारे २२ लाख कोटी रुपयांचं जीवाश्म इंधन आयात करतो, विकसित राष्ट्र
बनण्यासाठी हे आयातीचं प्रमाण कमी करण्याची गरज असल्याचंही गडकरी यांनी नमूद केलं.
**
युनेस्कोच्या अमूर्त वारसा
यादीत दिवाळीचा समावेश करण्यात आल्याबद्दल राज्यसभेत आज अभिनंदन करण्यात आलं. हा देशासाठी
अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचं सभापती सी पी राधाकृष्णन यावेळी म्हणाले. दिवाळी हा
केवळ एक सण नाही, तर तो अंधारावर प्रकाशाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या
विजयाचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. यामुळे देशातल्या नागरीकांना समृद्ध वारसा आणि
परंपरा जपण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही सभापतींनी व्यक्त
केला.
****
देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती
सूर्य कांत यांनी न्यायालयांमध्ये कृत्रिम बुद्दिमत्ता – एआय उपकरणांचा समावेश करणं, विकसित करणं
आणि वापर करण्यासंदर्भात असलेल्या अभ्यास समितीचं पुनर्गठन केलं आहे. न्यायमूर्ती पी
एस नरसिंहा या पाच सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. न्यायव्यवस्थेत दक्षता, सुलभता आणि
पारदर्शकता वाढवण्यासाठी ही एआय समिती स्थापन करण्यात आली आहे.
****
गोवा नाईट क्लब आग प्रकरणी
संबंधित क्बबचे मालक लुथरा बंधुंना थायलंड पोलिसांनी अटक केली आहे. या आगीत २५ जणांचा
मृत्यू झाला असून, सौरभ आणि गौरव लुथरा या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण गोव्याच्या
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळांवर आतिशबाजी तसंच ज्वालाग्रही पदार्थांवर बंदी
घातली आहे. सर्व नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्टहाऊस, तसंच मनोरंजन
स्थळांना हा निर्णय लागू आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगाम
सुरू झाल्यानंतर कृषी केंद्रांमधील खत आणि बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचं निदर्शनास
आल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातल्या ३१७ कृषी केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत
गंभीर तोटा आढळलेल्या ३३ केंद्रांना बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, ७१ कृषी केंद्र
विक्रेत्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी नगरपालिकेत
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. नगरपालिकेतल्या
चार प्रभागांसाठी दाखल एकूण उमेदवारी अर्जांपैकी तीन जणांना माघार घेतली असून, आता चार जागांसाठी
२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातल्या सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची
मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला, मुलींना किमान कौशल्य विकास
कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यास प्राधान्य द्यावं, असे निर्देश जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातल्या बैठकीत
ते बोलत होते. उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी
यावेळी दिले.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात
दुसरा टी–ट्वेंटी क्रिकेट सामना आज चंदीगड इथं होणार आहे. सायंकाळी सात वाजता सामन्याला
सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून भारताने एक शून्य अशी आघाडी
घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment