Sunday, 14 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

२०३५ सालचा अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याचं राज्य शासनाचं उद्दीष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना दिली आहे.

****

उर्जा सुरक्षा ही एक आवश्यक बाब असून प्रत्येकानं उर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं आणि आपल्या आयुष्याचा महत्वपूर्ण घटक म्हणून समावेश करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत उर्जा सुरक्षा पुरस्कार सोहळ्यात आज त्या बोलत होत्या. दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस उर्जा संरक्षण म्हणून साजरा केला जातो, यानिमित्त आज राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते उर्जा संरक्षण पुरस्कार देण्यात येत आहेत.

****

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती मार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. आता ही योजना ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. जी संस्था हे काम करणार ती राजस्थानची आहे, त्याऐवजी हे प्रशिक्षण ऑफलाईन देण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार असल्यामुळे त्यांचं विद्यावेतन मिळालेलं नाही आणि या विद्यार्थ्यांनी काल आंदोलनही केलं असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा निधी द्यावा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ऑफलाईन प्रशिक्षणाची मागणी असेल तर ते ऑफलाईनही देण्यात येईल हे स्पष्ट केले. निधी कमी दिला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले ज्या विभागाला कमी निधी देण्यात आला आहे याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक झाली आहे, मार्च मधील पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रशिक्षणार्थींना नवीन योजनेत सामावून घेतलं जाईल आणि, याबाबत नवीन धोरण आखण्यात येईल, असं आश्वासन आज सभागृहात दिलं. नागपूर इथं सुरू विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.

****

राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळं आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी वाढ होत असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या एक हजार ३५६ वरून २ हजार ३९९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. रुग्णालयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं असून, मानकं पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना १० ते १५ टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ते म्हणाले. नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास नि:शुल्क मदतवाहिनी क्रमांक उपलब्ध आहेत.

****

तीन नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर काल आत्मसमर्पण केलं.

दर्रेकसा एरिया कमिटीचा कथित कमांडर कुख्यात रोशन याचा यात समावेश आहे.

***

एकोणीस वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबईतील मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळताना, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं १८व्या षटकांत तीन बाद १०७ धावा केल्या आहेत. याआधी पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे नाणेफेक उशिरा झाल्यानं सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योगपती माधव भोगले यांचं आज सकाळी दहा वाजता प्रदीर्घ आजारामुळे निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाला इथं खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत आहेत. सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.

****

स्क्वॅश विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाच्या लढतीमध्ये आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. काल रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं इजिप्तचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या वेलावन सेंथिल कुमारनं इजिप्तच्या इब्राहिम एलकब्बानी यांचा पराभव केला, तर अनाहत सिंग यानं इजिप्तच्या नूर हेइकल गरासवर मात केली. अभय सिंग यानं इजिप्तच्या आदम हवालचा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात हाँगकाँगनं जपानवर २-० अशी मात करीत अंतिम फेरीत स्थान मिळवलं.

****

No comments:

Post a Comment