Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 13 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
दोन टप्प्यात होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून
११ हजार ७१८ कोटी रुपये निधी मंजूर-जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीचीही नोंद होणार
·
महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं
मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांची टीका
·
माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर
आज लातूर इथं अंत्यसंस्कार
आणि
·
जालना इथं आजपासून दोन दिवसीय 'वारकरी संत
साहित्य संमेलनाचं आयोजन'
****
आगामी जनगणनेसाठी
केंद्रीय मंत्रिमंडळाने ११ हजार ७१८ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. काल झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी
वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. दोन टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेसाठी
तीस लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या
जातीची नोंदही केली जाणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव
****
संसदेवरच्या
दहशतवादी हल्ल्याला आज २४ वर्ष होत आहेत. १३ डिसेंबर २००१ रोजी झालेला हा हल्ला मोडून
काढताना, सुरक्षा रक्षकांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्या सर्व हुतात्म्यांना आज आदरांजली अर्पण करण्यात
येत आहे.
****
महाराष्ट्र
नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. ते काल नागपुरात बोलत होते. राज्य शासनाची दूरदृष्टी आणि पोलिसांच्या
प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक लवकरात लवकर करण्याचं आश्वासन विधानसभा
अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी दिल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी
या नियुक्ती व्हाव्यात अशी मागणी केल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. वेगळ्या विदर्भाच्या
प्रस्तावाबाबत ठाकरे म्हणाले..
बाईट – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
****
दरम्यान, अवघ्या आठवड्याभराचं
हिवाळी अधिवेशन घेऊन राज्य सरकारने विदर्भ कराराचा अनादर केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. नागपूर इथं विधान भवनात ते काल प्रसारमाध्यमांशी ते
बोलत होते.
****
राज्यात
ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी २०२६ पासून दिली
जाणार आहे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी काल विधानसभेत ही माहिती
दिली. एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणाऱ्या मदतीशिवाय रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर
अतिरिक्त दहा हजार रुपये मदत दिली जाणार असल्याचंही जाधव यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने
घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात
यासंबंधीचं निवेदन सादर केलं.
****
सायबर गुन्ह्यांचा
तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं MahaCrimeOS AI’ ला काल मुंबईत प्रारंभ
केला. सध्या नागपुरातल्या २३ पोलिस ठाण्यात याचा वापर सुरू आहे. लवकरच राज्यातल्या
सर्व अकराशे पोलिस ठाण्यात याचा वापर सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत
सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातलं सर्वात मोठे Global Capability
Center उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
महानगरपालिका, जिल्हा परिषदा
तसंच पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना पारंपरिकरित्या ऑफलाईन
पद्धतीनेही नामनिर्देशनपत्रं दाखल करता येणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
यांनी काल मुंबईत राजकीय पक्षांसोबत यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिका, ३१ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत
समित्यांच्या निवडणुकांसाठी या दृष्टीने नियोजन केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
स्वातंत्र्यवीर
सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या गीताला ११५ वर्ष पूर्ण झाली, या औचित्याने
काल अंदमानात सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला उजाळा
देण्यात आला.
****
माजी राज्यपाल
शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर आज लातूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
लातूर इथल्या राहत्या घरून सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान अंत्ययात्रा निघणार असून, वरवंटी इथं
चाकूरकर यांच्या शेतात सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चाकूरकर यांचं
काल पहाटे लातूर इथं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,
विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,
माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेकांनी चाकूरकर यांचं अंत्यदर्शन
घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकूरकर यांच्या कार्याला उजाळा
दिला. ते म्हणाले…
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकारण
आणि समाजकारण यांची सुयोग्य सांगड घालणारा अनुभवी, सुसंस्कृत तसंच
सेवाभावी आदर्श, काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर देशाच्या
राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व,
आपण गमावलं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन
सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
****
माजी केंद्रीय
मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात काल विशेष परिसंवाद घेण्यात आला. ग्रामीण नेतृत्व: नवसंकल्पनांव्दारे आत्मनिर्भर
गावांची उभारणी या विषयावरच्या या परिसंवादात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
****
राज्यात
प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी २३ क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी होणार असल्याची माहिती
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल विधानसभेत दिली. राज्यात किमान हमीभाव योजनेअंतर्गत
हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही मर्यादा
वाढवण्यात आली आहे.
****
जालना इथं
आजपासून दोन दिवसीय 'वारकरी संत साहित्य संमेलनाला' प्रारंभ होत
आहे. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य-संस्कृती
मंडळ, आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन
आयोजित करण्यात आलं आहे. जेईएस महाविद्यालयाच्या चुन्नीलाल गोयल सभागृहात हे अधिवेशन
होणार आहे. सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीनं या संमेलनाला प्रारंभ होईल. डॉ. रामकृष्ण
महाराज लहवितकर हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत.
****
राष्ट्रीय
तसंच राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आज लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा आणि सत्र न्यायालयात सकाळी साडे दहा वाजता लोकअदालत आयोजित
करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर क्षेत्रातील आठही जिल्ह्यात GSTR - 3B कर विवरणपत्र भरण्यासाठी २० डिसेंबर
पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. संबंधित करदात्यांनी या मुदतीत विवरणपत्र दाखल
करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे.
****
१९ वर्षांखालील
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने काल यूएई संघाचा २३४ धावांनी पराभव करत विजयी सलामी
दिली. दुबईत झालेल्या या सामन्यात भारताने दिलेलं ४३४ धावांचं आव्हान गाठतांना यूएईचा
संघ १९९ धावाच करू शकला. भारताचा पुढचा सामना रविवारी पाकिस्तानासोबत होणार आहे.
****
राज्यात
काल सर्वात कमी सात पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं.
मराठवाड्यात धाराशिव इथं १० पूर्णांक चार, छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक सहा
तर परभणी इथं दहा पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment