Thursday, 11 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा राज्यसभेत आज सुरु राहणार आहे. केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते जे पी नड्डा यांच्या भाषणाने ही चर्चा संपेल. त्यानंतर, राज्यसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरू होईल.

****

गेल्या आठवड्यात इंडिगो विमानांच्या उड्डाणांना विलंब आणि उड्डाणं रद्द होण्याच्या घटनांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरुग्राम मधल्या इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथक स्थापन केलं आहे. महासंचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, उपमुख्य उड्डाण संचालक निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालचं आठ सदस्यांचं पथक विमान संख्या, कर्मचार्यांची उपलब्धता, कामाचे तास, आनियोजित सुट्या, कॉकपिट आणि केबिन कर्मचार्यांसाठी राखीव कर्मचारी यासह प्रमुख कार्यचालन क्षेत्रांवर लक्षण ठेवणार आहे.

****

भारतातले रेल्वे तिकीटाचे दर शेजारी देशांपेक्षा परवडणारे आहेत, हे दर परवडणारे राहावेत यासाठी ६० हजार कोटी रुपयांचं अनुदान दिल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनापूर्वीचे तिकीट दर लागू केले जातील का या प्रश्नाचं उत्तर देताना ते बोलत होते. भारतातले रेल्वे तिकीटाचे दर विकसित देशांपेक्षा पाच ते दहा टक्के कमी आहेत, असं वैष्णव म्हणाले. एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली उपक्रम सुरू करण्यात आला आहे, रेल्वे डबे आणि स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, तसंच महिलांच्या डब्यात प्रवेश करणाऱ्या पुरुषावर कठोर कारवाई केली जात असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत दिली. लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले असून, आत्तापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यातल्या १२ ते १४ हजार महिलांच्या नावावर पुरुषांची बँक खाती जोडलेली असल्याचं पडताळणीत आढळलं असून, अशा प्रकरणांचा सखोल तपास करून कुठलीही पात्र महिला, लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री केल्याचं तटकरे म्हणाल्या. तसंच ८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही घेतलेल्या रकमेची वसुली सुरू असून पुढच्या दोन महिन्यांत ती पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचं नाव एफआयआरमधे न नोंदवता इतर व्यक्तींची चौकशी करत पोलीस पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर झाली, त्यावेळी न्यायालयानं हा प्रश्न विचारला. यावर पोलीस कायद्यानुसार आवश्यक कारवाई करतील, असं सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी न्यायालयाला सांगितलं.

****

एका दूध उत्पादक आणि कृषी कंपनीविरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं राज्यात काल विविध ठिकाणी छापे टाकले. गुंतवणूकदारांच्या १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. विद्यानंद डेअरी आणि विद्यानंद ॲग्रो फीड या कंपन्याचा प्रवर्तक आनंद लोखंडे आणि काही व्यावसायिकांच्या आस्थापनांवर छापे टाकले, त्यात पुणे शहर आणि बारामतीतल्या प्रत्येकी दोन, तर इंदापुरातल्या एका ठिकाणाचा समावेश आहे.

****

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ तुळापूर ते समाधी स्थळ वढू बुद्रुक या ऐतिहासिक स्थळांना जोडणाऱ्या नवीन रस्ता आणि भीमा नदीवरील पुलाच्या निर्मितीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विकास आराखडा राबवताना ग्रामस्थांच्या सूचनांना प्राधान्य द्यावं, तुळापूर आणि वढू बुद्रुक परिसराचा विकास अत्यंत संवेदनशीलता आणि श्रद्धेने करावा, आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पॅकेज टूर उपक्रमाच्या अंतर्गत यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात चार हजार ३९ पॅकेज सहली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या. यातून महामंडळाला १९ कोटी रुपये उत्पन्न मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शेतजमिनीच्या खरेदी खतासंदर्भात मनाजोगा निकाल देण्याकरता लाच मागणाऱ्या सिन्नर इथल्या नायब तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं. संजय भिकाजी धनगर असं त्याच नाव आहे.

****

वर्ध्याजवळ करंजा घाडगे इथं बेकायदा मेफेड्रॉन उत्पादन केंद्रावर छापा टाकून १९२ कोटी रुपये किंमतीचे १२८ किलो अंमली पदार्थ आणि सामग्री जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या या कारवाई प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment