Thursday, 11 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभेत निवडणूक सुधारणेवरची चर्चा पूर्ण-केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेला उत्तर

·      राज्यात वीजनिर्मिती क्षमतेत पाच हजार ८०० मेगावॅटने वाढ होणार-मुख्यमंत्र्यांची माहिती, तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

·      इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली पथकर माफी येत्या आठ दिवसात लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

·      दीपावली सणाचा युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समावेश

आणि

·      भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान चंदिगड इथं आज दुसरा टी-ट्वेन्टी क्रिकेट सामना

****

निवडणूक आयोगावर आरोप करणं म्हणजे भारतीय लोकशाहीची प्रतिमा जगभरात मलीन करण्याचा प्रकार असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. लोकसभेत काल निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांचे हे आरोप निराधार असून, निवडणूक प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये कोणताही संभ्रम नसल्याचं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

मतदार यादीतल्या घुसखोरांसाठी डीटेक्ट, डीलीट आणि डीपोर्ट या त्रिसूत्रीचा वापर करण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. दरम्यान, शहा उत्तर देत असतांनाच काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

****

वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत कालही चर्चा झाली. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे जयराम रमेश, भाजपचे डॉ भागवत कराड, यांच्यासह विविध पक्षांच्या सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. डॉ कराड यांनी पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ यांनी वंदे मातरम् आंदोलनात घेतलेल्या सहभागाच्या आठवणीला उजाळा दिला...

बाईट – खासदार डॉ.भागवत कराड

****

अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत १६० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत एक हजार ३०० स्थानकांचा विकास केला जाईल, तसंच प्रवाशांसाठी सोयी सुविधा तयार केल्या जातील, असंही वैष्णव यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे वीजनिर्मिती क्षमतेत पाच हजार ८०० मेगावॅटने वाढ होणार आहे. काल यासंदर्भात झालेल्या तीन सामंजस्य करारांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या करारांनुसार राज्यात २३ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११ हजार ५०० रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्रात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली पथकर माफी येत्या आठ दिवसात लागू करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून वसूल झालेली पथकराची रक्कम परत करावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. ते काल विधानसभेत यासंदर्भातल्या एका प्रश्नावरच्या चर्चेनंतर बोलत होते. अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवण्याची आणि त्या स्टेशन्सच्या क्षमतेत वाढ करण्याची सूचनाही अध्यक्षयांनी यावेळी केली.

****

राज्यात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संदर्भात सुरक्षा उपाययोजना न पाळणाऱ्या उद्योगांवर खटले दाखल करण्याचा इशारा कामगार मंत्री विधीज्ञ आकाश फुंडकर यांनी दिला आहे. विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात ते बोलत होते. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधनं न देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल तसंच विनापरवाना सुरू असलेल्या युनिट्ससंदर्भात ‘स्पेशल ड्राईव्ह’ घेण्यात येईल, अशी माहितीही फुंडकर यांनी दिली.

****

जमीन महसूल प्रक्रियेत अकृषिक परवानगीची अट रद्द केल्यानंतर त्यापुढील ‘सनद’ घेण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. या संदर्भातील ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक’ महसूलमंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी काल विधानसभेत मांडलं. या विधेयकाच्या तरतुदीनुसार जमिनीच्या वापरासाठी रेडी रेकनरच्या आधारावर प्रीमियम भरून वापर नियमित करता येणार आहे.

****

मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त काल नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या अधिकारांचंही रक्षण व्हायला हवं, असं सांगत, राष्ट्रपतींनी मानवाधिकार दिवस हा फक्त एका दिवसापुरताच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात दररोज साजरा झाला पाहिजे, असं नमूद केलं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या खुल्या कारागृहात काल कैद्यांसोबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसंच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मानवी हक्क आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.

****

दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा ठरला आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमांवरून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल समाजमाध्यमांवर आनंद व्यक्त केला. दीपावली हा फक्त सण नाही तर आपल्या संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांशी जोडलेली दृढ भावना असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. यापूर्वी रामलीला, दुर्गापूजा आणि इतर अनेक भारतीय परंपरा तसंच पारंपरिक कौशल्यांचा युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समावेश झालेला आहे.

****

जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असल्याचं महसूलमंत्री आणि भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. स्थानिक पातळीवर काही जागांवर अडचणी येऊ शकतात, मात्र त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे प्रमुख अंतिम निर्णय घेतील असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

****

गडचिरोली इथं काल ११ जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण ८२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती याच्या शरणागतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सी-६० कमांडोंचा यावेळी सत्कार केला. उर्वरित नक्षवाद्यांनाही शस्त्रं टाकून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन त्यांनी केलं. गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे २०१५ पासून आतापर्यंत ११२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

****

ध्वजदिन निधी-२०२४ संकलनात बीड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यानं ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एक कोटी ३२ लाख ३० हजार रुपये निधी संकलित केला. या कामगिरीबद्दल राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काल मुंबईत लोकभवन इथं झालेल्या कार्यक्रमात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा विशेष सत्कार केला.

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात विद्यापीठाचा पहिला शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार पैठण तालुक्यातले युवा शेतकरी यज्ञेश कातबने यांना प्रदान करण्यात येणार आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम.कॉम पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १२ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. नांदेडच्या यशवंत महाविद्यालय तसंच पीपल्स महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र, तांत्रिक कारणांमुळे बदलण्यात आलं असून आता या विद्यार्थ्यांची परीक्षा पीपल्स महाविद्यालयात होणार आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी–ट्वेंटी क्रिकेट सामना आज चंदीगड इथं होणार आहे. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून भारताने एक शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरासह गिरी प्रदक्षिणा व्हावी, यासाठी मार्ग तयार करण्याच्या सूचना, प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी या परिसराच्या विकास आराखड्याच्या कामाचा काल आढावा घेतला. ज्येष्ठ स्थानिक नागरिकांकडून गिरी प्रदक्षिणा मार्गाची माहिती घ्यावी, त्याला टॅक्रींग वे म्हणून विकसित करण्याची सूचना रेड्डी यांनी केली.

****

राज्यात काल सर्वात कमी साडे सात अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल नागपूर, जळगाव तसंच नाशिक इथं आठ अंश, पुण्यात साडे आठ अंश तर बीड इथं नऊ अंश तापमानाची नोंद झाली. परभणी इथं साडे दहा अंश, छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक आठ दशांश, तर धाराशिव इथं सुमारे साडे बारा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment