Friday, 12 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ डिसेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचं आज लातूर इथं निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. दीर्घकाळ आजारी असल्याने ते काही काळापासून घरगुती उपचारावर होते. शिवराज पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. लोकसभेचे अध्यक्षपद तसंच केंद्र सरकारमधील विविध महत्त्वाची खाती सांभाळली. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सात वेळा निवडणुक जिंकली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पाटील हे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान देणारे अनुभवी नेते असल्याचे म्हटले आहे. शिवराज पाटील हे दीर्घ सार्वजनिक जीवनात आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तसेच लोकसभेचे सभापती म्हणून कार्यरत राहिलेले एक अनुभवी नेते होते. समाजकल्याणासाठी योगदान देण्याची त्यांना प्रखर आवड होती, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पोहचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील- चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील  चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं पितृतुल्य मार्गदर्शक हरपल्याचं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. देशाचं एक व्यासंगी आणि कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. राष्ट्रीय राजकारणात ते महाराष्ट्राचा एक चेहरा होते. त्यांनी आयुष्यभर सार्वजनिक प्रश्नांना अग्रक्रम दिला आणि देशसेवा केल्याचं चव्हाण यांनी म्‍हटला आहे.

****

कर्मचारी राज्य विमा महामंडळान छत्रपती संभाजीनगर इथं 200 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयासाठी 15 एकर जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठीच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

****

बीड ते वडवणी रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी झाली आहे. रेल्वे विभागाकडून ७ डिसेंबर रोजी इंजिनची चाचणी यशस्वी झाल्यानंतर काल बीड ते वडवणी या ३२ किलोमीटर दरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. यावेळी रेल्वचा ताशी वेग ३० किलोमीटर होता, तर जाताना हा वेग १३० किलोमीटर प्रतितास असेल, असं रेल्वे विभागानं सांगितलं आहे.

****

नाशिक-शहरातील गडकरी चौकातील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कारळे यांच्या बंगल्याच्या आवारात आज पहाटे बिबट्या दिसला. ड्रोन कॅमेरा मध्ये आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये बिबट्या स्पष्ट दिसत असून त्याच्या शोधासाठी वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे.

****

नाशिक त्र्यंबकेश्वर  इथं सन २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर, २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठवता येणार आहेत, असे विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं १५ आणि १६ डिसेंबर रोजी आ. कृ. वाघमारे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची ‘ज्ञानोबा-तुकोबा आणि आपण' या विषयावर व्याख्यानं होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात होणारी ही व्याख्यानं नागरिकांसाठी खुली आहेत

****

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या सर्वांगीण नियोजनासाठी नागपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी विभागनिहाय, बूथनिहाय आणि विषयनिहाय विविध समित्यांची स्थापना करण्यात आली.

****

हवामान

मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज आणि उद्या थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह, राज्यात जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, पालघर, सोलापूर तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.    

****

क्रिकेट

19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची आज पहिली लढत यजमान संयुक्त अरब अमिरातीशी आहे. तर, रविवारी भारत-पाकिस्तान सामना होईल.

****


No comments:

Post a Comment