Sunday, 14 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारची हाऊसिंग फॉर ऑल योजना

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई-केवायसीमध्ये ३१ डिसेंबरपूर्वी एकदा दुरुस्ती करता येणार

·      विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप; अंतिम आठवडा प्रस्तावातून विरोधकांची सरकारवर टीका

·      पत्रकार तथा जेष्ठ साहित्यिक धनंजय चिंचोलीकर यांचं निधन

आणि

·      माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

****

मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी हाऊसिंग फॉर ऑल योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत माहिती दिली. आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी ३०० चौरस फुटापर्यंतचा एफएसआय विनामूल्य तर अल्प उत्पन्न गटासाठी ६०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेची पुनर्बांधणी विनामूल्य करण्याची तरतूद या योजनेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

झोपडपट्टीधारकांसाठी जमिनीच्या मालकीहक्काचे पट्टे दिले असून, अडीच लाख लोकांना त्याचा लाभ होईल, असं त्यांनी सांगितलं. नागपुरात वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली, ते म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपूर इथं सीआयआय अन्न प्रक्रिया परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. या परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा होईल, तसंच प्रक्रिया उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी धोरणं आखली जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्या क्षेत्रात मूल्यवर्धन आहे तिथे शेतकरी बाजारावर प्रभाव टाकू शकतात, असा विश्वास  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत, यासारख्या स्वायत्त संस्थांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणूनच योग्य निकषांसह मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली जातील, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल विधानसभेत डॉ. नितीन राऊत यांच्या प्रश्नावर उत्तर देत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल-वंचित घटकांतल्या, परदेशात शिक्षण घेण्याची क्षमता नसलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्राधान्यानं मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र संशोधनासाठी दिली जाणाऱ्या शिष्यवृत्तीची पात्रता आणि उपयोगिता तपासली जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट – अर्थमंत्री अजित पवार

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत e-KYC प्रक्रियेतल्या चुका सुधारण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतूनं राबवण्यात येत आहे. e-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला आणि बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

****

कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक २०२५ काल विधानसभा तसंच विधानपरिषदेत मंजूर झालं. या विधेयकात प्रथमच राज्यात राष्ट्रीय महत्वाचा बाजार- युनिफाईड सिंगल ट्रेडिंग लायसन्स आणि राष्ट्रीय कृषी बाजार या शेतकरी हिताच्या संकल्पनांना कायदेशीर रूप दिलं आहे. शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद गतीनं पुरवठा साखळी विकसित करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे.

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या वतीने विजय वडेट्टीवार यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, कायदा आणि सुव्यवस्था, तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विदर्भ वैधानिक मंडळाला त्वरित मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

****

अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी काल अमरावती इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

पत्रकार तथा जेष्ठ साहित्यिक धनंजय चिंचोलीकर यांचं आज पहाटे छत्रपती  संभाजीनगर इथं हृदयविकाराने निधन झालं, ते एकोणसाठ वर्षांचे होते. बब्रुवान रुद्रकंठावार या नावाने त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. धनंजय चिंचोलीकर हे एक विनोदी लेखक आणि स्तंभलेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. 'न घेतलेल्या मुलाखती' आणि 'पुन्यांदा चबढब', तसंच त्यांची 'आमादमी विदाऊट पार्टी' ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर शहराजवळील वरवंटी इथं लिंगायत समाजाच्या रितीरिवाजांनुसार चाकूरकर यांच्यावर समाधी संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून चाकूरकर यांना मानवंदना देण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी तसंच शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.

****

राज्यातल्या रस्त्यांच्या कामासाठी दीड लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ १६ हजार ३१८ कोटी रुपयांचा पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग बांधणार असून, या मार्गामुळे दोन्ही शहरातला प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असणाऱ्या १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या द्रुतगती मार्गामुळे दोन्ही शहरातलं अंतर दीड तासांनी कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचं भूमिपूजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

****

जनसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार समाजाच्या मनामनात रुजवण्याची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केलं. जालना इथं दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचं काल उद्घाटन झालं, यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून रामकृष्ण महाराज बोलत होते. महाराष्ट्रासह अखंड भारताच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाची भूमिका मोलाची असून संत साहित्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. जालना एज्युकेशन सोसायटीच्या जेईएस महाविद्यालयात आयोजित या संमेलनाचा आज समारोप होत आहे.

****

धाराशिव इथल्या लोकसेवा समितीच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा पातळीवरील 'लोकसेवा पुरस्कार' ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद चिक्षे यांना जाहिर झाला आहे. शिक्षण, जलसंधारण आणि भटके-विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या ३० वर्षांच्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली. येत्या २४ डिसेंबरला धाराशिव इथं या पुरस्काराचं वितरण होईल.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात काल सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला. पोतरा परिसरात ही घटना घडली. वनविभागानं यावर उपाययोजना न केल्यास सुस्त वन अधिकाऱ्यांच्या कक्षात प्राण्याचे मृतदेह घेऊन जाणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

****

राज्यात काल सर्वात कमी सात अंश सेल्सियस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं साडे सात अंश, पुणे तसंच नाशिक इथं साडे आठ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सात दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

****

No comments:

Post a Comment