Friday, 12 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      दोन टप्प्यात होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ११ हजार ७१८ कोटी रुपये निधी मंजूर-जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीचीही नोंद होणार

·      महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      आठवडाभराच्या हिवाळी अधिवेशनामुळे नागपूर कराराचा अनादर-काँग्रेसची टीका

·      माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर उद्या अंत्यसंस्कार

आणि

·      जालन्यात उद्यापासून दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचं आयोजन

****

आगामी जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ११ हजार ७१८ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. दोन टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेसाठी तीस लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या जातीची नोंदही केली जाणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव

****

२०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवर आज लोकसभेत चर्चा झाली. एक लाख ३२ हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला सदनाची परवानगी मागणारं हे विधेयक अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलं, यामध्ये खतांवरच्या अनुदानासाठीच्या १८ हजार कोटींहून अधिक तरतुदीचा समावेश आहे.

****

महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. राज्य शासनाची दूरदृष्टी आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. नक्षलवाद संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलीस चौकी उभारून आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करावी, तसंच सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

****

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या आठवड्याभराचं घेऊन राज्य सरकारने विदर्भ कराराचा अनादर केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. नागपूर इथं विधान भवनात ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान १० टक्के सदस्य संख्येचा निकष लावला जात असेल, तर वरिष्ठ सभागृहात १० टक्के सदस्यसंख्या असतांनाही विरोधी पक्षनेत्य़ाचा निर्णय का घेतला जात नाही, असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला.

****

राज्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या २०१९-२० मधील २४६ वरून २०२५-२६ मध्ये ९७ पर्यंत खाली आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी संबंधित विभागांचं पथक तयार करण्यात येईल, असंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं. सदस्य उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नावरच्या या चर्चेत संजय खोपडे, प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.

****

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने पोहोचावा, यासाठीचा पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार आहे. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत यावरच्या चर्चेत ही माहिती दिली. सदस्य सत्यजित तांबे यांनी ही चर्चा उपस्थित केली होती. अमोल मिटकरी यांनी यावर बोलतांना, अस्सल चरित्र साधन समिती अद्याप गठित न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

****

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक वाहनांत बसवलेल्या पॅनिक बटण प्रणालीची परिणामकारता तपासण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. त्या आज नागपुरात संबंधित विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. अनेक खासगी वाहनातील ही प्रणाली निष्क्रिय असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे यांनी ही बैठक घेतली. सदर प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी दिले.

****

माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर उद्या लातूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. लातूर शहराजवळील वरवंटी इथं सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चाकूरकर यांचं आज पहाटे लातूर इथं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकूरकर यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकारण आणि समाजकारण यांची सुयोग्य सांगड घालणारा अनुभवी, सुसंस्कृत तसंच सेवाभावी आदर्श, काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली. तर देशाच्या राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, आपण गमावलं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

****

माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज विशेष परिसंवाद घेण्यात आला. ग्रामीण नेतृत्व : नवसंकल्पनद्वारे आत्मनिर्भर गावांची उभारणी या विषयावरच्या या परिसंवादात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.

****

राज्यात प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी २३ क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात किमान हमीभाव योजनेअंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

****

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली आज नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. शासनानं जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठातील रिक्त पदं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी भरली जातील, अशी घोषणा कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी केली आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधी सूचनेवर भरणे यांनी ही माहिती दिली.

****

जालना इथं उद्या १३ आणि परवा १४ डिसेंबर रोजी वारकरी संत साहित्य संमेलनाचंआयोजन करण्यात आलं आहे. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. जेईएस महाविद्यालयाच्या चुन्नीलाल गोयल सभागृहात हे अधिवेशन होणार आहे. उद्या सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीनं या संमेलनाला सुरुवात होईल. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत.

****

बीड जिल्ह्यात रब्बी हंगाम ई-पीक पाहणीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी संबंधितांना दिल्या आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२५-२६ ची ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे सुरु झाल्याबाबत आणि ते पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील आठही जिल्ह्यात GSTR - 3B कर विवरणपत्र भरण्यासाठी २० डिसेंबर पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. संबंधित करदात्यांनी या मुदतीत विवरणपत्र दाखल करून, पुढील कारवाई टाळावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जीएसटी विभागाचे अपर आयुक्त अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

****

राज्यात आज सर्वात कमी सात पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल नाशिक इथं सात पूर्णाक आठ अंश, पुणे आठ पूर्णांक तीन अंश तर साताऱ्यात साडे नऊ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव इथं १० पूर्णांक चार, छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक सहा तर परभणी इथं दहा पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, राज्यात अहिल्यानगर, जळगाव, नाशिक तसंच सोलापूर जिल्ह्यात आज थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment