Friday, 12 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 12 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवराज पाटील यांच्या निधनाची माहिती सदनाला दिली आणि त्यांच्या संसदीय आणि प्रशासकीय योगदानाचं स्मरण केलं.

शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज सकाळी लातूर इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता लातूरजवळ वरवंटी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात आज २००१ मध्ये झालेल्या संसद हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये १५ हजार शिक्षकांची पद रिक्त असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी आज सभागृहात दिली. यावर काँग्रेस सदस्य नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत राज्यात शिक्षकांची ३७ हजार पद रिक्त असल्याचं सांगितलं. राज्यात शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत आणण्याची गरज असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तरात सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, अर्थात उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी महिलांना ग्यानसखी हे नाव देण्यात येणार आहे, त्यासंदर्भातील शासन आदेश आजच जारी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली. तसंच उमेदच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाबाबतही निर्णय झाल्याचं ते म्हणाले. उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी महिला कामगारांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीनं लागू करण्याची मागणी आमदार संतोष बांगर यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. 

****

दरम्यान, विधानपरिषदेतील चर्चेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्य उमा खापरे यांनी राज्यातील परिचारिकांचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात नऊ ऑक्टोबर २०१७ रोजी केंद्र शासनाकडून पत्र प्राप्त झाल्याची माहिती दिली. राज्यात नर्सिंग कॅडरची सुमारे १२ हजार पदं असून महाराष्ट्रातील आरोग्य सेवा तीन विभागांत विभागली असल्‍याचं ते म्‍हणाले. तिन्ही विभागांची बैठक घेऊन नर्सिंग कॅडरमधील महिलांच्या समस्या समजून घेऊन सरकार सुधारणा करेल, अस त्यांनी सांगितलं.

****

पुणे महानगरपालिकेत लोहगावासह ११ नवीन गावांचा समावेश प्रस्तावित असलेल्या विकास आराखड्याची अंतिम प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून, कायद्यानुसार सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम आराखडा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधीमंडळात दिली. सदस्य बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला सामंत उत्तर देत होते. शेतकरी, नागरिक आणि भागधारक यांनी केलेल्या हरकती तसंच सूचना विचारात घेवूनच आराखडा अंतिम करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणातील नाशिक विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. शासनाच्या शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. शालार्थ क्रमांक आणि व्यक्तिगत मान्यता प्रकरणातील अननियमिततेबद्दल सरकारनं २३ ऑगस्ट २०१७ रोजी घेतलेल्या  निर्णयानुसार चव्हाण यांना सुनावणी घेण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या निर्धारित वेळेत घेतल्या नाहीत हे अहवलातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान, नाशिक विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनाही अटक करण्यात आली असून सध्या ते मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

****

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात १५१ जन्म नोंदणी अर्जातील जन्मस्थळ आणि जन्म तारीख संदर्भात शैक्षणिक कागदपत्रांचा अभाव असल्याचा ठपका ठेवून उदगीर तहसीलदार राम बोरगावकर यांनी १५१ जणांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र रद्द केली आहेत. माहितीच्या अधिकारात उदगीर महसूल प्रशासनाकडे सदर जन्म नोंदणी अर्जातील कागदपत्रांसंदर्भात माहिती मागितली होती. यात सर्व अर्ज संचिकांची सुक्ष्म तपासणीत करुन अर्जाच्या संचिकेतील जन्मस्थळ आणि जन्म तारीख संदर्भात पुरावा दर्शविणाऱ्या कागदपत्रांची तहसील कार्यालयात सुनावणी घेऊन फेरतपासणी त्रुटी आढळलेल्या नोंदी रद्द केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हवामान

नाशिक शहरात पार घसरला असून आज नाशिक आणि निफाड मध्ये यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकमध्ये सात पूर्णांक आठ तर निफाड तालुक्यात पाच पूर्णांक सात अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागानं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज आणि उद्या थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment