Friday, 12 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधानसभेत ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांची मागणी

·       महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत संमत

·       मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

·      मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरूण घालत असल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप

आणि

·      काँग्रसेचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

****

विधानसभेत काल ७५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. दोन दिवस चाललेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत ४४ हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं असून केंद्र सरकारकडे आणखी २९ हजार कोटी रुपये मदतीची मागणी केल्याचं पवार यांनी सांगितलं. यासंदर्भात केंद्राचं दुसरं पाहणी पथक पुढील आठवड्यामध्ये राज्यात येण्याची शक्यता असल्याची माहितीही पवार यांनी दिली. ते म्हणाले…

बाईट – अजित पवार

****

महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत काल संमत झालं. या विधेयकात तीन छोटे बदल करण्यात आले असून, यामध्ये नवीन भारतीय दंड संहितेचं नाव बदलून, भारतीय न्याय सुरक्षा संहिता असं करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

****

दरम्यान, लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते   अण्णा  हजारे  यांनी येत्या ३० जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.  डिसेंबर २०२४ पासून सदर विधेयक राष्ट्रपतींच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आलं असून अद्याप यावर कारवाई होत नसल्यानं आपण उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं आहे.

****

मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं 'हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने सुधारणा विधेयक काल विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील ९७ गट, जालन्यातील १०, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा इथल्या १० गटांमधल्या निवासी कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या जमिनींवरील घरे मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचे 'वर्ग-१' मालकी हक्क या विधेयकामुळे मिळणार आहे. मात्र देवस्थानांशी या विधेयकाचा काहीही संबंध नसल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

****

मुंबईतल्या सुमारे २० हजार इमारती नियमित करण्यासाठी 'सुधारीत भोगवटा अभय योजना' लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली. राज्यातल्या अन्य महापालिकांमध्ये देखील  मुंबईच्या धर्तीवर या धोरणाची अंमलबजावणी करण्याची शासनाची योजना असून याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

*****

मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरूण घालत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये कधी देणार, हा प्रश्न आपण अधिवेशनात विचारणार असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं. दोन्ही सदनांचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यावरूनही ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

****

पैठण तालुक्यासाठीच्या वॉटरग्रीड योजनेत या विधानसभा मतदार संघात असलेली, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली ४४ गावं जोडण्याची मागणी आमदार विलास भुमरे यांनी काल विधानसभेत केली.   

****

विधानसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासात नाफेड आणि सीसीआय मार्फत शेतमाल खरेदी संदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सरकारला निर्देश देण्याचं आश्वासन दिलं. या उत्तराने समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.

****

शिक्षकांसाठीच्या टीईटी मुद्यावरून विधान परिषदेत काल विरोधकांनी सभात्याग केला. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य केल्याने अनेक शिक्षकांची अडचण होणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षकांची एक समिती गठित करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. मात्र यावरही समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज लातूर येथे निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि त्यांनी देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली होती.

****

लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीला लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. या समितीचा कार्यकाळ, पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावा, असा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी मांडला, हा प्रस्ताव लोकसभेने आवाजी मतदानानं मंजूर केला.

****

भारत हा विकसित देश होण्यासाठी इंधनाची आयात कमी करण्याची गरज, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचं मिश्रण केल्यानं भारताचं कार्बन उत्सर्जन ७३६ लाख मेट्रिक टनांनी कमी झाल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.  ते म्हणाले…

बाईट- नितीन गडकरी

****

राज्यसभेत काल निवडणूक सुधारणांबाबत चर्चेला सुरुवात झाली. अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. तत्पूर्वी, वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी समारोप केला. स्वातंत्र्यलढा न अनुभवलेल्या आजच्या तरुण पिढीला या चर्चेद्वारे या लढ्याबाबत सखोल माहिती तसंच भविष्यकालीन वाटचालीची प्रेरणा मिळेल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.

****

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी १० हजार रुपयांचे प्रवास कूपन देणार आहे. वर्षभराच्या आत इंडिगोचे तिकीट आरक्षित करण्यासाठी या कुपनचा वापर करता येईल. याशिवाय २४ तासापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना ५ ते १० हजार रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाणार आहे.

****

राज्य सिकलसेलमुक्त करण्यासाठी तत्काळ आणि मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. ते काल नागपूर इथं एका आढावा बैठकीत बोलत होते. रुग्णांची अचूक ओळख करुन त्यांना ओळखपत्र द्यावं, तसंच त्यांची सुसंगत नोंद ठेवण्याची सूचनाही आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिले शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या २७ दीक्षांत समारंभात, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय तसंच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणी यांच्याहस्ते विभागातल्या दोन महिला शेतकऱ्यांसह एकूण ११ शेतकऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. श्रीरंग देवबा लाड यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे. सुमारे तीन हजार स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी तसंच विविध विद्याशाखेत सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या चार लाख ६० हजार ८४० शेतकऱ्यांना अनुदानाची रक्‍कम देण्‍यात आली आहे. उर्वरीत ४६ हजार ९४० शेतकऱ्यांचे अग्रीस्टेक किंवा फॉर्मर आयडी काढलेले नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या खात्‍यात अनुदानाची रक्‍कम जमा झालेली नाही. या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

****

पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे. अशा मांजाबद्दलची गोपनीय माहिती यंत्रणेला देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे…

****

क्रिकेट

भारत-दक्षिण अफ्रिकेदरम्यान काल झालेल्या दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना दक्षिण अफ्रिकेनं ५१ धावांनी जिंकला. चंदिगड इथं झालेल्या या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं सुरुवातीला फलंदाजी करत चार बाद २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव १६२ धावांवर संपुष्टात आला. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तिसरा सामना रविवारी धरमशाला इथं होणार आहे. 

****

धाराशिव तालुक्यातील तेर इथल्या सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वीही या तीर्थकुंडासाठी एक कोटी ६४ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. इसवीसनाच्या पहिल्या शतकातील घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या प्राचीन तीर्थकुंडाला यामुळे नवी झळाळी मिळेल.

 

No comments:

Post a Comment