Thursday, 11 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीला लोकसभेकडून मुदतवाढ

·      मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

·      लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा

·      मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरूण घालत असल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप

आणि

·      वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिले शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान

****

लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीला लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. या समितीचा कार्यकाळ, पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावा, असा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी मांडला, हा प्रस्ताव लोकसभेने आवाजी मतदानानं मंजूर केला.

येत्या २० वर्षांत जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत ३५ टक्के वाटा भारताचा असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

भारत हा विकसित देश होण्यासाठी इंधनाची आयात कमी करण्याची गरज, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचं मिश्रण केल्यानं भारताचं कार्बन उत्सर्जन ७३६ लाख मेट्रिक टनांनी कमी झाल्याची माहिती गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

****

राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांबाबत चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेस नेते अजय माकन यांनी चर्चेला सुरुवात केली. अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. तत्पूर्वी, वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी समारोप केला. स्वातंत्र्यलढा न अनुभवलेल्या आजच्या तरुण पिढीला या चर्चेद्वारे या लढ्याबाबत सखोल माहिती तसंच भविष्यकालीन वाटचालीची प्रेरणा मिळेल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.

****

मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने सुधारणा विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील ९७ गट, जालन्यातील १०, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा इथल्या १० गटांमध्ये असलेल्या कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या जमिनींवरील घरे मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचे वर्ग-१ मालकी हक्क या विधेयकामुळे मिळणार आहे. मात्र देवस्थानांशी या विधेयकाचा काहीहीच संबंध नसल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

****

महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत आज संमत झालं. या विधेयकात तीन छोटे बदल करण्यात आले असून, यामध्ये नवीन भारतीय दंड संहितेचं नाव बदलून, भारतीय न्याय सुरक्षा संहिता असं करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

****

दरम्यान, लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. डिसेंबर २०२४ पासून सदर विधेयक राष्ट्रपतींच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आलं असून अद्याप यावर कारवाई होत नसल्यानं आपण उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं आहे.

****

विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात नाफेड आणि सीसीआय मार्फत शेतमाल खरेदी संदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सरकारला निर्देश देण्याचं आश्वासन दिलं. या उत्तराने समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.

****

पैठण तालुक्यासाठीच्या वॉटरग्रीड योजनेत या विधानसभा मतदार संघात असलेली, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली ४४ गावं जोडण्याची मागणी आमदार विलास भुमरे यांनी आज विधानसभेत केली. ते म्हणाले -

बाईट - आमदार विलास भुमरे

****

मुख्यमंत्री हे मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. लाडक्या बहिणीचे २१०० रुपये कधी देणार, हा प्रश्न आपण अधिवेशनात विचारणार असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यावरूनही त्यांनी टीका केली.

****

राज्य सिकलसेलमुक्त करण्यासाठी तत्काळ आणि मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आज नागपूर इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. रुग्णांची अचूक ओळख करुन त्यांना तत्काळ ओळखपत्र देऊन सुसंगत नोंद ठेवण्याची सूचना आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.

****

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी १० हजार रुपयांचे प्रवास कूपन देणार आहे. वर्षभराच्या आत इंडिगोचे तिकीट आरक्षित करण्यासाठी या कुपनचा वापर करता येईल. याशिवाय २४ तासापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना ५ ते १० हजार रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाणार आहे.

****

गोवा नाइट क्लब अग्निकांड प्रकरणातले आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांना थायलंड पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. गेल्या शनिवारी झालेल्या दुर्घटनेनंतर लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते. भारत सरकारच्या विनंतीवरून आज त्यांना फुकेत इथून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना भारतात परत आणायची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिले शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या २७ दीक्षांत समारंभात, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय तसंच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इन्द्र मणी यांच्याहस्ते विभागातल्या दोन महिला शेतकऱ्यांसह एकूण ११ शेतकऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. श्रीरंग देवबा लाड यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे. दोन हजार ५९१ स्नातकांना पदवी, ३३३ जणांना पदव्युत्तर पदवी तर ४४ जणांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखेत उत्कृष्ट कामगिरीसाठी विद्यापीठाची १४ सुवर्ण पदकं, विविध दात्यांची ११ सुवर्ण तसंच एक रौप्य पदक आणि १२ रोख पारितोषिकांचं वितरणही आज करण्यात आलं.

****

ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचं आज मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी २५ हून अधिक हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांसंह अनेक मालिकांचं लेखनही केलं. त्यांनी लिहिलेल्या ‘बंदिनी’, ‘परमवीर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या तीनही मालिकांना लागोपाठ तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या सर्वांगीण नियोजनासाठी नागपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी विभागनिहाय, बूथनिहाय आणि विषयनिहाय विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक समितीला स्पष्ट जबाबदाऱ्या देत मजबूत संघटन उभारण्याचे आणि लोकसंपर्क वाढवण्याचे निर्देश यावेळी शिंदे यांनी दिली.

****

परभणी जिल्ह्यात कापूस उत्पादन क्षमता जास्त असल्यानं सीसीआयची कापूस खरेदी मर्यादा प्रति हेक्टर १५ क्विंटल ची मर्यादा वाढवून २५ क्विंटल प्रति हेक्टर करण्यात यावी अशी मागणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे.

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या कार्यपद्धती आणि निधी वापरासंदर्भातील गंभीर मुद्द्यांवर आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, शिवसेनेचे किशोर दराडे आणि भाजपाचे सदाभाऊ खोत यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

****

मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना दोन दिवस थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक तसंच सोलापूर जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment