Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
संसद हल्ल्यात आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या नऊ शूर
सुरक्षा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्रद्धांजली अर्पण केली आहे. संसद हल्ल्याला आज २४ वर्ष पूर्ण झाली, या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश या नायकांना त्यांचं साहस, शौर्य आणि बलिदानाला नमन करत असल्याचं राष्ट्रपती मुर्मू
यांनी सामाजिक प्रसार माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. या सैनिकांनी दिलेलं
बलिदान आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा भारताच्या राष्ट्रीय भावनेला निरंतर मार्गदर्शन करेल, या शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा संपूर्ण देश कायम
ऋणी राहील असंही राष्ट्रपतींनी या संदेशात म्हटलं आहे.
****
काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा माजी राज्यपाल दिवंगत शिवराज पाटील
चाकूरकर यांच्यावर लातूर शहराजवळील वरवंटी इथं थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत. लातूर शहरातील देवघर इथल्या निवासस्थानापासून आज सकाळी साडे नऊ
वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी लोकसभा सभापती ओम बिर्ला, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज
नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.
****
राज्यात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०
टक्क्यांनी वाढलं, राज्यशासन यासंदर्भात
काय ठोस कारवाई करत आहे असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे विचारला आहे. या प्रश्नी
विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं, असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का अशी त्यांनी
या पत्रातून विचारणा केली आहे. केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयासाठी
कृतिगट तयार करायला हवा तसंच राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी ठोस
कृती करावी ही अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
****
अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात
येणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ यंदा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा
गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख
यांनी आज अमरावती इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पंजाबराव देशमुख यांच्या जयंती आयोजित महोत्सवात विदर्भातील
शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या निधीतून
शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी महिलेला ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला
शेतकरी पुरस्कार’, तर केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांच्या निधीतून पुरूष शेतकऱ्याला ‘शरद जोशी उत्कृष्ट पुरूष शेतकरी पुरस्कार’
देण्यात येणार आहे. १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे तर पाच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं
स्वरूप आहे.
****
शासनाच्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थेमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती मागील
तीन वर्षांपासून रखडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असून, याबाबत शासनाने काय कारवाई केली असा प्रश्न विधानसभा सदस्य
आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी आज उपस्थित केला. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थाच्या फेलोशीपसाठी पीएचडी नोंदणी एकाच परिवारातील
अनेकजण करत आहेत. त्यांचे विषय कोणते आहेत आणि त्यांच्या संशोधनाचा फायदा होणार आहे
की नाही? ह्या संदर्भात विद्यार्थी गुणवत्ता
निकषावर निवडण्यात येतील आणि हे करतांना कुठल्याही वंचित वर्गावर अन्याय होणार नाही
याची दक्षता घेतली जाईल असं अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं.
****
क्रिस्टल लिमिटेड या पुरवठादार कंपनीवर ५५ लाख रुपयांचा
दंड आकारण्यात आला असून साफसफाई, सुरक्षिततेबाबत या कंपनीला नोटीस देण्यात आली असल्याची माहिती
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानसभेत दिली आहे.
राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांचं
भोजन वसतीगृहांच्या सुरक्षेसंदर्भात क्रिस्टल कंपनीची गैरव्यवस्था आणि अनियमतता याबाबत
सदस्य उत्तमराव जानकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
****
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांच्या समारोप
सोहळ्यात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज सहभागी होणार आहेत. बस्तरच्या
विभागीय मुख्यालयात जगदलपूर इथं हा कार्यक्रम होणार आहे. बस्तर ऑलिम्पिकचं हे दुसरं
वर्ष आहे. एकेकाळी नक्षलवादी हिंसेमुळे प्रभावित असणारं बस्तर आता नक्षलवाद मुक्त होण्याच्या
उंबरठ्यावर आहे, या क्षेत्रातल्या युवकांची क्रीडा
प्रतिभा आणखीन बळकट होत असल्याचं शहा यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशात
म्हटलं आहे.
****
पुण्यातील वर्तुळ मार्ग अर्थात रिंग रोडच्या पूर्व भागाचं
काम मे २०२८ पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचं काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी काल दिली. सदस्य राहुल
कुल यांनी याबाबत प्रश्न विचारला
होता.
****
No comments:
Post a Comment