Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१३ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचे रक्षण करताना आपले प्राण
अर्पण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि हुतात्मांना आज संपूर्ण देश श्रद्धांजली
वाहत आहे. २००१ मध्ये याच दिवशी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. उपराष्ट्रपती
आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य आज संसद भवन संकुलात शहीद
सुरक्षा कर्मचाऱ्यांना पुष्पांजली अर्पण करतील.
****
काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा माजी राज्यपाल
दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्ययात्रेला लातूर शहरातील देवघर इथल्या निवासस्थानापासून
आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर लातूर
शहराजवळील वरवंटी इथं सकाळी साडेअकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार
आहेत. लोकसभा सभापती ओम बिर्ला, राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन
खर्गे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय
सेठ यांच्यासह अनेक नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.
****
आशियातील सर्वात मोठं जीसीसी म्हणजे
जागतिक क्षमता केंद्र मुंबईत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे राज्यात १५ हजार थेट आणि
३० हजार अप्रत्यक्ष असे एकंदर ४५ हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली.
मुंबईत ब्रुकफील्ड कंपनी सुमारे २०
लाख चौरस फूट क्षेत्रावर हे केंद्र उभारणार आहे. याबाबत करार लवकरच केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
झोपडपट्टी मुक्त मुंबई करुन शहराला
एक वेगळ रुप देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय असल्याचं आमदार प्रसाद
लाड यांनी म्हटलं आहे. आज विधानभवनात त्यांनी मुंबईतील अनाधिकृत झोपडपट्ट्यांचा विषय
मांडला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत अनाधिकृत झोपडपट्ट्या वाढत असून या प्रकाराला
लगाम लावण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
दरम्यान, राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये
शिक्षकांची १५ हजार १५८ पदे रिक्त असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय शिक्षकांच्या
स्थानांतराला अनुमती दिली जाणार नाही, असंही ते म्हणाले. सरकारनं या रिक्त
जागा मर्यादित कालावधीत भराव्यात अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार
यांनी केली.
****
परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या
भरतीला २०२२ मध्ये मंजुरी देण्यात आली असून
ही भरती आयबीपीएसमार्फत पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब
पाटील यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य
राजेश विटेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकारमंत्री पाटील
बोलत होते.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली काल नागपूर
विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. शासनानं
जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात
आली.
****
राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठातील रिक्त पदं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी भरली जातील, अशी घोषणा कृषीमंत्री दत्ता भरणे
यांनी केली आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधी सूचनेवर भरणे यांनी
ही माहिती दिली.
****
नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ
कुंभमेळ्यासाठी तपोवनातील एक हजार ८०० झाडं तोडण्यावर पुण्यातील हरीत लवादानं काल स्थगिती
दिली. कायदेशीर प्रक्रिया राबवल्याशिवाय एकही झाड तोडू नये, असे आदेश हरित लवादानं नाशिक महापालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील
वकील श्रीराम पिंगळे यांनी यासंबंधी पुणे हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती, त्यावर लवादानं हा निर्णय दिला.
****
उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या
अडचणी सोडवण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी
१२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने शासकीय
योजनांचा लाभ घ्यावा, अशा योजनांसाठी निधीची
कमतरता पडणार नाही, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी
लागणारं साहित्य तसंच सोयीसुविधा उपलब्ध
करुन देण्यात येईल, असंही मंत्री संजय शिरसाट
यांनी सांगितलं.
****
स्क्वॅश विश्वकप स्पर्धेत चेन्नई
इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारतानं जिंकून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला
आहे. आता, भारताचा सामना उपांत्य फेरीत गतविजेत्या
इजिप्तशी होईल, तर जपानचा सामना उद्या
अव्वल मानांकित हाँगकाँग आणि चीनशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment